कोकणात राष्ट्रवादी कोमात

0
1341

कोकणात राष्ट्रवादीत पळापळ 

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकाप याचं सख्य कधीच नव्हतं.कॉग्रेसमध्ये असताना सुनील तटकरे 1994 च्या सुमारास जेव्हा  अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी पहिलं  कोणतं  काम केले असेल तर जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या इमारतीवर कोरलेली  सेवेचे ठायी तत्पर पाटील प्रभाकर ही अक्षरं मिटविण्याचं.या वरून तेव्हा बरंच रामायण घडलं होतं.त्यानंतर ही जुगलबंदी आणि शह-काटशह पाच वर्षे रायगडमधील जनतेला पहायला मिळाले.नंतरच्या काळात सुनील तटकरे आमदार झाले.राज्यमंत्री झाले.तेव्हा जिल्हा परिषदेच्या राजकारणाचे निमित्त करून शेकापनं सुनील तटकरे यांच्यावर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आणली होती.तो राग अनेक वर्षे तटकरेंच्या मनात होता.त्यामुळे संधी मिळेल तेव्हा शेकापला ठेचून काढण्याचा सुनील तटकरे प्रयत्न करीत असत.वेगवेगळ्या पध्दतीनं शेकापला नामोहरम करण्याची एकही संधी तटकरेंनी सोडली नव्हती.या सार्‍याचं उट्टं शेकापनं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस काढललं .ही वेळ सुनील तटकरेंच्या सिंचन घोटाळा पुढे आला तेव्हाची होती.शेकापनं याचं प्रचंड भांडवल केलं.आपल्या मुखपत्रातून काळी श्‍वेतपत्रिका शेकापनं प्रसिध्द केली.त्यावर तटकरेंनीही संपादकांच्या नावाने शंभर कोटीचा दावा दाखल कऱण्याच्या वल्गना केल्या.एकीकडं हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषदेत सत्ता उपभोगत होते.दुसऱीकडं परस्परांवर चिखलफेकही करीत होते.शेकापच्या प्रखर मारा आणि शेकापनं उभ्या केलेल्या उमेदवारामुळं सुनील तटकरेंचा लोकसभेत निसटत्या मतांनी पराभव झाला.राज्यातही पक्षाच्या हातून सत्ता गेली. भुजबळ आत गेले.अजित पवार,सुनील तटकरे यांच्यावर टांगती तलवार ठेवली गेली.यामुळं पक्षाचं मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण झालं.दुसरीकडं कोकणात शिवसेनेचा झंझावात पुन्हा घोंघाऊ लागला.नारायण राणे पराभूत झाले होते.अपेक्षेपेक्षाही चांगलं यश शिवसेनेने मिळविलं होतं.या वादाळात राष्ट्रवादीची अवस्था फारच केविलवाणी झाली .शेकापच्या हातीही फार काही पडलं नव्हतं.विवेक पाटलांसारखा मोहरा  पराभूत झाला होता.पक्षाला जेमतेम दोन जागा जिंकता आल्या होत्या.कोकणातील या राजकीय बदलाची जाणीव सुनील तटकरे यांना जशी झाली तशीच ती शेकापच्या जयंत पाटील यांनाही झाली.ही वेळ परस्परांच्या खपल्या काढण्याची नसून अस्तित्वासाठी दोघांनाही एकत्र येण्याची आहे हे या दोन्ही चाणाक्ष नेत्यांनी हेरलं .असं झालं नाही तर आपण जिल्हयाच्या आणि राज्याच्या राजकारणात संदर्भहिन होऊ शकतो याची दोघांनाही कल्पना असल्यानं सारं हलाहल पचवत,झालं गेलं कुंडलिकेला मिळालं या उक्तीचा प्रत्यय देत हे दोन्ही नेते एकत्र आले.म्हणजे शेकाप-राष्ट्रवादी ही जनतेला मान्य नसलेली युती ही दोन्ही पक्षांची स्वार्थ प्रेरित राजकीय मजबुरी होती.शिवसेनेनं कोकणात परत एकदा जे आव्हान निर्माण केलंय त्याचा मुकाबला आपण एकएकटे करू शकत नाहीत त्यामुळं हे आव्हान परतवून लावायचं तर सारं शत्रूत्व विसरूलं पाहिजे अशी ख़ूणगाठ मनासी बांधत परस्परांना कायम पाण्यात पाहणारे हे दोन्ही नेते एकत्र आले.असं कसं होऊ शकतं ? हा प्रश्‍न पत्रकारांनी आम . जयंत पाटील यांना विचारला तर ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो’ हे वापरून वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य त्यांनी पत्रकारांच्या तोंडावर फेकलं.