नगरमध्ये पेड न्यूजचा सुळसुळाट

0
718

जिल्हय़ात ५ उमेदवारांना नोटिसा
जिल्हय़ातील सात वृत्तपत्रांत शनिवारी प्रसिद्ध झालेल्या बातम्या ‘पेड न्यूज’ असल्याचे प्राथमिक मत झाल्याने माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना पाच उमेदवारांना नोटिसा धाडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपचे श्रीगोंद्यातील उमेदवार बबनराव पाचपुते, नगरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप, पारनेरमधील अपक्ष उमेदवार माधवराव लामखडे, भाजपच्या कोपरगावच्या उमेदवार स्नेहलता बिपीन कोल्हे व शिवसेनेचे उमेदवार आशुतोष काळे या उमेदवारांना ४८ तासांत खुलासा मागवणाऱ्या नोटिसा धाडण्याचे आदेश आहेत.
तीनच दिवसांपूर्वी जिल्हय़ातील सात उमेदवारांच्या संबंधित बातम्या पेड न्यूज असल्याचे समितीचे प्राथमिक मत झाल्याने खुलासा मागवणाऱ्या नोटिसा धाडण्यात आल्या होत्या. या नोटिसांसाठी दिलेली मुदत उलटून गेली तरी अद्याप संबंधित उमेदवारांनी स्पष्टीकरण पाठवले नसल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
जिल्हय़ात सध्या उमेदवारांकडून पेड न्यूजचा धुमाकूळ सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचाराच्या बातम्या, एकाच आशयाच्या स्वरूपात, शब्दाचाही फरक न करता अनेक वृत्तपत्र प्रसिद्ध करत आहेत. अशा स्वरूपाच्या बातम्या पेड न्यूज असल्याचे समितीचे मत आहे. उमेदवारांकडून योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास समिती त्या बातमीला जाहिरात दर लागू करून ते शुल्क उमेदवाराच्या खर्चात जमा करणार आहे.(लोकसत्तावरून )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here