नो एन्ट्री!पुढे धोका आहे. . .

0
1063

मुरूड-जंजिरा येथे पर्यटनास आलेल्या मुंबईच्या सहा जणांचा समुद्रात बुडून मृत्यु. काही दिवसापूर्वी वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या या बातमीने मनाला अतिशय क्लेष झाला. बातमी तर दुख:द होतीच पण या बातमीसोबतच्या छायाचित्राने अंत:करण पुरे हेलावून गेले. समुद्रकिनारी स्थानिकांच्या मदतीने समुद्रातून शोधून काढलेले ते मृतदेह छायाचित्रात पहातानांही क्लेष झाला. केवळ आणि केवळ अती उत्साहापोटी लावलेल्या जीवघेण्या पैजा (अर्थातच पैज कोणती ही समजून घेण्याची बाब आहे) आणि त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा विषयकच्या सूचनांकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष हेच सर्वनाशास कारणीभूत ठरले.

असो अन्य पर्यटकांनी सावध व्हावे, दक्ष रहावे यासाठी अशा प्रकारच्या बातम्या व छायाचित्रे महत्वाचे काम करतात. केवळ याच वर्षी व आताच नव्हे तर यापूर्वीही अनेकवेळा मन विषन्न करणाऱ्या अशा बातम्या आपण वाचलेल्या आहेतच. तरीही असे का घडते? याचाही विचार पर्यटनांस जातांना करायलाच हवा.

परवा पालकमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला मुरूड-जंजिरा येथे जातांना काशिद बिचवर असलेल्या एका माहितीफलकाने लक्ष वेधून घेतले. ग्रामपंचायतीच्या वतीने बिचवर पर्यटकांना सहजतेने दिसेल अशा ठिकाणी हा माहिती फलक लावलेला आहे. या फलकावर सुरक्षेच्या सुचना असून गेल्या काही वर्षात बिचवर अतिउत्साहाने बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची आकडेवारी आहे. तसेच स्पष्टपणे सुचना दिलेली आहे की, आपला जीव महत्वाचा असल्याने पर्यटकांनी समुद्राकाठी निसर्गाचा आनंद घेऊन सागरी सुरक्षा दलास सहकार्य करावे. पावसाळ्यामध्ये खवळलेल्या समुद्रात पोहणे धोक्याचे असल्यामुळे काशिद ग्रामपंचायतीने जून ते सप्टेंबर अखेर समुद्रात पोहण्यास बंदी घातली आहे. समुद्रात पोहतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मद्य प्राशन करण्यास मनाई आहे. हुकुमावरुन ग्रुप-ग्रामपंचायत काशिद. आता सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या पर्यटकांना सावधान करण्यासाठी संबधित ग्रामपंचायतीने नक्कीच आपले कार्य केलेले आहे. अशा फलकाचा फायदा हजारो पर्यटकांना नक्कीच      झाला असेल मात्र दुर्लक्ष केल्याचा तोटाही काही अति उत्साही पर्यटकांना भोगावा लागला. त्या दुर्लक्षतेचे दूरगामी परिणाम पहावयास ते दुर्देवी जीव हयात नसतील, मात्र त्यांचे कुटूंबिय ते भोगत असतील.

सध्या पावसाळा असल्याने निसर्गाने भूईवर हिरव्या रंगाचा गालीचा अंथरुन पर्यटकांना विविध ठिकाणी भेटीचे आमंत्रणच दिलेले आहे. उन्हाळ्याच्या रखरखीत उन्हाळा आणि असह्य करणाऱ्या गरमीला कंटाळून पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पहाणाऱ्या पर्यटकांची संख्या काही कमी नाही. रायगड हा जिल्हा तर मुंबईकरांच्या जवळचा जिल्हा. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे या पर्यटकांना खुणावतात. याखेरीज मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील मंडळीही आपल्या सागरी किनाऱ्यावरील पर्यटन स्थळांना भेटी देण्यास उत्सुक असतात. अथांग अशा सागराचे भव्य दिव्य स्वरुप पाहून तर ही मंडळी अक्षरक्ष: भारावून जातात. समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी समुद्रात उतरतात. यात प्रामुख्याने युवा वर्गाचा भरणा अधिक असतो. तर काही हौशी प्रौढ सुध्दा बालकांसहीत समुद्रस्नानाचा आनंद घेतात. थोडक्यात या भागात विविध ठिकाणच्या पर्यटकांचा मोठा ओघ असतो.

पावसाळ्याच्या मोसमचा आनंद जसा पर्यटकांना होतो तसाच सागरालाही होत असावा म्हणून तर तो अत्यानंदाने खवळलेला असतो. त्यामुळे किनाऱ्यावरील वाळुचे रचनेत सातत्याने समांतरता नष्ट होऊन बदल होत जातो. एक खड्डा म्हणजेच पोय तयार होते. याची माहिती नसल्याने पाण्यात उतरलेला फसतो आणि जीवघेणे अपघात घडतात. तर काही ठिकाणी डोंगरावरुन कोसळणाऱ्या धबधब्याच्या ठिकाणी देखील वरतून दगड कोसळून अपघात होतात. अशा ठिकाणी देखील आपण काळजी घ्यायलाच पाहिजे. त्याठिकाणी कोठुन कसा दगड येईल याचा भरवसा नसतो. शेवटी निसर्ग तो निसर्गच. या ठिकाणी सुरक्षतेबाबत वैयक्तिकरित्याच काळजी घेणे आवश्यक असते.

राजू पाटोदकर    जिल्हा माहिती अधिकार  रायगड-अलिबाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here