एक आनंदाची बातमी आहे.नगरचा छायाचित्रकार मित्र कल्पक हतवळणे आता आपल्या दोन्ही पायांवर उभं राहणार आहे.त्याला हायड्रोलिक पाय बसविण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य कक्षाकडून दीड लाख रूपये मंजूर झाले आहेत.हायड्रोलिक पाय बसविण्यासाठी तीन लाखांची गरज आहे.मात्र फिरोदीया ट्रस्टतर्फे 35 हजार रूपये तसेच मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या आवाहनानुसार काही पत्रकारांनी मदत केली आहे.असे सारे मिळून दोन लाख रूपये जमा झालेले आहेत.आणखी एक ते सव्वा लाख रूपायंची गरज आहे.
काही आजार झाल्याने कल्पकचा पाय कापावा लागला.सात-आठ महिन्यापुर्वीची ही घटना.पाय कापल्याने कल्पकचे दैनदिन आयष्य विस्कळीत झाले.आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या.नवा पाय बसविण्यासाठी सव्वा तीन लाखांची गरज होती.ती रक्कम जमविणे त्याला अशक्य होते.त्यामुळं कल्पक हतबल झाला होता.आपण पुन्हा दोन्ही पायांवर उभे राहू शकू ही आशा जवळपास त्याने सोडलीच होती.
या बाबतची माहिती परिषदेच्या विभागीय सचिव मीनाताई मुनोत,नगर प्रेस क्लबचे मन्सुरभाई शेख तसेच विजय होलम यांनी परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर हातवळणेला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी संपर्क साधून कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना परिस्थितीची कल्पना दिली.सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर नितीन जाधव आणि पत्रकार मंगेश चिवटे यांनी आपलेपणाने त्याचा पाठपुरावा केला.फाईल पराग पाटील यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पुढील कारवाई केल्याने हातवळणेला मोठा निधी मंजूर झाला आहे.या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.हायड्रोलिक पायासाठी आता पुण्यातील निगडी भागात असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत.त्यांच्याशी संपर्क साधून काही मदत मिळते का याचा प्रयत्न केला जात आहे.
मराठी पत्रकार परिषदेने जानेवारी पत्रकार आरोग्य सेवा कक्षाची स्थापना केल्यानंतर आतापर्यंत अकरा पत्रकारांना मदत मिळवून दिली आहे.काही गंभीर आजार असलेल्या पत्रकारांची निवासाची आणि उपचाराची व्यवस्थाही परिषदेने प्रयत्न करून केली आहे.त्यामुळे अनेक पत्रकार मित्रांनी परिषदेच्या आरोग्य सेवा कक्ष कल्पनेचे स्वागत करीत परिषदेला धन्यवाद दिले आहेत..