बळी व्यवस्थेचेच ,निसर्गाच्या नावानं खापर फोडू नका!

0
836

सावित्री नदीवरील शंभर वर्षापूर्वीचा पूल कोसळल्यानंतर प्रत्येकाची कातडीबचावसाठी जी धावाधाव सुरू आहे ती केवळ केविलवाणी नाही तर संतापजनक ही  आहे.या दुर्घटनेचं खापर नेहमीप्रमाणे निसर्गावर फोडून सरकार आणि त्यांची बेशरम यंत्रणा नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करताना दिसतेय .‘पाऊस खूप झाला,नदीला प्रचंड पुर आला आणि पूल वाहून गेला’ ही थेरी कातडीबचावसाठी उपयुक्त ठरणारी असली तरी ती वस्तुस्थितीला धरून नाही.मुळात ब्रिटिशकालिन पुलाशेजारी जो नवा पुल बांधला गेला तोच मुळी हा पुल आता म्हातारा झाला आणि तो कधीही दगा देऊ शकतो या जाणिवेतून.जुना पुल अरूंद असल्याने वाहतुकीस अडथळा येतो म्हणून नवा पुल बांधला गेला असं जरी आज सांगता येऊ शकत असलं तरी ते ही असत्य आहे.कारण नवा पुल बांधताना देखील जी दूरदृष्टी ठेवायला पाहिजे होती ती ठेवली गेली नाही.म्हणजे नव्या पुलाची रूदीही जेमतेम जुन्या पुलाएढीच ठेवली गेली। समोरासमोरून येणार्‍या दोन गाड्याही या पुलावरून जेमतेम जाऊ शकतात आणि त्यामुळं पुलावर किती वाहतूक कोंडी होते हे आज आपण अनुभवतो आहोत.बघतो आहोत.हा सारा परिसर वाहतुकीचा आहे.महाड एमआयडीसीकडून मुंबईकडे जाणारी मोठी वाहतूक याच पुलावरून जाते.हे नवीन पुलाचं नियोजन कऱताना बेअक्कल लोकांना कळलं नव्हतं काय ? नवा पुल बांधतानाच तो एवढा रूंद बांधायला हवा होता की,जुना पुल चालू ठेवण्याची गरजच भासायला नको होती  ( पाताळगंगा नदीवर नवीन पुल बांधल्यावर जुना पुल वाहतुकीस बंद केला गेला.तो पुलही असाच शंभर वर्षाचा झाला होता ) पण तसं झालं नाही. म्हणजे नवीन पुल बांधताना सरकारच्या डोक्यात हे पक्कं होतं की,एका पुलावरून वाहनं येतील आणि दुसर्‍यावरून ती जातील.नंतर नियोजनही तसंच केलं गेलं.म्हणजे कोकणातून येणारी वाहनं जुन्या पुलावरून मुंबईकडं जात आणि मुंबईकडून कोकणात जाणारी वाहनं नव्या पुलावरून पुढं जात.अगोदरच नवीन पुल बांधताना तो खारपाडा येथील पाताळगंगा नदीवरच्या पुलावरील पुलासारखा चौपदरी बांधला गेला असता तर जुन्या पुलाचा वापर करण्याची गरजच भासली नसती.सरकानं पैसे वाचविण्याचा प्रयत्न करताना लोकांच्या जिवाची पर्वा केली नाही.हे आज लख्खपने दिसून आले। जुन्या पुलाला शंभर वर्षे होऊन गेल्यानं या पुलाचं आयुष्य आता संपलं आहे त्यामुळं या पुलावरून होणारी वाहतूक थांबवा हे ब्रिटिश सरकारकडून भारत सरकारला कळविण्यात आल्यानंतरही जुन्या पुलाचा वापर सुरूच ठेवला गेला.असं कऱण्यामागं सरकारची मजबुरी अशी होती की,नवा पुल अरूंद असल्याने दोन्ही बाजुनं येणारी वाहतूक त्याच पुलावरून चालू ठेवली तर वाहतूक खोळंबा होऊ शकत होता.तसं झालं असतं तर बोंबाबोंब झाली असती त्यामुळं चाललंय ना चालू द्या अशा पध्दतीनं पुल वापरला जात होता.बांधकाम मंत्री म्हणतात,या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडीट मे मध्येच केलं होतं.ही मंत्री महोदयांनी मारलेली लोणकढी थाप आहे.वस्तुस्थिती अशी आहे की