हे वाक्य नेत्यांसाठी खऱंही असेल पण राजकारणात प्रसंगानुरूप निर्माण झालेला वैरभाव कार्यकर्ते मात्र विसरत नाहीत.1994 पासून अगदी परवा-परवा पर्यंत अनेक गावातील शेकाप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी किंवा नेत्यांच्या सांगण्यावरून परस्परांची डोकी फोडली आहेत.मारहाणीचे गुन्हे दाखल झालेले दोन्ही बाजुचे असख्य कार्यकर्ते आजही न्यायालयाच्या फेर्‍या मारताना दिसत असतात.अनेक गावं अशी आहेत तिथं दोन्ही पक्षातून आजही आडवा विस्तव जात नाही.अशी सारी स्थिती असताना रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीत जेव्हा दोन्ही पक्ष परस्परांच्या गळ्यात गळे घालणारची बातमी आली तेव्हा दोन्हीकडे मोठीच खळबळ उडाली.ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी शड्डू ठोकायचे त्यांनाच टाळी द्यायची आदेश जेव्हा स्थानिक पक्षनेतृत्वाने दिले तेव्हा असंख्य कार्यकर्ते हतबल झालेले दिसले. अस्वस्थतेमुळं मग दोन्ही तंबूत पळापळ सुरू झाली.खोपोलीत शेकापचे काही जण भाजपच्या तंबुत डेरेदाखल झाले तर तिकडे मुरूडमध्ये सुनील तटकरेंच्या विश्‍वासातील काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.खुद्द तटकरेंच्या रोहयातही विद्यमान नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्यावर बंडखोरी करण्याची वेळ आली.अगदी शेवटच्या क्षणापर्यत त्यांना नगराध्यक्षपदाचे तिकिट दण्याचे अमिष दाखवत झुलवत ठेवलं गेलं होतं.ऐनवेळी संतोष पोटफोडे या आपल्याच नातेवाईकाला तटकरेंनी नगराध्यक्षपदाचे तिकिट दिल्याने समीर शेडगे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.हा तटकरेंसाठी मोठाच फटका आहे.दुसरीकडे तटकरेंच्याघरातच मग फूट पडली.संदीप तटकरे गेली काही दिवस नगराध्यक्ष होण्याची स्वप्न पहात होते.मात्र ऐनवेळी त्यांनाही डावलले गेले.संदीपचे थोरले बंधू आमदार आहेत.धाकटा नगराध्यक्ष झाला तर आपल्या मुलांसाठी काहीच शिल्लक राहणार नाही ही यामागे एका पित्याला पडणारी चिंता होती.त्यातून संदीपला डावलले गेले.त्यामुळे संदीप तटकरे शिवसेनेतर्फे निवडणूक लढवू लागले आहेत.हा मोठाच फटका होता.ऐनवेळी अन्य उमेदवारांनी माघार घेतली आणि संदीपला पाठिंबा दिला तर तटकरेंची रोहयात डाळ शिजणे अशक्य होणार आहे. .लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना रोह्यानंच अस्मान दाखविले होते हे इथं विशेष महत्वाचं आहे.अलिबागमध्ये देखील तटकरेंची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे.कारण तिथं शेकापबरोबर युती असली तरी शेकापनं शहरातील एकही जागा राष्ट्रवादीला दिलेली नाही.त्यामुळं ही कसली युती ? हा प्रश्‍न पक्षातच विचारला जात आहे.शेकापबरोबर जाण्याचा हा निर्णय म्हणजे अलिबाग तालुक्यातुन पक्ष हद्दपार करण्यासारखा आहे अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात असल्याने येत्या काही दिवसात काही कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकतील अशी शक्यता आहे.अलिबागमध्ये प्रशांत नाईक हे शेकापचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.त्यांची लोकप्रियता,त्यांचं काम त्यांचं सर्वसामांन्याशी असलेलं नातं,आणि त्यांचा मृदू स्वभाव यामुळं त्यांना पराभूत करणं अवघड असलं तरी राष्ट्रवादी-शेकापविरोधात अलिबागेत भाजप आणि कॉग्रेसची एक महाआघाडी तयार झाली आहे.त्यामुलं सामना तिथंही रंगणार आहेच.

