रायगडचे वार्तापत्र

पंचवीस लाख गणेश मूर्ती देश-विदेशात रवाना 

गणेशमूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणमधून आतापर्यंत पंचवीस लाख गणेशमूर्ती देश-विदेशात पाठविण्यात आल्या आहेत.त्यातील पंचवीस हजारांवर गपणती परदेशात रवाना झाल्या  आहेत.देशात पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जात असल्यानं गेल्या काही वर्षात इको फे्रंडली गणेशमूर्तींची मागणी वाढल्याचे दिसते.त्यामुळं प्लॅस्टर ऑफ पॅरिस पेक्षा शाडूंच्या मूर्तीला भाविकांची पसंती आहे.मात्र शाडूच्या मूर्ती तयार करू शकणारे मूर्तीकार निर्माण होणे आवश्यक असल्याचं मत श्रीकांत देवधर यांनी व्यक्त केलं आहे.पुर्वी पेण शहरापुरता मर्यादित असलेला हा उद्योग आता तालुक्यातही परसरला असून हमरापूर,जोहे,वडखळ,शिर्की,या परिसरात अनेक सुशिक्षित तरूणांनी मूर्तीकला आत्मसात केल्यानं घरोघरी गणेशमूर्तीचे कारखाने निर्माण झाल्याचे चित्र आहे,जवळपास अडीच लाख लोकांना रोजगार देणारा आणि दरवर्षी शंभर कोटींच्यावरती उलाढाल करणार्‍या पेणमधील गणपती ऑर्डरनुसार पाठविण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहेत.सरकारनं यंदा  जीएसटी माफ केलेला असला तरी वाहतूक खर्चात झालेली वाढ,कामगारांचे वाढते वेतन,रंगाच्या किंमतीत झालेली वाढ,काथ्या व अन्य साहित्यात झालेली वाढ यामुळं यंदा गणेशमूर्तीच्या किंमतीत वीस-ते पंचवीस टक्के वाढ झाली असली तरी कारखान्यांना फार नफा मिळत नाही.मात्र कला जिवंत ठेवण्यासाठी कारखाने चालू ठेवावे लागतात असं मूर्तीकरांचं म्हणणं आहे

रेल्वेसाठी पेणकर रस्त्यावर 

कोकणात रेल्वे आली त्याला 19 वर्षे झालीत.प्रत्यक्षात कोकण रेल्वेचा लाभ रायगडला होताना दिसतच नाही.अनेक लांबपल्ल्याच्या जलद गाड्या रायगडमध्ये थांबतच नाहीत.सुसाट धावणार्‍या गाड्या पहात बसणं एवढंच रायगडवासियांचं प्राक्तन आहे.पेण स्थानकात जलद रेल्वे गाड्या थांबाव्यात ही मागणी लावून धरण्यासाठी पेणकरांनी मी पेणकर आम्ही पेणकर या संस्थेची स्थापना केलीय.जलद गाडया पेणमध्ये थांबाव्यात ,पनवेल-पेण शटल सेवा सुरू करावी,गणपती-होळी आणि सुटीच्या दिवशी कोकणात जाणार्‍या -येणार्‍या गाडयांना दोन मिनिटांचा विशेष थांबा द्यावा,अशा या समितीच्या मागण्या आहेत.त्यासाठी 15 ऑगस्ट रोजी समितीच्यावतीने पेण स्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.मात्र पोलिसांनी आंदोलकांना अलिकडंच अडविल्यानं पेण स्थानकासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.पेणमधील शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले.पनवेल-पेण शटल सेवा सुरू झाली तर पेणकरांना रस्ता मार्गे करावा लागणारा प्रवासाचा त्रास वाचेल आणि थेट मुंबईत कमी वेळात पोहोचता येईल.

फिरत्या पोलीस ठाण्यांना रायगडात चांगला प्रतिसाद  

फिरते पोलीस ठाणे या संकल्पनेस रायगड जिल्हयात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.पोलीस महासंचालकांच्या संकलेपनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळं जनतेच्या मनातील पोलिसांबद्दलची भिती तर कमी होण्यास मदत होणार आहेच त्याचबरोबर गुन्हयांची सोडवणूक तातडीने होण्यासही फिरते पोलीस ठाणे उपयुक्त ठरत आहे.जनतेशी संपर्क राहावा,लहान-मोठया गुन्हयावर अंकुश ठेवता यावा,कायदा आणि सुव्वस्था बिघडू नये यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिली.रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वावे येथे आणि अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरूळ येथे नुकतेच फिरते पोलीस ठाणे लावण्यात आले.याचा स्थानिकांना चांगलाच फायदा झाला.वावे येथे तब्बल आठ गुन्हयांची सोडवणूक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.पोलिसांच्या या उपक्रमाचे जिल्हयातील जनतेनं स्वागत केलं आहे.

रायगडमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणार 

रायग़ड जिल्हयाला सातत्यानं नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं.कधी अतिवृष्ठी तर कधी दरड कोसळणे अशा घटना वारंवार घडत असतात.रस्ता अपघातांचे प्रमाणही जिल्हयात मोठे आहे.सावित्रीवरील अपघात आणि आंबेनळीत अलिकडंच झालेला अपघात या जखमा रायगडच्या मनावर कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत.मात्र नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस तातडीनं मदत मिळावी अशी प्रभावी यंत्रणा जिल्हयात नाही.एनडीआरएफचे पथक पुण्यावरून घटनास्थळी पोहोचेपर्यंत बराच उशीर झालेला असतो.अशा स्थितीत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी एनडीआरएफच्या धर्तीवर रायगड जिल्हयात सुसज्ज आपत्ती निवारण यंत्रणा उभी करण्याची केलेली घोषणा रायगडकरांना नक्कीच दिलासा देणारी आहे.पालकमंत्री केवळ घोषणा करूनच थांबले नाहीत तर त्यासाठी 30 लाख रूपयांचा निधी देखील उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.पालकमंत्र्यांच्या या घोषणेचं रायगडमध्ये स्वागत होत आहे.स्वातंत्र्य दिनी अलिबाग येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं गेलं.यावेळी त्यांना मानवंदना दिली गेली.जिल्हयात विविध क्षेत्रात नैपूण्य दाखविलेल्या मान्यवरांचा सत्कारही यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here