रत्नागिरीः महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणारी छोटी आणि जिल्हा वर्तमानपत्रे जगली पाहिजे ,त्यासाठी सरकारने विशेष पॅकेज दिले पाहिजे असे मत मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

रत्नागिरी येथील दैनिक रत्नभूमीच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे होते.

एस.एम.देशमुख यांनी जिल्हस्तरीय पत्रांच्या आपआपल्या भागातील विकास,प्रबोधन,शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल मुक्तकंठानं कौतुक केलं.भांडवलदारी पत्रांनी जिल्हा आवृत्या सुरू केल्या मात्र जिल्हयातील प्रश्‍नांबद्दल,विकासाबद्दल  जी तळमळ,जो आपलेपणा  जिल्हास्तरीय पत्रांना वाटतो तसा तो बाहेरून येणार्‍या पत्रांमध्ये दिसत नाही हे वास्तव आहे.वृत्तपत्रसृष्टीतील स्पर्धेचं देशमुख यांनी स्वागत केलं मात्र ही स्पर्धा दोन समान मल्लांमध्ये असली पाहिजे.मात्र एकीकडं बलाढ्य मल्ल आणि दुसरीकडं सर्वार्थानं दुबळे जिल्हा वर्तमानपत्रे अशी ही विषम स्पर्धा आहे.या स्पर्धेतही टिकून राहण्याचा प्रयत्न जिल्हा पत्रे करीत असताना त्यांना मदत करणे हे कल्याणकारी सरकारचे कर्तव्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.मोठी पत्रे जेव्हा जिल्हयात येतात तेव्हा त्याची किंमत एक रूपया किंवा त्यापेक्षाही कमी असते.त्यामुळं स्थानिक पत्रांना स्पर्धा कऱणे अवघड होऊन जाते.एकीकडं कमी किंमती ठेऊन स्पर्धकांना नामशेष करायचे आणि दुसरीकडे परवडत नाही म्हणून ओरड करायची ही मोठया पत्रांची भूमिका योग्य नसल्याचे सांगून देशमुख म्हणाले,एक रूपयांत परवड नसेल तर एक रूपये किंमत ठेवा असं वाचकांनी सांगितलेलं नाही.ज्यांना परवड नाही अशा पत्रांनी आपल्या अंकाच्या किंमती जरूर वाढवायत असं मतही देशमुख यांनी व्यक्त केलं.

छोटया पत्रांना मिळणार्‍या सरकारी जाहिरातींचे प्रमाण कमी केले गेले आहे,जाहिरातींचे आकारही कमी केले गेले आहेत.त्यातच सरक ारनं जाहिरातीचे धोरण ठरविणयासाठी जी समिती नेमली आहे त्यातही छोटया पत्रांच्या प्रतिनिधींना स्थान दिलेलं नाही.त्यामुळं नवे जाहिरात धोरण हे छोटया आणि जिल्हास्तरीय पत्रांच्या मुळावर येणारेच असणार आहे.अशा स्थितीत छोटया आणि जिल्हास्तरीय तसेच विभागीय पत्रांनी एकत्र येत दबावगट तयार कऱण्याची गरज असून त्यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढाकार घेऊन जिल्हास्तरीय पत्रांचे संपादक आणि मालकांची लवकरच एक बैठक घेणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

रत्नभूमीच्या रत्नागिरी जिल्हयातील योगदानाचा त्यानी गौरवपूर्ण उल्लेख केला.ज्या काळात कोकणात वर्तमानपत्रे काढणं म्हणजे हात भाजून घेणं अशी स्थिती होती त्याकाळात भिकाजी पालांडे यांनी दैनिक रत्नभूमी सुरू केलं.रत्नभूमीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हयाचं हित जपण्याची कामगिरी त्यांनी पार पाडली.नंतरच्या काळात पालांडे परिवारावर विविघ आघात झाले तरीही आज धनश्री पालांडे यांनी रत्नभूमी सुरू ठेवला आहे.त्याचं कौतूक झालं पाहिजे.एक महिला एक दैनिक समर्थपणे चालवते असे उदाहरण महाराष्ट्रात तरी दुसरे नाही हे देखील देशमुख यांनी स्पष्ट केलं.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.गणेश मुळे यांनीही जिल्हास्तरीय दैनिकाच्या योगदानाची प्रशंसा केली.परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांनी रत्नभूमीने राज्यात अनेक कर्तबगार पत्रकार निर्माण केले,त्याअर्थानं रत्नभूमी हे पत्रकारितेचं विद्यापीठचं असल्याचे सांगितले.यावळी गेली पन्नासवर्षे रत्नभूमीला मदत करणार्‍या कर्मचारी,हितचिंतकांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान कऱण्यात आला.प्रास्ताविक संपादक,मालक धनश्री पालांडे यांनी  केलं.श्रुती पालांडे यांनी सर्वाांचं स्वागत केलं.रत्नागिरी मधील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here