दिनू रणदिवे. .  सिर्फ नाम ही काफी है..

0
1096

हाराष्ट्रातील वयोवृध्द पत्रकार,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक मुलुख मैदानी तोफ दिनू रणदिवे यांचा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान कऱण्यात येत आहे.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होत असलेल्या या सोहळ्यात दिनू रणदिवे यांना 91 हजाराची थैली अर्पण केली जाणार आहे.दिनू रणदिवे यांनी पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुग कार्य केले असले तरी अलिकडच्या पिढीला त्यांची ओळख नाही.त्यामुळे दिनू रणदिवे यांच्यावर प्रेम करणार्‍या एका पत्रकाराने त्यांची ओळख करून देण्याचा केलेला हा प्रयत्न.

———————————————————————————————————————————-

 हाराष्ट्रातील पत्रकारिता, सामाजिक चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपण जे भरीव योगदान दिलेत,त्यागाचा,सामाजिक,जाणिवांचा जो विचार महाराष्ट्रातील पत्रकार आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांसमोर ठेवलात त्याबद्दल  आम्ही कृतज्ञ आहोत.

तारापूर चिंचणी येथे एका सामांन्य कुटुंबात 15 सप्टेंबर 1925 रोजी आपला जन्म झाला.वडिल वामन गणपतराव रणदिवे कंम्पाऊंडर तर मातोश्री सरस्वतीबाई आदर्श गृहिणी.बालपणीच दुःखाचे अनेक प्रसंग अनुभवल्याने त्याचा खोल परिणाम आपल्या पुढील आयुष्यावर झाला. सामान्याची दुःख वेशीवर टांगून त्यांना लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं,त्यांचे अश्रू पुसण्याचं व्रत आपण स्वीकारलंत आणि ते निष्ठेनं आयुष्यभर पार पाडलंत.थंडीत कुडकुडत रस्त्यावर झोपणार्‍या जनसामांन्यांच्या हालअपेष्टांचा मागोवा आपण रात्र रात्र जागून घेतलात आणि त्यांना मायेची उब मिळवून दिलीत.आरंभी लोकमान्य,धनुर्धारीतून कधी लेखणीचा दांडपट्टा करून तर कधी लेखणीचा नंदादीप करून जनसामांन्यांना न्याय मिळवून दिलात.त्यानंतर सलग 23 वर्षे ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून जाज्वल्य पत्रकारिता केली.पत्रकारितेला नवे आयाम आपण मिळवून दिलंत.’दिनू रणदिवेंसारखा पत्रकार व्हायचंय’ अशी इच्छा तेव्हा तरूण पत्रकार व्यक्त करीत. मुख्य वार्ताहर म्हणून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करताना आपण आपल्या कामाचा अमिट ठसा उमटविलात.मंत्रालयात चकरा मारत न बसता,राज्यात खळबळ उडवून देणार्‍या अनेक बातम्या आपण शोधून काढत शोध पत्रकारितेचा पाया घातलात. पत्रकार हा राजकारण आणि चळवळीपासून अलिप्त राहू शकत नाही.आपण तर हाडाचे कार्यकर्ते.त्यामुळे एक जागरूक पत्रकार म्हणून तत्कालिन समाजजीवनात घडणार्‍या घटनांपासून आपण स्वतःला अलिप्त ठेऊ शकला नाहीत.गोवा मुक्ती संग्राम असेल किंवा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल या आदोलनात आपण स्वतःला झोकून दिलेत.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील आपला सहभाग आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपण दिलेले योगदान महाराष्ट्र कदापिही विसरू शकणार नाही.महाराष्ट्रासाठी,मराठी माणसासाठी आपण तुरूंगवासही भोगला आहे.६ जानेवारीला  ज्या ठाण्यात आपला  सत्कार होत आहे  त्या ठाण्याच्या तुरूंगातही आचार्य अत्रें यांच्यासमवेत आपण चार महिने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील कैदी म्हणून शिक्षा भोगलेली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनास तत्कालिन वृत्तपत्रे योग्य ती प्रसिध्दी देत नाहीत याची तीव्र बोच आपणास होती. ‘महाराष्ट्रात जे घडतंय ते जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे” या भूमिकेतून आपण अशोक पडबिद्री यांच्यासमवेत,‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका‘ काढून चळवळ तळागाळात पोहोचविण्याचं मोलाचं काम केलंत.पत्रिकेनं खपाचे विक्रम प्रस्थापित केले.अत्यंत कठिण परिस्थितीत आपण अंक चालविलात आणि त्याला लोकमान्यताही मिळवून दिलीत.चळवळीकडे तरूणांना आकृष्ठ करण्यासाठी ‘युवकसभा‘ नावाची संघटना स्थापन करून त्यामाध्यमातून लोकजागृतीचे काम केलेत.मुंबईतील गिरणी कामगार हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय.त्यांच्या उन्नतीसाठीही आपण लेखणी झिजविलीत.दादर भागातील एका चाळीत वास्तव्य करीत आपण आपलं सारं आयुष्य समाजाचासाठी दिलंत.आयुष्य जगताना व्यवहार कधी पाहिला नाहीत .तो आपणास जमलाही नाही.रंजल्या-गांजलेल्यांना सढळ हस्ते मदत करताना आपण उद्याची चिंता कधी केली नाही.त्यामुळे लेखणीच्या जोरावर महाराष्ट्रावर राज्य कऱणारे आपण आज एकाकीपणे,साधे आयुष्य जगत आहात.मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण स्वाभिमान,आत्मसन्मानाचा कधी बळी दिला नाही.आपण काय कमविलं आणि काय गमविलं याचा हिशोब कधी ठेवला नाही . जे गमविलं त्याची खंतही आपण कधी वाटून घेतली नाही.आपल्या सारखं दातृत्व आजच्या काळात दुर्मिळ आहे.आपण तो वसा आजही पाळत आहात.