नवा पुल झालेला असल्यानं जुन्या  पुलाकडं तसं कोणाचंच लक्ष नव्हतं.पुलावर पिंपळाची झाडं उगवलेली होती,कठडे तुटलेले होते.रंग मारला गेलेला नव्हता.ज्या ज्या छोटया छोटया गोष्टी करणं अपेक्षित होतं ते न कऱणारं सरकार पुलाचं ऑडीट करील हे अजिबात संभवत नाही.शिवाय ज्या व्यवस्थेनं हा पुल बांधला होता ती ब्रिटिश कंपनी आणि ते सरकार जर हा पुल वापरू नये असं म्हणत असेल तर ऑडीट करून तुम्हा त्यावरून वाहतूक सुरू ठेवण्याची तरी गरज काय होती.? म्हणजे सरकारनं काहीही केलेलं नाही.ज्या अधिकार्‍यानी ऑडीट केलंय ते जर या पुलाला उत्तम सर्टिफिकीट देत असताली तर ते अधिकारी एक तर बिनडोक आहेत किंवा त्याना पुलाच्या रचनेतलं काहीच कळत नाही असं म्ङणावं लागेल.कथित ऑडिट कऱणार्‍या अधिकार्‍यांची नाव जाहिर करून सरकारनं त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे.तसं झालं तर काही जणांचा आज बळी घेणारे हरामखोर कोण आहेत हे तरी जगासमोर येईल.मात्र सरकार असं काही करणार नाही याचं कारण सरकारनं ऑडिट वगैरे केलेलंच नाही.