अनेक वर्षांचे शत्रूत्व विसरून शेकाप-राष्ट्रवादी कशासाठी एकत्र आली या प्रश्‍नावर कोणतंही तात्विक उत्तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडं नाही.’शिवसेना हा जातीयवादी आणि धर्मांन्ध विचारांचा पक्ष आहे’ हा बकवास आता मतदारांच्या गळी उतरणे अवघड आहे.कारण प्रसंगानुरूप दोन्ही पक्षांनी या कथित जातीयवादी पक्षांबरोबर जिल्हा परिषदेत किंवा अन्य स्थानिक पातळीवर संसार केलेला आहे.म्हणजे यांचा जेव्हा संसार सुरू होता तेव्हा भाजप-सेना जातीयवादी नव्हते आणि आता ते जातीयवादी आहेत असं म्हणणं कोणीच मनावर घेणार नाहीत.राज्य सरकारवर तोंडसुख घ्यावं तर शेकापचे नेते आमचे मुख्यमंत्री -गडकरी यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे सांगत असतात.त्यामुळं सरकारवरही जहरी टीका करण्याची सोय नाही.याउलट विरोधकांकडे अनेक मुद्दे आहेत.मुळात अ‍ॅन्टीइन्कंबन्सी फॅक्टरचा फटका या दोन्ही पक्षांना अनेक ठिकाणी बसू शकतो.खोपोली,मुरूडमघ्ये राष्ट्रवादीची सत्ता होती.तेथे मोठी फूट पडली आहे.माथेरानमध्येही शिवसेनेने प्रभाव निर्माण केलेला आहे.शिवसेनेत फाटाफूट झाली नाही तर रायगडमध्ये अन्य पक्षांना निवडणुका कठिण आहेत हे आजचे चित्र आहे. शिवाय सिंचन घोटाळे आणि दोन्ही पक्षांनी केलेली अनैतिक युती यावरूनही विरोधक राण उठवू शकतात.या मुद्यांवर दोन्ही पक्ष नक्कीच बॅकफुटवर जावू शकतात.त्यावर मात करण्यासाठी कॉग्रेसला बरोबर घेऊन तिसरा भिडू आपल्या तंबूत घेण्याचा प्रयत्नही होत आहे.माथेरा-मुरूड- श्रीवर्धन आदि ठिकाणी तो प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय.अलिबागमध्ये ते शक्य नाही.महाडमध्येही ते शक्य होईल असं वाटत नाही.कारण तिकडं माणिक जगताप यांना आणि अलिबागमध्ये मधु ठाकूर यांना आपला गड राखणं आवश्यक असल्याने हे दोन्ही नेते शेकाप किंवा राष्ट्रवादीबरोबर जाणार नाहीत हे नक्की.शिवाय आज कणखर नेतृत्वाऐवजी कॉग्रेस जिल्हयात गलीतगात्र झालेली असल्यानं ती कुणाबरोबर आहे यानं फार काही फरक पडणार नाही.याचा अर्थ दोन्ही पक्ष एकत्र आलेले असले तरी सामना वाटतो तेवढा सोपा नाही.जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेवढ्या प्रतिष्ठेच्या आहेत तेवढ्याच त्या अस्तित्वाच्याही आहेत त्यामुळं हे दोन्ही नेते आपली सारी प्रतिष्ठा आणि शक्तीपणाला लावणार हे उघड आहे.

