‘उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाची’ स्थापना

0
238


मराठी पत्रकार परिषदेचा ऐतिहासिक निर्णय 

कोपरगावः महाराष्ट्रातील काही जिल्हे भौगोलिकदृष्टया प्रचंड विस्तारलेले आहेत.त्या जिल्ल्ह्यातील अनेक तालुके एवढे दूरवर आहेत की,जिल्हयाच्या मुख्यालयाशी त्याचं अंतर शंभर-सव्वाशे किलो मिटरपेक्षाही जास्त आहे.रायगडचं उदाहरण घ्या ..पोलादपूरहून अलिबागला यायचं म्हणजे नकोसं होतं.तीच अवस्था अहमदनगर जिल्हयाची.उत्तरेकडील बहुतेक तालुके नगरपासून किमान शंभर किलो मिटर अंतरावर.त्यामुळं सारंच गैरसोयीचं होऊन जातं.नगर जिल्हयाच्या विभाजनाची चर्चा त्यामुळंच सुरू असते.अर्थात सरकार जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हा घेईल पण मराठी पत्रकार परिषदेने मात्र उत्तर नगर जिल्हयाचा वेगळा पत्रकार संघ निर्माण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.राहुरी,राहता,श्रीरामपूर,कोपरगाव,नेवासा,अकोले आणि संगमनेर या सात तालुक्यांचा समावेश असलेला स्वतंत्र उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार संघ स्थापन करण्याची प्रक्रिया काल सुरू केलेली आहे.त्यासाठी या तालुक्यातील पत्रकारांची एक बैठक काल कोपरगाव येथे बोलावण्यात आली होती.बैठकीस जवळबपास सत्तर पत्रकार उपस्थित होते.सर्वच पत्रकारांनी परिषदेच्या नव्या कल्पनेचं स्वागत करून आम्ही सक्रीय सहभाग नोंदविण्याचं आश्‍वासन दिलं.परिषदेने त्यासाठी एक अस्थाई समिती नियुक्त केली आहे.सोमनाथ सोनपसारे यांना या अस्थाई समितीचे निमंत्रकपद देण्यात आलं आहे.अन्य 9 सदस्य या समितीत आहेत.ही समिती एक महिन्यात सदस्यांची नोंदणी करून मतदार यादी तयार करेल.त्यानंतर परिषदेच्या नियंत्रणाखाली ऑनलाईन पध्दतीनं उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुका घेतल्या जातील आणि 31 मार्चपुर्वी नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईल.म्हणजे हा 37 वा जिल्हा संघ आता परिषदेशी संलग्न होत आहे ही परिषदेसाठी महत्वाच गोष्ट समजावी लागेल.संघटना विस्तारासाठी काही बदल आपल्याला करावे लागतील,ते सर्वांना स्वीकारावे लागतील.जास्तीत जास्त पत्रकार चळवळीशी जोडले जावेत यासाठीच हे सारे प्रयत्न असून त्याला सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचं मत यावेळी एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केलं.

.ज्येष्ठ पत्रकार अशोक खांबेकर आणि इतरांनी आपल्या भाषणात 55 वर्षे परिषद आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही,55 वर्षात परिषदेचे पदाधिकारी पहिल्यांदाच आमच्यापर्यंत पोहोचले अशी खंत व्यक्त केली.हे सत्यही आहे.याचा अर्थ परिषदेला आणखी प्रचंड काम करावे लागणार आहे..राज्यातील 354 तालुके परिषदेशी जोडलेले आहेत.आणि आम्ही मुंबई-पुण्याजवळच्या तालुक्यातही पोहोचत नसू तर ते योग्य नाही.परिषदेच्या कारभार्‍यांना पुढील काळात याचा विचार करावा लागेल आणि पदं घेण्यापुर्वी आपण किती वेळ देऊ शकतो हे देखील पहावे लागेल.खैर या निमित्तानं एक चांगली चर्चा कोपरगावात झाली.जिल्हा संघाचं विभाजन करून परिषदेने गावातील पत्रकारांपर्यंत परिषद पोहोचविण्याचा यशस्वी पर्यंत केला आहे असे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले.यावेळी आयुष्यभर निष्ठेनं पत्रकारिता करून कोपरगाव परिसरातील जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमास परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे,अधिस्वीकृती समितीचे सदस्य यशवंत पवार,नाशिकचे पत्रकार श्रीकांत बेणी आदिंची भाषणे झाली.कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले.अशोक खांबेकर,सोमय्या कॉलेजचे विश्‍वस्त कुलकर्णी यांचीही यावेळी भाषणं झाली.

मराठी पत्रकार परिषद आणि नगर जिल्हयाचं जुनं नातं आहे.बाळासाहेब भारदे,रामभाऊ निसळ,वसंतराव काणे आदि मान्यवर पत्रकारांनी परिषदेचं अध्यक्षपद भूषविलेले आहे.इतरही काही पत्रकारांनी परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे.जिल्हयातील तीनशेवर पत्रकार परिषदेशी जिल्हा संघाच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत.त्यामुळं हेे ऋुणानुबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न पुढील काळात करायचे आहेत.त्यासाठी उत्तर आणि दक्षिण नगर जिल्हयातील संघटना अधिक सक्षम,अधिक बळकट आणि अधिक क्रियाशील करावी लागणार आहे.त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आणि सहकार्य अपेक्षित आहे..

LEAVE A REPLY