एलिफंटा बेट अंधारात
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून नावलैकीक मिळविलेल्या घारपुरी किंवा एलिफंटा बेटावर कायम स्वरूपी वीज नाही हे वास्तव कुणाला सांगितलं तरी खरं ही वाटणार नाही.मात्र ती वस्तुस्थिती आहे.देशाला स्वांतंत्र्य मिऴून मोठा कालखंड लोटला.सरकारनं गाव तीथं वीज अशी घोषणाही केली .मात्र एलिफंटा बेटावर वीज पोहोचलीच नाही.एलिफंटा बेटावरील राजबंदर,शेतबंदर या गावांना राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्यावतीनं 1989 पासून डिझेलच्या विद्युत जनित्रामार्फत वीज पुरवठा केला जातो.संध्याकाळी केवळ साडेतीन तासच बेटावर विजेचे दिवे लुकलुकताना दिसतात.जनित्रासाठी लागणाऱ्या डिझेलवर दर वर्षी जवळपास पंचवीस लाख रूपये खर्च केले जातात.डिझेल पुरवठ्याचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आला असून डिझेलची बिलं थकीत असल्याचं कारण सांगत मागील आठवडयापासून साडेतीन तास सुरू असलेला वीज पुरवठाही आता खंडीत झाला आहे.त्यामुळं एलिफंटा बेट पू र्णतः अंधारात आहे.सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारनं एलिफंटा बेटासाठी कायम स्वरूपी वीज देण्याचे वादे केले मात्र वीजेची लाईन समुद्रातून टाकावी लागणार असल्यानं आणि हे काम बरेच खर्चीक असल्यानं हे वादे अद्याप पूर्ण झालेच नसल्याची खंत एलिफंटा बेटावरील नागरिक व्यक्त करतात.आम्हाला कायम स्वरूपी आणि चोवीस तास वीज पुरवठा करावा अशी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे.
घारपुरी बेटावरील अप्रतिम शैव लेण्या पाहण्यासाठी दररोज शेकडो देशी-विदेशी पर्यटक घारपुरीला येत असतात,त्यातून देशाला दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे परकीय चलन मिळत असलं तरी या बेटावर वीज,पाणी सारख्या प्राथमिक गरजाही उपलब्ध नसल्यानं पर्यटकही त्रस्त होतात.वीज,पाणी आणि अन्य सुविधा उपलब्ध झाल्या तर एलिफंटा बेटावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या कित्येक पटीनं वाढेल असं ग्रामस्थाचं म्हणणं आहे.

LEAVE A REPLY