कर्जमाफीची मागणी राजकारण्यांची,शेतकर्‍यांची नव्हे

निवडणुका संपल्यात आता तरी शेतकर्‍यांचं नावानं राजकारण करायचं थांबवा.आम्हीच शेतकर्‍यांचे सर्वाधिक हितचिंतक आहोत हे दाखविण्यासाठी सर्वच पक्षांनी आज जो देखावा केला तो संतापजनक आहे.आमदारांच्या पगारवाढीच्या वेळेस सर्व आमदार एकत्र येतात आणि फटक्यात ,चर्चा न होता पगारवाढ होते.शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर एवढा हंगामा का होतोय?.सत्ताधारी आणि विरोधक आग्रह धरताहेत आणि मुख्यमंत्री म्हणताहेत ‘योग्य वेळी कर्ज माफी करू’.ही योग्य वेळ आणखी किती शेतकर्‍यांचे बळी गेल्यानंतर येणार आहे? हे समजत नाही.मुळात कर्ज माफी,कर्ज माफी म्हणून ज्या बोबा राजकीय पक्षांनी मारायला सुरूवात केलीय ती,कर्जमाफी मागितली कोण्या शेतकर्‍यांने?.शेतकर्‍यांची कर्जमाफीची मागणी कधीच नव्हती आणि नाही.ही मागणी राजकीय पक्षांंची आहे.शेतकर्‍यांची मागणी आहे ती उत्पादन खर्चावर आधारित शेती मालास भाव देण्याची.स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची.शेती क्षेत्राकडं मतं मिळविण्याचं प्रभावी माध्यम म्हणून न बघता कोटयवधी कुटुंबाला आधार देणारं माध्यम म्हणून बघण्याची.ते होत नाही.हे न करता कर्जमाफी किती वेळा देणार आहात ?.यंदा कर्जमाफी दिली तरी पुढील वर्षी शेतकरी कर्जबाजारी होणारच आहे.तो कर्जबाजारी होऊ नये यासाठी त्याला मदत करण्याची गरज आहे.त्यावर कोणी बोलत नाही.सवंग लोकप्रियतेसाठी ही सारी नाटकं चाललीत.शेतकरी मरताहेत आणि त्यांच्या टाळूवरचं लोणी ही राजकीय पक्ष चाटताहेत.निषेधार्ह आहे हे सारं.अगोदर विरोधक मागणी करीत होते.आता सत्ताधारीही मागणी करताहेत.विरोधकांकडं कोणते मुद्देच राहू नयेत अशी ही योजना आहे.शिवाय उद्या ही कर्जमाफी केली गेलीच तर त्याचं श्रेयही विरोधकांना मिळू नये असं हे सत्ताधार्‍याचं नियोजन आहे.श्रेयाच्या या लढाईत शेतकरी मरतो आहे.गरज आहे त्याला वाचविण्याची आणि त्याचे बुनियादी प्रश्‍न समजुन ते सोडविण्याची .हे कधी होणार आहे कोण जाणे-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here