चिरनेरच्या हुतात्मा स्मारकासाठी सरकारजवळ पैसा नाही 

0
1001
रायगडच्या गौरवशाली इतिहासात महाडचा सत्याग्रह,गोवा मुक्ती लढा,जंजिरा मुक्ती लढा,चरीचा   शेतकरी संपाएवढेच महत्व चिरनेरच्या जंगल सत्याग्रहास आहे.जंगलावर अवलंबुन असलेल्या गरीब आणि आदिवासींच्या उपजिविकेच्या साधनांवरच जंगल कायद्याच्या माध्यमातून इंग्रजांनी बंदी घातल्यानं त्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली होती.राजकीय आणि सामाजिक दृष्टया जागरूक असलेल्या रायगडातही त्याचे तीव्र पडसाद उमटले.उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी झालेला जंगल सत्याग्रह हा त्याचाच भाग होता.नियोजित कार्यक्रमानुसार परिसरातील हजारो शेतकरी कायदेभंग कऱण्यासाठी आक्कादेवीच्या डोंगरावर जमा झाले.आदोलकांपैकी बहुतेकजण अशिक्षित आणि सामांन्य कुटुंबातील होते. आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी कुर्‍हाडीने सागाच्या झाडावर वार करायला सुरूवात केली.आंदोलकांच्या या कृतीनं फौजदार राम डी.पाटील याचं पित्त खवळलं.त्याने मामलेदार केशव जोशी यांच्याकडे जमावावर गोळीबार करण्याची परवानगी मागितली .मात्र जोशींनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या स्वातंत्र्यप्रेमी जनतेवर गोळ्या झाडण्यास नकार दिला.परवानगीही नाकारली.त्यामुळे पाटील अधिकच खवळले आणि त्यांनी थेट मामलेदार जोशींवरच गोळ्या झाडून त्यांना ठार केले.हा प्रकार पाहून जमाव उग्र बनला.हिंसकही झाला.फौजदाराकडचं पिस्तुल हिसकावून घेत  त्याला चोप दिला गेला.मग या संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला.त्यात अत्यंत सामान्य कुटुंबातील नाग्या महादया कातकरी,रामा बामा कोळी,हसुराम बुधोजी धरत,धाकू गवत्या फोकेरकर,आनंद माया पाटील,परशूराम रामा पाटील,आलू बेमटया म्हात्रे,रघुनाथ मोरेश्‍वर न्वाही,काशीनाथ बुध्या पाटील अशा ऩऊ सत्याग्रहींना हौतात्म्य प्राप्त झाले.चिरनेरच्या जंगलातील  गोळीबाराचे पडसाद तेव्हा देशभर उमटले.भारत स्वतंत्र झाल्यानंतर चिरनेर येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं.दर 25 सप्टेंबर रोजी तेथे अधिकारी आणि पदाधिकारी हुतात्म्यांना अभिवादन  करतात.मात्र अलिकडे या कार्यक्रमातलं गांभीर्य तर हरवून गेले आणि हा कार्यक्रमही एक सोपस्काराचा भाग बनला.कार्यक्रमाच्या निमित्तानं होणारी राजकीय कुरघोडी दरवर्षी येथे हमखास बघायला मिळते.चिरनेर येथे दर 25 सप्टेंबरला घोषणा -प्रतिघोषणांचे बार उडतात.मात्र होत काहीच नाही.चिरनेर जंगल सत्याग्रहांतील हुतात्म्यांच्या स्मारकांची दुर्दशा झाली आहे.निधी नसल्यानं या स्मारकाची देखभालही ठेवली जात नाही.त्यामुळं हे हुतात्मा स्मारक जुगार्‍याचे अड्डा बनले आहे.चिड आणि संताप आणणारी ही सारी स्थिती आहे.हुतात्मा स्मारकाची जी दुर्दशा झालीय त्याकडं कोणीच लक्ष देत नाही.”पुढच्या वर्षी स्मारकाचं सुशोभीकरण नक्की करू”  अशा  थापा मारून पुढारी पसार होतात.अधिकारी कानावर हात ठेवतात. पण  पुढचे वर्ष कधीच येत नाही.त्यामुळे ज्यांनी देशासाठी सर्वस्वाचं बलीदान दिलं त्यांच्या स्मारकाची दुर्दशा बघवत नाही.त्याबद्दल उरण तालुक्यात संताप आहे.थापाडे राजकारणी उद्या शुक्रवारी कोण कोणत्या थापा मारतात ते आता बघायचं .स्थानिक पुढारी काहीच करत नसतील तर सरकारनं तरी आज विशेष अनुदान देऊन चिरनेरचा जंगल सत्याग्रह आणि त्यातील आदिवासी आणि  सामांन्य वर्गातील जनतेच्या सहभागाचा इतिहास कायम नव्या पिढीला स्फुर्ती देत राहील असे काही करावे एढीच अपेक्षा ( एस.एम)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here