आधुनिक शेती तंत्र जाणून घ्यायला शेतकरी उत्सुक

0
1183

‘शेतकर्‍यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करावा’ असे सल्ले देणारे अनेक असतात.मात्र आधुनिक तंत्राचा वापर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं ? हे गावात जाऊन शेतकर्‍यांना कोणी समजून सांगत नाही.आम्ही आमच्या गावापुरता तसा छोटासा प्रयत्न केला..बीड जिल्हयातील कृषी क्षेत्रात अनेक तरूण शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून बीड जिल्हयाच्या शेती क्षेत्राला नव्या वाटेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे कृषी तज्ज्ञ के.जी शाहिर यांचं आमच्या देवडी गावात व्याख्यान आयोजित केलं होतं.गावात अशा स्वरूपाचा प्रयत्न प्रथमच होत असल्यानं गावातील शेतकर्‍यांमध्ये कमालीची उत्सुकता होती.देशमुख परिवाराच्यावतीने गावातील शेतकर्‍यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.यापुर्वी देखील देशमुख परिवाराच्यावतीने विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप,नेत्र तपासणी शिबीर आदि सामाजिक उपक्रम घेण्यात आले होते.
गावातील शंभर ते सव्वाशे शेतकर्‍यांनी या व्याख्यानास उपस्थिती लावून शाहिर यांच्या सूचना समजून घेतल्या.उपस्थितांमध्ये तरूण शेतकर्‍यांची विशेष उपस्थिती होती.शाहिर यांनी माती परिक्षणाच्या आवश्यकतेसह अनेक छोटया छोटया गोष्टी शेतकर्‍यांना समजतील अशा सोप्या भाषेत सांगितल्या.कापसाची लागवड दक्षिण उत्तर केल्यानं उत्पादन कसं वाढतं हे त्यांनी सप्रमाण सांगितलं.पोषक द्रव्ये रोपांना कशी द्यावीत आणि ती किती उपयुक्त असतात हे उदाहरणांसह त्यानी सांगितलं.गरज असेल तेवढंच पाणी देण्याची महत्वाची सूचना देखील त्यानी केली.शेणखताची उपयुक्तता सांगतानाच आलटून पालटून पीक घेण्याचे फायदेही त्यानी शेतकर्‍यांना सांगितले.
खरीप हंगामाचा सिझन सुरू होत असतानाच शाहिर याचं व्याख्यान झाल्यानं त्याचा लाभ शेतकर्‍यांना होणार आहे.प्रारंभी बाबासाहेब झाटे यांनी पाहुण्याचे स्वागत केलं.एस.एम.देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात शेतीच्या नव्या तंत्राचं ज्ञान शेतकर्‍यांनी मिळेल त्या मार्गानं आत्मसात केलं पाहिजे.त्यासाठी पुढील काळात अशी व्याख्यानं गावात सातत्यानं आयोजित केली जातील असं सांगितलं.यावेळी धुनकवाड सारख्या दुष्काळी भागात माळरानावर नंदनवन फुलविणारे प्रगतीशील शेतकरी कल्याण कुलकर्णी आणि विनायकराव परजणे उपस्थित होते.तसेच सरपंच जालंधर झाटे,पंचायत समितीचे माजी सदस्य मच्छिंद्र झाटे,उपसरपंच गवरचंद आगे,तुळशीराम राऊत,तसेच इतर शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here