कुबेरांचे घालीन लोटांगण…

0
1428

माजात तणाव निर्माण करणारी,कुणाची बदनामी करणारी,जातीय विद्वेश भडकविणारी किंवा आक्षेपार्ह बातमी जाणते-अजाणतेपणानं प्रसिध्द झाल्यानंतर संपादकांवर माफी मागण्याचे प्रसंग येतातच.संपादकीय कारकीर्दीत एकदाही अशा कारणासाठी  माफी मागण्याची वेळ आली नाही असा संपादक दुर्मिळ असेल.तात्पर्य एखादया बातमीबद्दल वृत्तपत्रानं माफी मागणं हा सर्रास घडणारा प्रकार आहे.त्यात गैर देखील काही नाही.याचं कारण वृत्तपत्राचं काम घडयाळ्याच्या काटयावर  चालतं.अशा स्थितीत काही चुका,दोष हे राहूनच जातात.त्यातून भलतेच विनोद  जसे घडतात तसेच समाजस्वास्थ्याला अपायकारक ठरू शकतील अशा घटनाही घडत असतात। अंकात जे छापून येते त्याची जबाबदारी संपादकांची असते.मी ती बातमी पाहिली नाही किंवा वाचली नाही असं सांगत संपादकांना हात झटकून मोकळे होता येत नाही. छापून येणार्‍या प्रत्येक शब्दाची जबाबदारी संपादकाची असली तरी प्रत्येक शब्द संपादकाच्या नजरेखालून जातो असं   होत नाही. वृत्तपत्रांची जी रचना असते त्या त्या पातळीवर ही कामं होत असतात.बातम्या वार्ताहर पाठवितात,त्या अंकात समाविष्ट कऱण्याचे काम उपसंपादक करतात,वृत्तसंपादक पानांवर अंतिम हात फिरवितात.मात्र अनेकदा बातमी देताना  बातमीचं गांभीर्य संबंधित वार्ताहर किंवा ती प्रसिध्द करताना संबंधित उपसंपादकाच्या लक्षात  येतही नाही.त्यातून अशा बातम्या छापल्या जातात. अशा स्थितीत दिलगीरी व्यक्त करून निर्माण झालेला तणाव म्हणा,पेच म्हणा अथवा वाद म्हणा  संपविण्याचा प्रयत्न केला जातो.बहुतेक वेळा संपादकांच्या मनाचा मोठेपणा म्हणूनही अशा दिलगीरीकडं पाहिलं जातं. संपादकीय किंवा अग्रलेखाच्या बाबतीत ही सवलत मिळत नाही.अग्रलेख म्हणजे संबंधित वृत्तपत्राचे त्या मुद्यावरचे धोरण असते.अशी धोरणं अजानतेपणानं स्वीकारलेली नसतात.जी ठरवूनच घ्यावी लागतात आणि ते एकदा घेतल्यावर त्या धोरणावर ठामही राहावे लागते.त्यामुळं एखादा अग्रलेख लिहिलाय आणि त्यावर दिलगीरी मागितली गेलीय असं होत नाही.हा विक्रम आता गिरीश कुबेर यांच्या नावावर नोंदविला गेला आहे.17 मार्चच्या अंकात ‘असंतांचे संत’ अशा मथळ्याखाली गिरीश कुबेर यांनी अग्रलेख लिहिला आहे.मदर तेरेसा यांना संत पद बहाल करण्यात आले आहे.त्यावर कुबेर यांनी आक्षेप नोंदविला आहे.एवढेच नव्हे तर मदर तरेसा यांची गरिबांची सेवा हे ढोंग होते,सेवेच्या आडून त्या धर्मांतरं घडवून आणत असं कुबेर यांचं म्हणणं आहे.गरिबांच्या दुःखाचं आणि अश्रू ,वेदनेचंही मदर तेरेसा भांडवल करीत असत अशी ज़हरी  टीकाही कुबेर यांनी अग्रलेखातून केली आहे.अग्रलेख लिहितांना त्याची प्रतिक्रिया काय उमटणार हे कुबेर महोदयांना नक्कीच माहिती होते.किंबहुना संतप्त प्रतिक्रिया उमटावी आणि आपण कसे ‘रोखठोक’ संपादक आहोत हे ठळकपणे लोकांसमोर यावं हाच त्यांचा उद्देश या मागे असू शकतो .लोकप्रिय भूमिकांच्या विरोधात अग्रलेख लिहून आपलं वेगळंपण दाखवून देण्याची कुबेरांना नेहमीच खुमखुमी असते.मध्यंतरी शेतकर्‍यांच्या विरोधात ‘बळिराजाची बोगस बोंब’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता.शेतकर्‍यांना ज्या सवलती दिल्या जातात त्यावर कुबेर यांनी हल्ला चढविला होता.