नागपुरातील दैनिक लोकशाही वार्ताचे वृत्तसंपादक दिलीप आमले यांचे 13 जानेवरी ला सकाळी कॅन्सर च्या आजाराने दुःखात निधन झाले.त्यांना  घशाचा केन्सर होता.मी नुकताच त्यांच्या अंत्यविधीहून आलोय. चितेचे निखारे अजून राख झालेले नाहीत आणि केवळ पत्रकारितेच्या कायम अस्थिर क्षेत्रात असल्यामुळे आमलेंना शेवटच्या काळात ज्या आर्थिक ज्वाळांनी भाजून काढले त्यांची धगही चितेच्या आगी इतकीच तीव्र आहे.
थोडी-थोडकी नाही तब्बल २३ वर्षांची पत्रकारिता अन् शेवटचा पगार फक्त ३० हजार. गडी आजारी आहे, कामावर येऊ शकणार नाही, हे कळल्यावर तोही बंद झाला. मुलगी नुकतीच बारावी झाली होती. कधीही घराबाहेर न पडलेली. बारावीत असताना उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवणारी. वडील आजाराने घरी बसलेत, होेते-नव्हते कॅन्सरने आपल्या घशात घातले. परिणामी पुरेशे जबाबदारीचे भानही न आलेल्या या मुलीला घर चालावे यासाठी नोकरी शोधावी लागली. मुलगा तर दहावतीच. काय पैसे कमावणार? आमले याही स्थितीत आजार आणि परिस्थितीशी जोरदार लढले अन् अखेर आज कोसळले. हे लिहिण्यामागे कुणाच्या सहानुभूतीची अपेक्षा नाही. ही रडकथाही नाही. महिन्याला २०-२५ हजार रुपये कमावणारी पत्रकार नावाची जी मध्यमवर्गीय जमात आहे तिच्या अस्थिर आयुष्याचे जळजळीत वास्तव फक्त मांडायचे आहे. आमलेंना वा त्यांच्यासारख्या अद्याप हयात असलेल्या हजारो मध्यमवर्गीय पत्रकारांना कुणी या बेभरोवशाच्या क्षेत्रात करिअर कर असे निमंत्रण दिले नाही. त्यामुळे अर्थातच कुणावर रोष वा राग नाही. पण, एका गोष्टीकडे मात्र लक्ष नक्की वेधायचे आहे. पत्रकार हाच दैनिकाचा आत्मा आहे. तो बातमीत जीव ओततो म्हणून ती वाचनीय होते आणि ती वाचनीय असते म्हणून दैनिकाचा खप वाढतो आणि दैनिकाचा खप वाढतो म्हणून जाहिराती मिळतात आणि जाहिराती मिळतात म्हणून दैनिकाचा महसूल वाढतो. पण, यातला किती वाटा प्रत्यक्ष पत्रकाराला मिळतो? वाटयाचे जाऊ द्या एखादवेळी अपघाताने असे दुर्धर आजारपण आलेच तर कुटुंबाला किमान दोेन महिने पुरेल इतक्या किराण्याची हमी तर कुणी देतो का? बोनस, एलटीए हा प्रकारही तोपर्यंतच जोपर्यंत तुमच्या पगारातून कपात होतेय. पगार थांबला की सारेच बंद. महागाई शंभर टक्क्याने वाढत असताना वेतनवाढीचे प्रमाण दोन टक्के असते. तेही ‘आले कंपनीच्या मना…’ तर नाही तर नोटाबंदी, जीएसटीसारखी कारणे दरवर्षी ठरलेलीच. नाही म्हणायला १५ हजारांपर्यंत इसआयसी आहे. पण, तिची मदत म्हणजे ‘उडते को तिनखे का सहारा’ यापेक्षा जास्त नाही. या विदारक स्थितीत जगणाºया पत्रकाराच्याच कार्यालयातील इतर विभागात मात्र बाराही महिने दिवाळी असते. कारण…ते जाहिराती आणतात, दैनिकाला सर्वदूर पोहोचवतात, भव्य आयोजन करून दैनिकाचे ब्रॅडिंग करतात. पत्रकार काय करतो…लेखनीच तर खरडतो. या कॉर्पोरेट मानसिकतेपायी इतर सर्व विभागातील लोक कारने कार्यालयात येतात आणि पत्रकार मोडक्या दुचाकीने. आमले याच कॉर्पोरेट मानसिकतेचे बळी ठरलेत आणि पुढे आमच्यासारखे अनेक ठरण्याच्या मार्गावर आहेत.
पत्रकार? आमलेंसारखाच प्रामाणिक मध्यमवर्गीय पत्रकार ज्याला मी पैशांअभावी धगधगत्या चितेत जळताना पाहून परतलोय? या आर्थिक अवहेलनेसाठीच स्वीकारली होती का त्यांनी ही वेगळी वाट? लेखनीची ताकद, सामाजिक बांधिलकी, अन्यायाला वाचा, समाजाला दिशा या सगळया खरच फालतू गोष्टी आहेत का? की हा कधीकाळी समाजाला वैचारिक नेतृत्व देणारा लोकशाहीचा चौथ्या स्तंभ कॉर्पोरेट कल्चर या मोहक शब्दाच्या मृगजळात समाज तर दूरची गोष्ट आपल्याच कुटुुुंबातील सदस्यांना परका झालाय? आज आमले गेलेत, उद्या कुणी दुसरा असेल. दैनिकाचा रहाटगाडगा थांबणार नाहीच. पण, आमलेंमागे असलेल्या निराधार चार जीवांचे काय होणार, आमलेंच्याच जातकुळीतील इतर पत्रकारांना किती दिवस अशाच अस्थिर, विदारक स्थितीत रोज नव्या संघर्षाला सामोरे जावे लागणार, याचा विचार कधी कुणीच करणार नाही का?

विजय खवसे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here