आपलं लेखण आज थांबलं आहे.मात्र वाचन सुरू आहे.कात्रणं काढणं ती,जपून ठेवणं हा आपला छंद. तो आज 91 व्या वर्षातही आपण जोपासता आहात .कात्रणं आणि जुनी वर्तमानपत्रं हेच आपलं संचित आहे या जाणीवेतून आपण हे सारं ’भांडवल‘ जपता आहात. पदं,मान,सन्मान,गौरव याची कधीच लालसा आपण धरली नाही.त्यासाठी कुणाची लाचारी केली नाहीत किंवा राज्यकर्त्याचं लांगुलचालनही केलं नाही.उलटपक्षी 2010 मध्ये जेव्हा महाराष्ट्र सासनानं आपणास ‘लोकमान्य टिळक जीवन गौरव’ पुरस्कारानं आपणास सन्मानित केलं तेव्हा ‘शासनानं पत्रकारितेत हस्तक्षेप करू नये’ हे सरकारला ठणकावून सांगताना आपण मागं पुढं पाहिलं नाही.विचारांशी तडजोड आपण कधी केली नाही,आणि विचारांशी द्रोह ही कधी केला नाही.जो रस्ता निवडला तो विचारपूर्वक.निवडलेल्या रस्त्यावरून चालताना येणार्‍या खाचखळग्यांचीही मग तमा आपण कधी बाळगली नाहीत.एक ऋुषीतुल्य जीवन आपण जगलात.

 पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीत आपण जे काम केलेत त्यामागची प्रेरणा अर्थातच आपल्या सुविद्य पत्नी,सविता सोनी होत्या.आपल्या सारख्या कार्यकर्त्याला जपत,त्याच्या स्वाभिमानी, तेवढ्याच हट्टी स्वभावाला सांभाळत त्यांनी सातत्यानं आपणास बळ देण्याचं काम केलं आहे.त्यामुळंच आपण महाराष्ट्रात मोठं काम करू शकलात.पत्रकारिता आणि समाजासाठी आपण केलेले महान कार्य पुढील अनेक पिढ्यांच्या कायम स्मरणात राहिल.

एक हितचिंतक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here