रत्नागिरीत राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर 

रायगडात ही स्थिती आहे.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही राष्ट्रवादीला स्थिती फारच कठीण आहे.रत्नागिरीत राजापूर,रत्नागिरी,दोपीली,चिपळूण,खेड आदि ठिकाणी निवडणुका होत आहेत.भास्कर जाधव हे रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे प्रभावी नेते.मात्र भास्कर जाधव आणि सुनील तटकरे यांच्यात कधीच संख्य नव्हतं.जाधव शिवसेनेतून राष्ट्रवादीत आल्यापासून सुनील तटकरेंनी कायम त्यांचा दुःश्‍वास केला.अ.र.अंतुले यांच्यानंतर कोकणचे भाग्यविधाते आपणच आहोत हे लोकमनावर ठसविण्यासाठी तटकरेंनी कोकणात पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी तयार होऊ दिला नाही.भास्कर जाधव हे धडाडीचे नेते आहेत.बहुजन समाजाचं नेतृत्व ते करतात.नारायण राणे यांच्याप्रमाणेच धाडसी नेते म्हणून रत्नागिरीत त्यांचा दबदबा आहे.हे तटकरेंना माहिती असल्याने तटकरे यांनी कायम त्यांना डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे.म्हणायला तर सिंधुदुर्ग -रत्नागिरीची जबाबदारी भास्कर जाधव यांच्याकडं असली तरी त्यांना डावलून सारे निर्णय होत असतात.चिपळूण हा जाधवांचा बालेकिल्ला.मात्र येथेच त्यांनी लक्ष घालू नये असं सांगत चिपळूणचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडं दिल्यानं स्वाभाविकपणे जाधव दुखावले.याचा परिणाम त्यांचे सैन्य शिवसेनेच्या तंबुत डेरेदाखल झालं आहे.राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष शेखर निकम हे देखील बाजुला बसून सारा तमाशा पहात आहेत.या संदर्भात रमेश कदम यांनी भास्कर जाधव यांनी पक्षाची वाट लावली असं म्हणणं फारच बोलकं आहे.या सार्‍या घडामोडी घडत असताना शरद पवार यांनी भास्कर जाधवांना बोलावून त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याने जाधवांचे समाधान झालेले नाही.त्यामुळं ते काय निर्णय घेतात यावर पक्षाचे रत्नागिरीतील भवितव्य बर्‍याच अंशी अवलंबून आहे.गेली आठ-दहा दिवस रत्नागिरीतील  राष्ट्रवादीचा एक बडा नेता पक्षाला सोडचिठठ्ी देणार असल्याच्या बातम्या येत आहेत.हे बडा नेता कोण असावा हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही.असं काही झालंच तर शिवसेना अधिक लाभात राहणार हे दिसतच आहे

