मृतदेह कचरा जमा करणार्‍या गाडीत टाकून नेला हॉस्पिटलला

ही कथा आहे एका अभागी पत्रकाराची..व्यथा आहे बहुसंख्य पत्रकारांची ..एक पत्रकार ऑॅफिसमधील काम संपवून आपल्या घरी जायला निघतो..रस्त्यात त्याची मोटर सायकल एका झाडावर आदळते..तो जागीच ठार होतो..पोलीस येतात..त्याचा मृतदेह एका कचर्‍याच्या गाडीत टाकतात आणि हॉस्पिटलमध्ये नेतात.. अत्यंत अमानवीय..संतापजनक आणि पोलिसांच्या असंवेदनशील कृत्यानं आज तमाम कर्नाटकातील पत्रकार संतप्त आहेत.
ही घटना आहे कर्नाटकच्या हावेरी जिल्हयातली..मौनेष पॉथराज नावाचा 28 वर्षांचा एक तरणाबांड पत्रकार आपलं काम संपवून आपल्या घरी निघाला होता.तो ज्या चॅनलमध्ये होता तेथील नोकरीसोडून तो दुसर्‍या वाहिनीत जॉईन होणार होता.तो घरी जात असताना हंगल तालुक्यातील गुंदुरू गावाजवळ एका झाडावर त्याची बाईक आदळली आणि तो जागीच ठार झाला.पॉथराजचे आई-वडिल एका बिल्डिंग व्यावसायिकाकडे बिगारी कामगार म्हणून काम करतात.अपघात झाल्यानंतर पोलिसांनी त्याची नोंद घेतली आणि मृतदेह कचरा उचलणार्‍या गाडीतून हंगल येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविला गेला.या घटनेची बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकात संतापाची लाट उठली आहे.असं सांगण्यात आलं की,शिक्षण घेत असताना मौनेष कुलीचं काम करीत होता.अत्यंत कठोर परिश्रम करून तो पुढे पत्रकार झाला आता त्याच्या मृत्यूपश्‍चातही परिस्थितीनं त्याची पाठ सोडली नाही.कर्नाटकमधील एकजात सर्वच पत्रकार संघटनांनी या अमानवी,अमानूष आणि मृतदेहाची विटंबना करणार्‍या घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.पत्रकाराच्या मृतदेहासाठी अ‍ॅम्ब्युलन्स का मागविली गेली नाही असा पत्रकारांचा सवाल आहे.मात्र काल रविवार होता आणि मकर संक्राती होती त्यामुळं चालक उपलब्ध झाला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे.एखादा राजकीय नेता असता,एखादा वरिष्ठ पोलीस अधिकारी असता तर त्याच्या मृतदेहाची देखील अशीच विटंबना केली गेली असती काय असा सवाल कर्नाटकातील पत्रकार विचारत आहेत.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here