तेव्हाही कुबेर यांच्या विरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.परंतू तेव्हा शेतकर्‍यांचा आवाज कमी पडला.तो दिल्लीपर्यंत पोहोचलाच नाही.त्यामुळं दोन दिवस शेतकर्यांनी आदळआपट केली आणि नंतर ते गप्प बसले.या काळात कुबेर मजा घेत होते.मात्र यावेळेस त्यांनी थेट मदर तेरेसा यांनाच  वेढीस धरले होते.त्याबद्दल त्यांच्यावर नक्कीच आता पश्‍चातापाची वेळ आली आहे.कारण यापुर्वी कोणीही घातलं नव्हतं असं लोटांगण त्यांना घालावं लागलं आहे.मदर तेरेसा यांच्याबद्दल त्यानी जे काही तारे तोडले ही  चुकून केलेली कृती नव्हतीच.ती त्यांची भूमिका होती आणि जाणतेपणानं त्यांनी ती मांडली होती.अशा स्थितीतही त्यांना माफी मागावी लागणं आणि अग्रलेख मागे घेतो आहोत असं जाहीर करावं लागणं हे कुबेर यांच्या कथित रोखठोक भूमिकेचं वस्त्रहारण तर आहेच त्याचबरोबर एकूण मराठी पत्रकारितेचं ही ते अधःपतन आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही.गिरीश कुबेर इतरांना उठता-बसता बोधामृत पाजत असतात,इतरांना उपदेशाचे डोस पाजणे हा आपला जन्मसिध्द हक्क आहे अशा तोर्‍यातही ते सातत्यानं वागत असतात.मात्र हा तोरा तेव्हाच शोभून दिसतो जेव्हा आपण इतरांना जे डोस पाजतो त्याचं अनुकरण स्वतः करतो.कुबेरांनी यापुर्वी ते कधी केलं नाही कालच्या लोटांगण प्रकरणातही ते केलं नाही.उलट आपले दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत हेच त्यानी यातून दाखवून दिले आहे.म्हणजे अग्रलेखाबद्दल अशी क्षमायाचना कऱण्याची वेळ अन्य एखादय पत्राच्या संपादकांवर आली असती तर त्यांनी आपल्या अग्रलेखातून पत्रकारितेतील नीतीमत्तेचे आणि स्वाभिमानाचे हजारो दाखले देत आजची पत्रकारिता किती लाचार झालीय हे जगासमोर मांडले असते.त्यांची पंचाईत अशी झालीय की अशी लाचारी पत्करण्याची वेळ आज त्यांच्यावरच आली आहे.’मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे,ती भूमिका मालकांना मान्य नसेल तर एक्स्प्रेस टॉवरच्या पायर्‍या उतरायला तयार आहे’ असं सांगत त्यांनी स्वाभिमानीवृत्ती दाखविली असती तर ते नव्या संपादकांसमोर नक्कीच आदर्श ठरले असते.ही संधी त्यानी घालवली आहे बरं असा स्वाभिमान दाखविल्यानंतर जी हलखीची  वेळ संपादकांवर येते तशी कुबेरांवर येण्याची शक्याता नव्हतीच.कारण त्यांच्या नावातच ‘कुबेर’ असल्यानं त्यांना कश्याचीही ‘टंचाई’ जाणवण्याची शक्यता नव्हती आणि नाही.  अर्थात प्रश्‍न केवळ आर्थिक  संकटांचाच नसतो तर  संपादक म्हणून मिळणार्‍या वलयांचा,सवलतीचा,लाभाचाही असतो  कुबेर हे आर्थिक विषयातील तज्ज्ञ असल्याने  आपण स्वाभिमान दाखविला तर आपलला काय काय आणि कसा तोटा होऊ शकतो याचा हिशोब त्यांनी मांडला असावा.  स्वाभिमानापेक्षा आर्थिक गणितच अधिक वजणदार ठरल्याने त्यांनी घालनीन लोटांगणचे सूर आळवून विषय संपविण्याचा निर्णय घेतला असावा.कुबेर नेहमीच प्रवाहाच्या विरोधात असल्याचा  आभास निर्माण करीत असतातत मात्र लोटांगणाचा निर्णय घेताना ते प्रवाहपतीत झाल्याचेच चित्र समोर आले आहे.अनेक संपादक आपल्या खुर्च्या टिकविण्यासाठी मालकांसमोर कशी लाळघोटत असतात हे आपण पदोपदी पाहात असतो.गिरीश कुबेर अशा संपादकांपेक्षा वेगळे नाहीत हे चित्र आज दिसते आहे.

