कर्जत प्रेस क्लबचा जरा हटके उपक्रम

0
1051

स्वातंत्र्य लढ्यात अफाट शौर्य गाजवून आणि सर्वस्वाचं बलिदान देऊनही स्वातंत्र्योत्तर काळात   ज्याच्या वाट्याला उपेक्षाच आली अशा क्रांतिकारकांमध्ये माथेरान येथील विठ्ठल लक्ष्मण उर्फ भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील या भारत मातेच्या दोन सुपूत्रांचा प्राधान्यानं उल्लेख करावा लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्यभर कष्ट उपसणारे,त्यासाठी हसत हसत संसार वाऱ्यावर सोडून देणारे आणि अंतिमतः देशासाठी हौतात्म्य पत्करणा़ऱ्या भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना स्वातंत्र्योत्तर काळात योग्य न्याय मिळाला नाही . सरकार आणि समाजानेही त्यांच्या बलिदानाची, त्यागाची उपेक्षाच केली असं सखेद म्हणावं लागतंय.बॅरिस्टर अ.र.अंतुले मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात स्वातंत्र्य लढ्यातील विरांची जी स्मारकं महाराष्ट्रभर उभारली त्यापैकी हुतात्मा भाई कोतवाल यांचं  एक स्मारक माथेरानमध्ये  उभारलं गेलं.हे स्मारक वगळता सरकारनं कोतवालांची ओळख नव्या पिढीला राहावी यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही.त्यामुळं भाई कोतवाल हे नाव जगासमोर फारसं आलंच नाही.भाई कोतवाल हे रायगडचे सुपूत्र.मात्र माथेरान,कर्जतचा परिसर सोडला तर जिल्हयात अन्यत्र नव्या पिढीतील किती युवकांना भाई कोतवालांचे नाव माहिती असेल हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.याचा खेद सरकारला किंवा सरकारी यंत्रणेला आणि राजकारण्यांना वाटण्याचं कारण नव्हतं.मात्र एका थोर स्वातंत्र्ययोद्याची समाज उपेक्षा करतोय याची बोच रायगडमधील पत्रकारांना नक्कीच  होती.भाईचं आयुष्य जगाला कळलां पाहिजे असं रायगडच्या पत्रकारांना वाटलं आणि त्यासाठी त्यांनी कामाला सुरूवात केली.

 कर्जत प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लबनं पुढाकार घेत माथेरान-नेरळच्या प्रवेशव्दारावर हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील याचं छोटेखानी स्मारक उभारलं.भाई कोतवालांचा जन्म 1 डिसेबर 1912 चा आणि त्यांना हौतात्म्य प्राप्त झालं ते 2 जानेवारी 1943 रोजी.जेमतेम 31 वर्षाचं आयुष्य जगलेल्या या क्रांतीकारकाने देशासाठी सर्वस्वाचं बलिदान केलं.आझाद दस्ता हा त्यांच्या चळवळीतील महत्वाचा भाग होता.या दस्त्यानं किंवा गटानं घातपाती कारवायांकरून इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं.त्यामुळं इंग्रजांनी त्याकाळी भाई कोतवाल याना पकडून देणाऱास पाच हजाराचा बक्षिस जाहीर केलं होतं.अखेर या बक्षिसाच्या लालचेपायीच एका फितुरानं भाई कोतवाल आणि हिराजी पाटलांचा ठाव ठिकाणा  सांगितला आणि भल्या पहाटे इंग्रज पोलिसांची एक तुकडी जंगलात घुसली.दोघेही इंग्रजांच्या गोळ्यांचे शिकार झाले.भाईंचा हा सारा इतिहास अंगावर रोमांच उभं करणारा,पुढील पिढीला प्ररणा देणारा आहे.हा सारा भाग आता माथेरानच्या प्रवेशव्दारावर भित्ती चित्राच्या माध्यमातून साकारला आहे.या भित्तीचित्राचा लोकार्पण सोहळा भाई कोतवालांच्या बलिदान दिनी म्हणजे 2 जानेवारीला पार पडला.जमदरे बंधूनी जीव ओतून हे शिल्प तयार केलेले असल्यानं ते कमालीचं देखणं आणि कोतवालांना न्याय देणारं झालं आहे.स्मारक आणि शिल्प यामुळे या परिसराला आपोआपच एक पावित्र्य लाभलं आहे.गेली बारा -तेरा वर्षे या ठिकाणी बलिदान दिन साजरा करून भाई आणि हिराजी पाटलांना अभिवादन करण्याचा उपक्रम कर्जत प्रेस क्लब करीत आहे.कर्जत प्रेस क्लबच्या या कार्याचं कौतूक करावं तेवढं कमी आहे.कारण उत्साहाच्या भरात अनेक उपक्रम सुरू होतात पण कालांतरानं ते बंद पडतात.संतोष पेरणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हे होऊ दिलं नाही याचा आनंद वाटतो.
खरं तर ज्यांना भाईंचा इतिहास समजून घ्यायचाय त्यांनी या शिल्पाला आणि स्मारकाला मुद्दाम भेट दिली पाहिजे.त्यासाठी वेगळी पायपीट करण्याचीही गरज नाही.माथेरानकडं जाणारा रस्ता जेथून सुरू होतो त्या प्रवेशव्दारावरच हे स्मारक आहे.ते मुद्दाम पाहिलं पाहिजे.विशेषतः शाळांच्या ज्या सहली रायगडमध्ये येतात त्यांच्या आयोजकांनी या स्मारकाला मुद्दाम भेट दिली पाहिजे.रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष आणि मार्गदर्शक संतोष पवार,रायगड प्रेस क्लबचे तरूण तडफदार अध्यक्ष संतोष पेरणे यांना धन्यवाद द्यावे लागतील की,त्यानी पत्रकार असंही काम करू शकतात हे मंत्र महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे.रायगड मला आवडतो याचं कारण तिथलं सुंदर निसर्ग तर आहेच पण त्याच बरोबर बुध्दी आणि शौर्याचं मोठं वरदानही रायगडला मिळालं आहे.आकाशाला गवसणी घालणारे अनेक कतृत्वावान माणसं रायगडनं देशाला दिली आहेत.दुदैर्वानं त्याचं यथोचित स्मारक करायला सरकारला वेळ नाही.हे काम रायगडमधील पत्रकार करीत आहेत.अशी दोन तीन स्मारकं पत्रकारानी उभी केली आहेत.भाई कोतवालांचं स्मारक त्यापैकीच एक.पत्रकारांनी तरी या स्मारकाला मुद्दाम भेट दिली पाहिजे असं मी आवर्जुन सांगेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here