प्रसारमाध्यमे, विशेषतः वृत्तपत्रे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जातात. प्रस्तुत पुस्तकात १३ शोध पत्रकारांनी आधुनिक राजकीय भानगडी, घोटाळे उघडकीस आणून अमेरिकन राजकारण, इतिहास कसा बदलला हे विस्ताराने दाखवून दिले आहे. विख्यात राजकीय शोध पत्रकार ‘वर्ल्ड अँड द सन’चे पारितोषिक विजेते वुडी क्लेन ह्यांनी प्रस्तुत पुस्तकाचे लेखन व संपादन केले आहे.
१९६०च्या दशकात लिंडन जॉन्सन यांनी एक फार मोठा अब्जावधी डॉलर्सचा ‘झोपडपट्टी स्वच्छता’ कार्यक्रम अंमलात आणण्याचे ठरविले तेव्हा वुडी क्लेन झोपडपट्टीतील जीवनाचा अनुभव घेण्यासाठी न्यूयॉर्कच्या एका बकाल झोपडपट्टीत तीन महिने राहिले होते. त्यानंतर त्यांनी ‘वर्ल्ड टेलिग्रॅम अँड द सन’ दैनिकात ‘I lived in slum’ ही लेखमाला लिहिली. ह्या मालिकेतील लेखांच्या परिणामी न्यूयॉर्कच्या महापौरांचा प्रचंड राग वृत्तपत्राने व लेखकाने ओढवून घेतला. पुस्तकात यासंबंधीचा प्रदीर्घ लेख आहे ‘वॉटरगेट : द फॉल ऑफ ए प्रेसिडेंट’ हा जगभर गाजलेला लेख बॉब वुडवर्ड व कार्ल बर्नस्टर्न ह्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वार्ताहरांनी लिहिला होता २६ महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर अखेर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन ह्यांना राजीनामा द्यावा लागला. हे ३४ पानांचे प्रकरण मुळातूनच वाचावयास हवे इतके ते माहितीपर बारीकसारीक तपशील सांगणारे आहे. ह्या कामगिरीबद्दल विख्यात पुलित्जर पारितोषिक दोघांना विभागून मिळाले.

१९७२चे पुलित्जर पारितोषिक विजेते ठरले टॅड झुल. त्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये १९६१ साली क्युबा व अमेरिकेसंबंधी लिहिलेला लेख विशेष गाजला. ‘एनरॉन’ ही अब्जावधी डॉलरची कंपनी. ह्या कंपनीला जमीनदोस्त करण्यात ३१ वर्षीय बेथनी मॅकलीन यांनी ‘फॉरच्युन’ २००१ मधील लेखाने महत्त्वाची कामगिरी बजावली. धाडसी, स्वतंत्र बुद्धीचे पत्रकार सेमोर हर्श यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये अमेरिकन सैनिकांनी व्हिएतनाममधील ५०० नागरिकांच्या हत्येबद्दल लिहिलेल्या लेखाबद्दल ते पुलित्जर पारितोषिकाचे मानकरी ठरले. अमेरिकन शासनाने आंतरराष्ट्रीय कायद्याचा कसा उघडउघड भंग केला आहे हे विख्यात पत्रकार डायना प्रिस्ट यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ २००९ मधील लेखाने दाखवून दिले. त्याही पुलित्जर पारितोषिक विजेत्या ठरल्या. ह्याच पारितोषिकाच्या विजेत्या अॅनी हल यांचे ग्रंथ पत्रकारिता महाविद्यालयांत प्रसारमाध्यम संस्थांत मान्यता पावले आहेत.
जॅक अँडरसन यांनी १९७१मधील पाकिस्तानशी झालेल्या युद्धाविषयी अमेरिकेने केलेल्या गुप्त करारासंबंधी आपल्या स्तंभात लिहिलेला लेख हजार वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाला आणि ४ कोटी वाचकांपर्यंत पोचला.
घरगुती खासगी संवाद चोरून ऐकणे हे ‘सर्वात मोठे गुपीत’ असा लेख (एरिक लिर्चाक्को व जेम्स रिझने) न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला. अमेरिकन शासन नागरिकांच्या घरातील खासगी संवाद चोरून ऐकते यासंबंधीचा गौप्यस्फोट करणारा हा लेख चांगलाच गाजला. हा प्रकार संपूर्ण बेकायदेशीर व घटनाविरोधी होता. नॅशनल सेक्युरिटी एजन्सीतर्फे हा सारा प्रकार प्रयत्नपूर्वक चालला होता. दोन्ही लेखकांना/वार्ताहरांना पुलित्जर पुरस्कार मिळाला. गॉंटनमधून सुटलेल्या कैद्यांच्या मुलाखती घेऊन टॉम लॅसटर यांनी ‘मियामी हेरल्ड’मध्ये २००८ साली लिहिले. टॉम लॅस्टर व त्यांचे सहकारी मोठ्या पुरस्काराचे विजेते ठरले. ह्या साऱ्या शोधपत्रकारांना आपल्या हाती घेतलेल्या कामासाठी कमालीचे कष्ट, परिश्रम घ्यावे लागते. हे करण्यासाठी त्यांना खूप धोका पत्करावा लागतो. काही वेळा शारीरिक, मानसिक त्रास सोसावा लागतो. शोधपत्रकारितेने अमेरिकन इतिहासास कशी कलाटणी मिळाली, भल्याभल्यांना आपले पद सोडावे लागले, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या जगातही शोध पत्रकारांचे स्थान कसे आगळेवेगळे आहे यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे.
-ज. शं. आपटे

‘द इनसाइड स्टोरीज ऑफ मॉडर्न पोलिटिकल स्कँन्डल्स्’ लेखन-संपादनः वुडी क्लेन, प्रकाशकः सेज, पानेः २३६, किंमतः २७ डॉलर

मटावरून साभार

LEAVE A REPLY