2016 ठरले पत्रकारांसाठी धोक्याचं साल
जगात दर पाचव्या दिवशी एका पत्रकाराची हत्त्या  
1992 पासून जगात 1228 पत्रकारांच्या हत्त्या
2016 मध्ये 57 पत्रकारांच्या हत्त्या ( ज्यांच्या हत्त्येचे कारण स्पष्ट झालेले नाही अशा 27 पत्रकारांचा यामध्ये समावेश नाही )
2016 मध्ये 259 पत्रकारांना विविध देशातील तुरूंगात डांबले गेले आहे.
विविध देशांतून हकालपट्टी झालेल्या पत्रकारांची संख्या 452 एवढी आहे.( 2010 पासून आजपर्यंत )  

 पॅरिस ः आपले कर्तव्य पार पाडताना जगभरात 2016 मध्ये तब्बल 57 पत्रकारांची हत्त्या केली गेलीय.गत वर्षी ही संख्या 67 एवढी होती.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीची आकडेवारी कमी असली तरी 57 पत्रकारांची हत्त्या होते ही बाब जागतिक चिंतेची नक्कीच आहे.सिरिया पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक देश ठरला आहे.तेथे 19 पत्रकार मारले गेलेत.अफगाणिस्तानमध्ये 10 आणि मेक्सिको,इराकमध्ये प्रत्येकी पाच पत्रकारांच्या हत्त्या झाल्यात.मारले गेलेले पत्रकार स्थानिक पातळीवर काम करणारे होते.रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने जाहीर केेलेल्या अहवालात ही आकडेवारी दिली गेली आहे.अर्थात या संस्थेपर्यंत न पोहोचलेल्या मात्र हत्त्या झालेल्या पत्रकारांची संख्याही मोठी आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाची आकडेवारी कमी असण्याचं कारणही संस्थेनं आपल्या अहवालात दिलंय.त्यात म्हटलंय की,अनेक पत्रकारांनी सिरिया,इराक,लिबिया,यमन,अफगाण,आणि बुरांडी हे देश सोडले आहेत.ज्या देशात अशांतता आहे अशा काही देशांनी पत्रकारांची हकालपट्टी केली असल्यानं बातम्या जगापर्यंत येण्यास मार्ग उरलेला नाही.वरील आकडेवारी खेरीज आठ ब्लॉगर्स आणि अन्य आठ मिडियाकर्मींची देखील वर्षभरात हत्त्या झालीय.अनेक देशात पत्रकारांवर कमालीची दहशत असल्याने पत्रकारांनी आणि मिडिया हाऊसेसनं स्वतःवरच सेन्सॉरशीप घालून घेतलीय.अफगाणमध्ये मारले गेलेले दहा पत्रकार केवळ ते पत्रकारिता करतात म्हणूनच मारले गेलेत.तोलो टीव्हीच्या एका मिनिबसवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तीन महिला पत्रकारांसह सातजणांचा मृत्यू झाला होता.या हल्ल्याची जबाबदारी नंतर तालिबानने घेतली होती.यमनमध्ये हुती बंडखोर आणि सौदीअरब समर्थक दलांमध्ये झालेल्या चकमकीत 2015 पासून आजपर्यंत सातहजार लोक मारले गेले आहेत.हा संघर्ष पत्रकारांसाठी देखील जीवघेणा ठरला असून त्यात पाच पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
संस्थेचे महासचिव क्रिसटोफे डेलोईर यानी म्हटले आहे की,पत्रकारांवर झालेले हल्ले जाणीवपूर्वक ,ठरवून झालेेले आहेत.केवळ ते पत्रकार आहेत हाच एकमेव त्यांचा गुन्हा आहे.पत्रकारांच्या संरक्षणासाठी विशेष कायदेशीर तरतूद करण्याची गरज असल्याचे मत आता जाहीरपणे व्यक्त व्हायला लागलं आहे.2016 मध्ये भारतात दोन पत्रकारांच्या हत्त्या झाल्या आहेत मात्र वरील आकडेवारीत त्याचा उल्लेख नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here