पाटोद्यात तहसिलदारांची मोगलाई,

मुंबईः लोकहिताची,सत्य बातमी देणं हा काय गुन्हा आहे काय ? ते तर पत्रकारांचं कर्तव्यच आहे.पण बीड जिल्हयातील  पाटोद्याच्या तहसिलदार श्रीमती रूपा चित्रक यांना हे मान्य नसावे.कारण पाणी टंचाईच्या संदर्भातली एक सत्य बातमी पत्रकार पोपट कोल्हे यांनी चंपावतीपत्र दैनिकात प्रसिध्द केल्यानं तहसिलदारांचे पित्त खवळले आणि त्यांनी थेट पत्रकार पोपट कोल्हे यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत त्यांच्या विरोधात थेट पोलिसांत गुन्हा दाखल केला.या प्रकारामुळे पाटोद्यातील आणि बीड जिल्हयातील पत्रकार संतप्त झाले असून तहसिलदारांच्या अरेरावीचा आणि वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यासाठी सोमवारी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख हे स्वतः या धरणे आंदोलनात सहभागी होऊन तहसिलदारांना जाब विचारणार आहेत.

बीड जिल्हयात पाटोद्यात सर्वाधिक पाणी टंचाई आहे.पाटोदा शहराला 14 टँकरव्दारे आजच पाणी पुरवठा केला जात आहे.पुढील काळात पाणी टंचाईची उग्रता अधिकच वाढणार आहे.सौताडा येथील साठवण तलावातून पाटोदयास पाणी दिले जाते.मात्र 11 तारखेला तहसिलदारांनी अचानक एक फतवा काढून सौताडा येथील साठवण तलावातून पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश मुख्याधिकार्‍यांना दिले.अगोदरच तीव्र पाणी टंचाई आणि त्यात प्रशासनाचा लहरी कारभार यामुळं पाटोद्यातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले.ही बातमी पोपट कोल्हे यांनी चंपावतीपत्रच्या 13 तारखेच्या अंकात प्रसिध्द केली.नंतर इतरही सर्व वर्तमानपत्रातून ही बातमी प्रसिध्द झाली.पाटोदा शहराला पाणी मिळत नसेल आणि प्रशासन त्याबाबत उदासिन असेल किंवा लहरी पध्दतीनं निर्णय घेत असेल तर त्याची बातमी द्यायची नाही काय ?  पण काही अधिकार्‍यांना वाटत असते की,आम्ही कसाही कारभार चालविला तरी त्याविरोधात कोणी ब्र काढता कामा नये.पाटोदयाच्या तहसिलदार या पंथातल्या असल्याने त्यांनी पोपट कोल्हे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.”बातमीमुळं जनतेत संताप निर्माण होईल आणि त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल आणि  तालुका प्रशासनाची बदनामी होईल” असे तक्रारीत म्हटले आहे.तहसिलदार यांच्या तक्रारीवरून पोपट कोल्हे यांच्या विरोधात 505 (1) (ब) ( क ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही बातमी बीड जिल्हयात समजताच मराठी पत्रकार परिषदेने याविरोधात इल्गार पुकारला असून येत्या सोमवारी एक दिवसाचे धऱणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.या आंदोलनात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख सहभागी होणार आहेत.पाटोद्याच्या पत्रकारांनी आज प्रांताधिकर्‍यांना त्या संबंधीचे निवेदन दिले.याच्या प्रती मुख्यमंत्र्यी,महसूलमंत्री,पालकमंत्री आदिंना पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनात दुष्काळी परिस्थिती हाताळलण्यात हाताळण्यात तहसिलदार पूर्णतः अपयशी ठरल्यानं त्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here