मुंबई- मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे यासाठी कोकणातील पत्रकारांनी बुधवारी केलेल्या कशेडी घाट रोको आंदोलनाची तात्काळ दखल घेत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुंबई-गोवा महामार्गचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे जाहीर केले आहे.नितीन गडकरी यांनी घेतलेल्या या भूमिकेचे ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख ,संतोष पवार,विजय पवार,मिलिंद अष्टीवकर,संतोष पेरणे आणि कोकणातील आंदोलक सर्वच पत्रकारांनी स्वागत केले आहे.पहिल्या टप्प्याचे काम कुर्म गतीने सुरू असून त्याला गती देण्याबरोबरचे दुसऱ्या टप्प्याचं कामही त्वरित सुरू करावे आणि ते ठराविक मुदतीत पूर्ण होईल याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महाार्गाच्या चौपदरीकरणाचे रेंगाळलेले काम त्वरित मार्गी लागावे या मागणीसाठी कोकणातील दोनशेवर पत्रकारांनी बुधवारी कशेडी घाट रोको आंदोलन केले.त्याची दखल घेत नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग हे माझे स्वप्न असून ते पूर्ण करणार असल्याचे मत व्यक्त केले.
तत्पुर्वी उरण येथील कार्यक्रमातही त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.ते म्हणाले,राज्यातील रखडलेल्या महामार्गाच्या 35 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांना येत्या 8 ते 10 दिवसात मंजुरी देण्यात येईल.राज्यातील 265 रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांसाठी 75 हजार कोटी रूपयांची तरतूद कऱण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले.