आंब्याच्या मोहराचा कोकणात घमघमाट..

0
1215

कोकणात यंदा आब्याला चांगलाच मोहर आलाय.या मोहराचा घमघमाट सार्‍या आसमंतात दरवळत असतो..कोकणातील गावांमधून फिरताना तो आपणासही जाणवत राहतो .मात्र हा मोहर नंतर आब्याच्या पिकांत परिवर्तीत होईलच याची खात्री आंबा बागाईतदारांना नाही.कारण आंब्याला भविष्यात अनेक संकटातून जायचं आहे.दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होतेय.तिकडंच रब्बीचं पीक पार उद्दध्वस्त झालं.ज्वारी,गहू ही रब्बीची पीकं गेली.पंचनाम्यासाठी शेतकरी रस्त्यावर आलाय.कोकणात गारपीट झाली नाही.मात्र हवामान बदलाचा फटका आंबा पिकाला बसू लागला आहे.ढगाळ आणि रोगीट वातावरणामुळं अनेक बागांमधून तुडतुडयाचा प्रादुर्भाव जाणवायला लागला आहे.हवामान खात्यानं 28 तारखेला कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.तो खरा ठरला तर करपा आणि भुरीच्या प्रादुर्भावानं सारा मोहर आणि काही ठिकाणी लागलेली छोटी छोटी फळं गळून पडणार आहेत.असं झालं तर त्याचा उत्पादनावर मोठाच परिणाम होणार आहे.पीक घटले की,स्वाभाविकपणे पुन्हा शेतकरी नागवला जातो अशी तक्रार केली जाते.मात्र काही आंबा उत्पादकांशी आणि पत्रकारांशी यावर चर्चा करताना जी माहिती मिळाली ती माझ्यासाठी नवीच होती.कोकणात कॉट्रॅक फार्मींगचं लोण मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे असं सांगितलं गेलं.मोठे बागायतदार आपल्या जवळच्या किंवा छोट्या शेतकरयांची शेती करार पध्दतीनं करतात.काही वेळा आंबा व्यापारीही बागा फुलोरा लागल्यापासूनच कराराने घेतात.मजूर मिळत नाहीत हे तर याचं कारण आहेच पण गेल्या काही दिवसात कोकणातही शेती बेभरवश्याची झाली आहे.अवेळी पाऊस,वातावरण आणि अन्य कारणांनी आंबा असेल,काजू असेल ,नारळ असेल अशा सर्वच पिकांना मोठा फटका बसतो आहे.तो फटका असह्य असतो.शेतकरी मोडून पडतो.मजूर मिळत नसल्यानं अनेकदा ही शेती कऱणंही शक्य होत नाही.मोठे शेतकरी आणि किंवा करारानं शेती करणारे व्यापारी मोठ्या प्रमाणात मजूर बाहेरून आणतात.गणपतीपुळे ट्रस्टचे चेअरमन विवेक भिडे यांच्याशी चर्चा करताना हा विषय निघाला.मजूर मिळत नसल्यानं आता थेट नेपाळमधून मजूर आणले जातात.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात किमान 12 हजार गुरखे शेतीत कामं करीत असतील.आठ महिने हे गुरखे कोकणात राहतात.पाऊस सुरू झाला की,परततात.मजूर पुरविणारे हे ठेकेदार केवळ शंभर-दोनशे मजूर ज्या बागांना लागतात त्यांनाच त्याचा पुरवठा करतात.चार-दोन मजूर ते देत नाहीत.त्यामुळं ज्यांच्याकडं हजार-दोन हजार आंब्याची झाडं आहेत त्यांनाच मजूर पुरवठा केला जातो.हे मजूर मिळावेत म्हणून मोठे बागायतदार छोटया शेतकर्‍यांची झाडं करारानं घेतात.त्यामुळं दोघांचीही सोय होते.असं सांगितलं जातं की,जे व्यापारी करारानं झाडं घेतात त्याचं नुकसान यासाठी होत नाही की,पीक चांगलं आलं तर प्रश्‍नच नसतो मात्र पीक कमी आलं तरी ते चढया भावानं विकून ते आपला फायदा काढतातच काढतात. त्यामुळं ज्या तक्रारी विदर्भ मराठवाडयातील शेतकरी करीत असतात तशा तक्रारी इकडं येत नाहीत.पावस येथे 12 हजार आंब्यांच्या झाडांचे मालक असलेले देसाई बंधू आंबेवाले भेटले.त्यांच्याकडंही अनेक गुरखे कामाला असल्याचं त्यांनी सांगितलं.मात्र अलिकडं नेपाळमध्येही सुधारणा होत असल्यानं कोकणात येणार्‍या गुऱख्यांची संख्या कमी होत आहे. गुरखे येणं बंद झाले तर पुन्हा  शेतीचा प्रश्‍न निर्माण ङोणार आहे.

कोकणात आणि मराठवाडयातील शेतीत एक फरक सागितला गेला.कोकणात शेती छोटया-छोटया तुकडयात विभागली गेली आहे.त्यामुळं पूरक व्यवसाय केल्याशिवाय ती आता परवडत नाही.त्यामुळं शेती पूरक व्यवसाय तिकडं सुरू झाले आहेत.शंभर टक्के शेतीवर अवलंबून असे फारच कमी शेतकरी असतील.त्यामुळं शेती फसली तरी अगदी आत्महत्येची वेळ येत नाही.विदर्भ किंवा मराठवाडयात असं नाही.बहुसंख्य शेतकरी आजही शंभर टक्के शेतीवरच अवलंबून आहेत.त्यामुळं शेती फसली तर आत्महत्येशिवाय मार्ग उरत नाही.मुंबईत बसणारे अनेक शहाणे शेतकरी आत्महत्येचं कारण म्हणजे त्याचा लग्नात आणि अन्य कार्यासाठी होणारा अवांतर खर्च असल्याचं सांगतात.हे खरं नाही.यंदाचंच पहा.अगोदर बोंडआळीनं खरीप गेलं,आता गारपिटीनं रब्बी गेलं.अनेकांची कर्जे माफ झालेली नसल्यानं कर्ज फेडायचं कसं,पुढच्या वर्षी शेती करायची कशी हा प्रश्‍न आहे.जे नैमित्तिक खर्च असतात ते टाळता येत नाहीत.मग पुन्हा कर्ज आणि पुन्हा थकबाकी हे सुरूच राहतं.हे सारं टाळण्यासाठी पूरक व्यवसाय हवा अशी सूचना एका पत्रकार मित्रानं कोकणात केली.ते खरंही आहे.शेतीवरचं अवलंबित्व कमी करावं लागणार आहे.शेतीत मजूर मिळत नाही आणि दुसरीकडं तरूणांना नोकर्‍या मिळत नाहीत हा विरोधाभास शेतीची जी अवस्था झालेली आहे त्याचा परिपाक आहे.स्वामीनाथ लागू झाला आणि विम्याचं व्यवस्थित नियोजन झालं आणि शेतीला प्रतिष्ठा मिळाली तर यामध्ये बदल होऊ शकतो .त्यादृष्टीनं नियोजन अपेक्षित आहे.मात्र तात्पुरती मलमपट्टी लावण्यातच सार्‍यांना स्वारस्य असल्यानं दुरचा विचार करायला कोणी तयार नाही.खैर कोकणात फिरत असताना आंबा असेल किंवा काजू असेल ही सारी झाडं फुलोर्‍यांनी फुलून गेली आहेत हे चित्र नक्कीच आनंद देणारं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here