केवळ पुलंच नव्हे तर महामार्गच धोकादायक

मुंबई-गोवा महामार्ग ब्रिटिश कालापासून वापरात आहे.या 475 किलो मिटरच्या मार्गावर अनेक ठिकाणी विविध नद्यांवर तेव्हा पुलं बांंधली गेली होती.ती आजही उभी असली तरी त्या पुलाचं आयुष्य आता संपलेलं असल्यानं ती कधीही हे राम म्हणू शकतात.मंत्री सांगतात आता आम्ही सर्वच पुलाचं ऑडीट करू.ऑडिट करून काय डोंबलं साधणार  काय ? ऑडीट केलं आणि त्यातून हे सारे पुल वाहतुकीस योग्य नाहीत असें जरी दिसून आले  तरी वाहतूक त्याच पुलावरून सुरू ठेवण्याशिवाय सरकारकडं कोणताच पर्याय नाहीत.काऱण महाडजवळच्या पुलाला पर्याय तरी निर्माण झाला होता.अन्य अनेक ठिकाणी कोणतेच पर्याय नसल्याने ते पडेपर्यंत त्यावरून वाहतूक चालू ठेवणं सरकारसाठी क्रमप्राप्त आहे.विषय केवळ पुलांपुरताच नाही.कोकणातून जाणारा मुंबई-गोवा हा संपूर्ण मार्गच धोकादायक झालेला आहे.दरवर्षी या रस्तावर पाचशेच्यावर निष्पाप  माणसं मृत्यूमुखी पडतात.दररोज दीड माणूस रस्त्यावर विविध अपघातात बळी जातो आणि चार माणसं जखमी होतात.हे वर्षानुवर्षे चालू आहे.त्याकडं कोणीच लक्ष देत नाही.आज मोठी दुर्घटना घडली म्हणून सारेच वळवळ करू लागले आहेत मात्र महामार्ग मृत्यूचा महामार्गा झालाय हे आम्ही गेली काही वर्षे बांबोलून सांगतोय तर त्याकडं कोणी बघत नाही.ढोगी राजकीय पक्ष रस्त्याबद्दल बोलत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर कोकणातील पत्रकारांनी रस्त्यावर उतरून तब्बल पाच वर्षे आंदोलनं केली.तेव्हा 2012 मध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुरूवात झाली.पहिल्या 84 किलो मिटरच काम निर्धारित वेळेत म्हणजे डिसेंबर 2014 पर्यंत पूर्ण झालं असतं तर आतापर्यंत इंदापूर ते पोलादपूर हा टप्पा देखील पूर्ण झाला असता आणि सावित्रीवर नवा पुल बांधला जाऊन वाहतूक नव्या पुलावरून सुरू झाली असती तर आजची दुर्घटना होण्याचा देखील प्रश्‍न नव्हता.मात्र या महामार्गाकडं अक्षम्य दुर्लक्ष झालं.मुंबईला जोडणारे किंवा पुण्याला जोडणारे सारे महामार्ग दहा वर्षापूर्वीच झाले होते मात्र दक्षिण भारताला मुंबईशी जोडणारा आणि कोकणची लाईफलाईन असलेला मुंबई-गोवा महामार्गच पूर्ण केला जात नव्हता.राज्यकर्ते उदासिन होते तसेच कोकणातले राजकीय नेतेही याबाबत उदासिन होते.कोकणातल्या राजकीय नेत्यांना कोकणाचा विकास नको आहे,कोकणचा विकास होत गेला तर बाहेरचंं आक्रमण कोकणावर होत राहिल आणि आपल्याच गावात आपण अनोळखी ठरू अशी भिती कोकणातल्या बहुतेक पुढार्‍यांना वाटते.म्हणूनच पत्रकार आंदोलन करीत असताना साधी सहानुभूती दाखविण्याचं सौजन्यही त्यानी दाखविलं नाही .त्यांनी उठाव केला असता,राजकीय दबाव वापरला असता तर कदाचित मुंबई-गोवा चौपदरीकरण केव्हाच झाले असते आणि अशा वारंवार दुर्घटनाही घडल्या नसत्या.

ठीकय आता जे झालं ते झालं आता तरी तातडीने पाहिजे तर युध्दपातळीवर महामार्गच्या चौपदरीकरणाचं काम सुरू करावं,हे करताना अगोदर कोकणातल्या विविध नद्यांवर जे जिर्ण झालेले पुल आहेत ते तातडीने पाडून किंवा वाहतुकीस बंद करून पर्यायी आणि पुढील पन्नास वर्षात वाढणाररी  वाहतूक डोळ्यासमोर ठेऊन नवीन पुल बांधले जावेत ही अपेक्षा आहे.एखादी दुर्घटना घडली की,पुढारी बोल बोल बोलत राहतात,विरोधकही त्याचं भांडवल करीत सरकारची हजामपट्टी करीत असतात पुढे चार दोन दिवसात माध्यमावरील संबंधित बातम्याचा पूर ओसरला की, सत्ताधारी आणि विरोधकांचाही आवेश ओसरलेला असतो.असं चित्र नेहमीचं दिसतं कोकणातल्या जनतेची इच्छा अशी आहे की,पुलाच्या आणि एकूणच मुंबई-गोवा महामार्गाच्या बाबतीत असं होऊ नये.अक्षऱशः हजारो माणसं या महामार्गावर गेली आहेत,त्यामुळं कृपया आता राजकाऱण न करता हा मार्ग तातडीने पूर्ण करावा जेणे करून कोकणात जाणारा माणूस निर्धोकपणे प्रवास करू शकेल.असं झालं तर वारंवार होणार्‍या अशा दुर्घटना टळतील आणि राज्यकर्त्यावर आणि विरोधकांवरही एखादी घटना घडली की मातम कऱण्याची वेळ येणार नाही.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here