चलो मुरू,चलो मुरूड

0
747

रायगड प्रेस क्लबच्यावतीनं मुरूड मुक्ती दिनाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.या वर्षी हा कार्यक्रम उद्या 31 जानेवारी रोजी व्यापक प्रमाणात साजरा केला जात आहे.मुरूड हे म्हसळा,श्रीवर्धन आणि मुरूड तालुक्यापुरतंच संस्थान असलं तरी भौगोलिकदृष्टया त्याचं स्थान फार महत्वाचं होतं.देशातील सारी संस्थानं स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतरही जी चार-दोन संस्थानं भारतात विलीन व्हायला तयार नव्हती त्यात मुरूड संस्थानाचीही समावेश होता.मुरूडच्या नवाबाला पाकिस्तानात सामील व्हायचं होतं.त्यासाठी त्याची खटाटोपही सुरू होती.मात्र रायगडातील देशप्रेमी जनतेनं नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभी करून नवाबाला शरण यायला भाग पाडलं.कोणताही हिंसाचार न होता,रक्ताचा थेंबही न सांडता मुरूड स्वतंत्र झाले.31 जानेवारी 1948 रोजी नवाबानं सामिलनाम्यावर स्वाक्षरी केली आणि मुरूड जंजिरा स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग बनले.मात्र 30 जानेवारी रोजीच महात्मा गांधी यांची हत्त्या झाल्यानं मुरूडच्या स्वातंत्र्याचा आनंद कोणाला उपभोगता आला नाही.या लढ्यात जे लढले त्या विरांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जाही मिळाला नाही.आम्हाला मानधन नको पण आम्ही स्वातंत्र्यसैनिक होतो एवढं तरी मान्य करा असा त्यांचा आवाज सरकारपर्यत कधी गेलाच नाही.फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतला तर हयात असलेल्या चार दोन स्वातंत्र्य सैनिकांना नक्कीच आनंद होईल.
दहा वर्षापूर्वी पहिल्यांदा आम्ही मुरूड मुक्ती दिन साजरा केला.त्यावेळेस मी तेथे उपस्थित होतो.आम्ही तेरा स्वातंत्र्य सैनिकांचा तेव्हा सत्कारही केला होता.उद्या पुन्हा हा मुक्ती दिन साजरा केला जात आहे.रायगडच्या पत्रकार मित्रांची इच्छा आहे की,मी या कार्यक्रमास यावं.पाय अजून पूर्ण बरा झाला नाही पण पत्रकारांच्या आग्रहाखातर मी मुरूडला आज जात आहे.एक वेगळा सोहळा साजरा होतोय.त्यात सहभागी होण्याचा नक्कीच आनंद आहे.जाता जाता एकच खंत आहे,दहा वर्षापासून सुरू असलेल्या या कार्यर्कमास एकही पुढारी निमंत्रण देऊनही उपस्थित राहात नाही.प्रत्येक बाबींकडे जातीय आणि धार्मिकतेच्या चष्म्यातून पाहण्याची वृत्ती हे याच कारण आहे.या पुढाऱ्यांवाचून रायगडच्या पत्रकारांचं काही अडत नाही ही आनंदाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here