राज ठाकरे पत्रकारावर का भडकले ..?

0
1481

राजकारण्यांना अडचणीचा प्रश्न विचारलेला अजिबात आवडत नाही.असा प्रय़त्न झाला तर मग हे नेते हमखास प्रश्नकर्त्यांच्या अंगावर येतात.पत्रकारंाना हा अनुभव नित्याचा असतो.सोमवारी “राजसाहेब”  ठाकरे यांनी याचं प्रत्यंतर आणून दिलं.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी जंगी जाहीर सभा घेऊन ” आपण स्वतःता विधानसभा  निवडणुकीच्या रिंगणात उतरणार”  असल्याचं जाहीर केलं होतं.प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा “सारा महाराष्ट्र माझा  मतदार संघ ”  असल्याचं सागत त्यांनी आपल्या घोषणेलाच बगल दिली. निवडणूक लढविली नाही. राज ठाकरेंनी निवडणूक का लढविली नाही ?  हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात घर करून राहिला. मुंबईत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीनं आयोजित वार्तालाप कार्यक्रमातही एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला.”आपण निवडणूक लढविण्याचा शब्द दिला होता मात्र तो नंतर फिरविला कशामुळे”? असा पत्रकाराचा साधा,सरळ प्रश्न होता. अर्थातच हा प्रश्न राज ठाकरेंसाठी अडचणीचा होता. त्यामुळं स्वाभाविकपणे त्यांना तो आवडला नाही. राज ठाकरे यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.ते म्हणाले,” याचा खुलासा मी नागपुरच्या पत्रकार परिषदेत केला होता,आज विषय निवडणूक लढविण्याचा नाही पण माझ्या हाती जर सत्ता दिली तर मी बॅकसिटवरून नाही तर पुढं येऊन सरकारचं नेतृत्व करील ” हा मूळ प्रश्नापासून पळ काढण्याचा प्रय़त्न होता.मुख्यमंत्री होण्यासाठी दोन्ही पैकी एखादया सभागृहाचा सदस्य म्हणून सहा महिन्यात निवडून यावं लागतं.सारा महाराष्ट्रच माझा मतदार संघ आहे म्हणणारे राज ठाकरे लोकांमधुन निवडून यायला तयार नाहीत असा त्याचा अर्थ होतो.विधानसभा नाही तर मग दुसरा पर्याय उरतो विधानपरिपदेचा.त्यामुळं हळुच कोणी तरी  विधान परिषदेवर जाणार कायµ? असा प्रश्न विचारला.हा सवाल देखील खटकणारा होताच. सभागृहात एकच खसखस पिकली.त्यामुळं राज पुन्हा अस्वस्थ झाले.

राज ठाकरे मूळ प्रश्नाला बगल द्यायचा प्रय़त्न करीत असले तरी पहिला पत्रकार  राज ठाकरेंचा पिच्छा सोडायला तयार नव्हता.त्यानं पुन्हा विचारलं, ” सर्वच्च नेत्यानं निवडणूक लढविण्याचा शब्द देऊन पलटी का खाल्ली.? पलटी हा शब्द राज ठाकरेंना आवडला नाही.त्यांनी सरळ सरळ संबंधित पत्रकाराला दमच दिला, “शब्द जरा जपून वापरा,मला कटघरात उभं करायचा प्रयत्न करू नका” .प्रश्नकर्त्या पत्रकाराचं अभिनंदन यासाठी की,राज ठाकरे संतापल्यानंतरही पत्रकार मित्रानं निर्धारानं सांगितलं की, “मी जपून आणि विचारपूर्वकच शब्द वापरतोय”.राज ठाकरे डोळे वटारतात किंवा आवाज चढवतात तेव्हा भले भले मांजर होतात.लोकसभा निवडणुकीच्या वेळेसही स्वतःला मोठे संपादक समजणाऱ्या काही पत्रकारांना राज ठाकरे यांनी अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली होती.अर्णव गोस्वामी असतील,राजदीप सरदेसाई किंवा अन्य संपादकांनी तेव्हाच राज ठाकरेंना आवरत “आम्ही तुमची मुलाखत ध्यायला आलोत,तुमचे अपशब्द ऐकायला नाही” असं सुनवत ते मुलाखत गुंडाळून बाहेर पडले असते तर कदाचित सोमवारचा प्रसंग घडला नसता.दुदैर्वानं तेव्हा या बड्या पत्रकारांनी राज यांची दमदाटी निमूटपणे ऐकून घेतली.या तुलनेत काल आपल्या प्रश्नाचा पाठलाग कऱणारा पत्रकार नक्कीच आपल्या भूमिकेला जागला असं आम्हाला वाटतं.

मुंबईतील या घटनेनं एक गोष्ट स्पष्ट झाली की,शब्द जपून वापरण्याचा सल्ला पत्रकारांना देणारे राजकारणी पत्रकारांसाठी ठेवणीतले शब्द उपयोगात आणत असतात.तेव्हा शब्द जपून वापरा म्हणून कोण सांगणारµ` ?.पत्रकारांनी पलटी हा शब्द वापरला तरी त्यांना तो अपमानास्पद किवा कटघऱ्यात उभा करणारा शब्द वाटणार.ही गंमत आहे.देशात असे काही राजकारणी आहेत की,ते पत्रकारांना ठोकण्याची एकही संधी दवडत नाहीत.राज ठाकरे यांनाही पत्रकारांचा अवमान करण्यात आपण मोठा शेर मारल्याचा आनंद  होत असतो.पत्रकारांचा पानउतारा कऱण्याची एकही संधी न सोडणारे राज ठाकरे पत्रकारांनी शब्द जपून वापरावेत अशी अपेक्षा करतात.जी मंडळी सार्वजनिक जीवनात वावरत असते त्यांना प्रश्न विचारले जाणारच,ज्यांना प्रश्नच विचारलेले आवडत नाहीत त्यांनी किमान प्रश्न निर्माण होणारच नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.एकदा महाराष्ट्र माझ्या हातात द्या म्हणणाऱ्या मनसे प्रमुखांना नाशिक हातात देऊन पाहिले तेथे काय केले असा प्रश्न विचारला जाणार किंवा वारंवार टोल आंदोलनं जाहीर करून ती अचानक मागं घेतली गेल्यानं पत्रकारांकडून प्रश्न येणारच .त्यावर संतापून किंवा प्रश्नांना बगल देऊन भागणार नाही.जनता सारं पहात असते.महाराष्ट्र माझ्या हाती द्या असं सांगणाऱ्या नेत्याच्या पक्षाला साऱ्याच ओपिनियन पोलवाल्यांनी दहा पेक्षाही कमी जागा दिलेल्या आहेत.दहा जागा आणि मुख्यमंत्रीपद हे गणित जमत नाही.पत्रकारानं प्रश्न विचारल्यावर त्याच्या अंगावर भडकल्यानं एकाच तोंड बंद करता येईल पण लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचं काय करणार हा प्रश्न उरतोच.महाराष्ट्र माझ्या हाती द्या असं म्हणणाऱ्यांनी याचा विचार केलाच पाहिजे.(SM)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here