सिंधुदुर्गातही शिवसेना प्रभावी

सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीला आता फार स्थान नाही.वेंगुर्ल्यातील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांनी पक्षाला तडाखा लगावला आहे.त्यामुळं तेथे पक्षाची वाताहत होणार हे स्पष्ट झालेलं आहे.सावंतवाडीत दीपक केसरकर आपला गड टिकवून ठेऊ शकतात.मालवणमध्ये अगोदरच राणेंकडे निसटते बहुमत होते.आता सत्ता खासदारकी,आमदारकी असलेल्या शिवसेनेला तेथे आपली हुकुमत स्थापित कऱण्याची संधी आहे.वैभव नाईक त्यासाठी प्रयत्न करीत आहेत.यासाठमारीत राष्ट्रवादी कोठेच नाही.त्यामुळं कोकणातील ही परिस्थिती पक्षासाठी कधी नव्हे एवढी चिंताकरण्यासारखी आहे .सुनील तटकरे हे चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात.प्रसंगानुरूप लवचिकता आणि कठोरता हे दोन्ही गुण त्यांच्याकडं आहेत.राजकारणात कसे मोहरे खेळवायचे हे त्यांच्या एवढं दुसऱं कोणालाच माहिती नाही.मात्र अशा हुशारीनं लोकांना आपण नेहमीसाठी मूर्ख बनवू शकत नाहीत हे ते लक्षात घेत नसावेत.प्रत्येकाकडं शंकेच्या नजरेनं बघायचं,कायम समोरच्याकडून आपणास धोका आहे असं गृहित धरून त्याच्याशी हातचं धरून वागायचं,कोणी मोठा होत असेल तर त्याचे पंख लगेच छाटायचे असं राजकारण त्यांनी गेली पंधरा वीस वर्षे कोकणात केलं.यातून त्यांची व्यक्तिगत दहशत नक्कीच निर्माण झाली,कार्यकर्ते तटकरेंच्या नावानंही चळचळा कापू लागले,तटकरेंशी पंगा घेणं याचां अर्थ आपण राजकीय विजनवासात जाणं हे समीकरण तयार झाल्यानं सारेच घाबरून होते मात्र याया हुकूुमशाहीत पक्षाच्या विनाशाचीही बिजं रोवलेली होती.त्याला आता सुरूवात झालीय असं म्हणायला हरकत नाही..अंतुलेंनी असंच राजकारण केल्यानं कोकणात अंतुले नंतर कॉग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली होती.दुसरा नेताच अंतुलेंनी तयार होऊ दिला नव्हता.अंतुलेचे बोट धरून राजकाऱणात आलेल्या सुनील तटकरे यांनी अंतुलेच्या राजकारणातील हे डावपेच बरोबर हेरले आणि संधी मिळाली तेव्हा त्यांचेच अनुकरण करीत आडवा आणि जिरवाचा प्रयोग केला.त्यामुळं तीन जिल्हयात पक्षात मोठा नेता तयार झाला नाही.दीपक केसरकरांच्या मागे लोक होते.त्यांना पक्ष सोडावा लागला.भास्कर जाधवांच्या बाबतीतही हेच धोरण ठेवले गेले.एवढेच कश्याला सुरेश लाड यांनाही त्यांनी कधी कर्जात-खालापूरच्या बाहेर डोके काढू दिले नाही.जिल्हा अध्यक्ष असलेल्या वसंत ओसवालांना त्यांनी बाहुलं म्हणूनच कायम वापरलं.तटकरे सत्तेवर होते तेव्हा त्यांच्यासमोर डोळे वर करून बोलण्याची कुणाची मात्रा नव्हती.आज दिवस बदलले आहेत.सत्ता नाही आणि सिंचन घोटाळ्याचं लचांड मागं लागलेलं आहे.म्हणजे कोंडी झालेली असल्याने त्यांना पक्षांतर्गत आव्हानं दिलं जायला लागलं आहे.रोह्यात घरातच फुट पडणं,आणि मुरूडमधील जवळचे नगरसेवक शिवसेनेत जाणं हे दिवस बदललेले आहेत हे दाखविणारं आहे.या बदलाला तटकरे कसे सामोरे जातात यावरच कोकणातील त्यांच्या पक्षाचं भवितव्य आणि त्याचं राजकीय अस्तित्व अवलंबून आहे.विधानसभा आणि लोकसभा आणखी दूर आहेत पण नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुनील तटकरे यांची सत्वपरीक्षा पाहणार्‍या ठरणार हे स्पष्ट दिसतंय.

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here