हल्ली संपादकांना गलेलठ्ट पगार आणि अन्य ज्या सवलती मिळतात त्याची अनेक संपादकांना चटक लागलेली आहे.घर,गाडी,नोकर-चाकर हे सारं सोडून स्वाभिमानाचं दर्शन घडविणारे संपादक जगाच्या बाजारात अव्यवहारी ठरतात.या सवलती खेरीज संपादक म्हणून जे लाभ उपटता येतात ते ही अनेक पदरी  असतात.अशा स्थितीत भूमिकांवर ठाम राहणे,किंवा पत्रकारितेचं पावित्र्य जपणं वगैरे सारख्या गोष्टी गैरवाजवी ठरतात.गिरीश कुबेर याच मार्गाने गेले असतील आणि खुर्चीला चिटकून बसले असतील तर ते आजच्या घडीला साजेसे असले तरी  गिरीश कुबेर यांच्याकडून हे सारं यासाठी अपेक्षित नव्हंतं की ,ते इतरांना साधनशुचिता,आणि शहापणानेचे डोस पाजत असतात.मात्र स्वतःवर वेळ आली की आपणही इतरांपपेक्षा  वेगळे नाही आहोत हेच त्यांनी दाखवून दिले आहे.मुळात वृत्तपत्रांचे जे चालक किंवा मालक असतात त्याना केवळ आपले हितसंबंध सांभाळायचे असतात.जोपर्यंत आपल्या हितसंबंधांना बाधा येत नाहीत तो पर्यंत संपादकांना ते चौखूर उधळण्याचं स्वातंत्र्य देतात.हितसंबंध धोक्यात येत आहेत असं दिसतांच त्याला लोटांगण घालायला लावतात.मी 18 वर्षे ज्या पत्रात काम केले ते पत्र चालविताना माझ्याकडून होत असलेल्या सार्‍याच गोष्टी मालकांना मान्य होत्या असं नाही.पण त्यांनी ते तोपर्यंत सहन केले जापर्यंत त्यांचे हितसंबंध धोक्यात आले नाहीत.माझ्यामुळं जेव्हा त्यांचे  राजकीय हितसंबंध धोक्यात येण्याची चिन्हे दिसली तेव्हा त्यांनी संपादकांच्या प्रतिष्ठेलाच आव्हान दिले.मी छोटया पत्रात होतो तरीही संपादकाचे सत्व मी पाळले आणि संपादकाच्या खुर्चीची अप्रतिष्ठा होणार नाही याची काळजी घेत लगेच बाहेर पडलो. हे सारं करायला स्वतःचा स्वतःवर विश्‍वास असावा लागतो आणि असं काही करण्याची हिंमतही लागते.गिरीश कुबेर येथे कमी पडले.नुसतेच शेतकर्‍यांच्या चळवळी,सामांन्यांची आंदोलनं यावर अग्रलेख लिहून आपण प्रवाहाच्या विरोधात पोहणारे संपादक आहोत असं भासविता येत नाही.त्यासाठी त्याला कृतीची जोडही हवी असते.ती जोड कुबेर देऊ शकले नाहीत.चळवळी आणि अन्य विषयांवर हल्ले चढवितांना ते मालकाच्या हिताच्या आड येणारे नव्हते.त्यामुळं अशा प्रसंगी मालाकंची भूमिका नरो वा कुंजरो वा अशी होती.आता थेट मदर तेरेसा यांच्या कार्यावरच संशय व्यक्त केल्याने वरच्या स्तरावरून गोएंका शेठ यांच्यावर दबाब आलेला असू शकतो. त्यातूनच त्यांनी कुबेर यांना लोटांगण घालण्याचे आदेश दिलेले असू शकतात. कुबेरांनी इमाने-इतबारे मालकांनी जे सांगितलं ते लिहून दिलं आहे.अशा माफीनाम्यामुळे केवळ आपलीच नव्हे तर सर्वच संपादकांची टिगंल होऊ शकते हे देखील त्यानी विचारात घेतले नाही.त्यामुळं कुबेरांचा माफीनामा हा  विषय मराठी पत्रकारितेत कायम काळ्या अक्षरांनी  नोंदविला जाणार आहे.तत्वासाठी अनेक संपादकांनी सारे मोह झुगारून पत्रकारितेची शान राखली आहे.असं करून व्यक्तिगत जीवनात अशा संपादकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले असेल ही पण त्यातून मराठी पत्रकारितेची दैदीप्यमान परंपरा पुढे चालविल्याचा आनंद तरी संबंधित संपादकांना नक्कीच मिळाला आहे.कुबेरांच्या नशिबी ते भाग्य देखील नाही.कुबेर यांच्या लोटांगणानं ते ज्या पत्राचे संपादक आहेत त्या पत्राची पत आणि प्रतिष्ठा तर धुळीस मिळालीच त्याच बरोबर आजचे संपादक किती नामधारी आणि एकप्रकारे मालकाचे गुलाम आहेत हे ठसठसीतपणे नव्यानं समोर आलं आहे.या कांडानं एक मात्र बरं झालं गिरीश कुबेर यापुढे तरी स्वाभिमानाच्या ,साधनशुचितेच्या आणि पत्रकारितेतील उच्च नितीमुल्यांच्या गप्पा मारणार नाहीत.मारल्या तरी त्यावर कोणी विश्‍वास ठेवणार नाही.

एस एम् देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here