बेकारीमुळे तरूण पत्रकाराची वाताहत

0
820

अशी झाली एका तरुण पत्रकाराची  वाताहत…

ह्रदयपिळवटून टाकणारी घटना

शिक्षण एम.ए.मराठी.स्वप्न आकाशाला गवसणी घालण्याचं.आयएएस होण्याचं.ते जमलं नाही.पत्रकार झाला.तीन-चार वर्षे वेगवेगळ्या दैनिकात पत्रकारिता केली.या ना त्या कारणानं जॉब सुटत गेले.एक वेळ अशी आली की,जॉबच मिळेनासे झाले.धावपळ,खटाटोप कमी केले नाहीत.पण कुठं काही जमलं नाही.तीन-चार वर्षे बेकारच होता.त्याचा एवढा वाईट परिणाम झाला की,क्रमशः तो मनोरूग्ण होत गेला.आता वेळ अशी  आली  आहे की उद्या त्याला येरवडयाच्या मनोरूग्णालयात  भरती करायचे आहे.सारी घटना ह्रदयपिळवटून टाकणारी आहे.पत्रकारितेचा मार्ग किती काटेरी आहे हे वास्तवही उलगडून दाखविणारी आहे.

ही कथा आहे शंकर साळुंके नावाच्या मराठवाडयाच्या वडवणी तालुक्यातील एका तरूण पत्रकाराची.घरची अत्यंत गरिबी.दुपारची भा्रंत .वडिल नाहीत.थोरल्या भावाने अत्यंत कष्टानं शिक्षण केलं.शंकरनं त्याचे श्रम वाया जावू दिले नाहीत.चांगल्या गुणांनी तो एम.ए.झाला.एमपीएससी परीक्षा दिली.दोन-तीन प्रयत्न केले.काही जमलं नाही.एक दिवस मला फोन आला.’मी अलिबागला येतोय.मला नोकरीची गरज आहे’..मलाही गरज होतीच.त्याला बोलावून घेतलं.माझ्याकडं आला तेव्हा शंकर 22-23 वर्षाचा असावा.देखणा,उमदा असलेला शंकर राहायला निटनेटका असायचा.पोषाखही स्वच्छ आणि आधुनिक असायचा.आपणास कुणी तरी मोठ्ठ व्हायचं याच स्वप्नात तो वावरायचा .त्यासाठी ही पहिली पायरी आहे असं तो बोलायचा. जवळपास तीन वर्षे त्यानं कृषीवलमध्ये काम केलं.नंतर तो सागरला चिपळूणला गेला.तिथंही वर्षे सहा- महिने कामास होता.तिकडचं हवामान मानवत नसल्यानं मग तेही सोडलं.तेथून थेट बीडला गेला.तिथं काही दैनिकात नोकर्‍या केल्या. बीडची नोकरीही सुटली आणि मग त्याला थेट गावाकडंच परतावं लागलं.अनेक ठिकाणी अर्ज विनंत्या केल्या.कुठंच मेळ लागला नाही.तीन-चार वर्षे मग असेच गेले.घरची हालाखीची परिस्थिती,वरती बेकारी.भावाकडं किती दिवस तुकडे मोडायचे ?या जाणिवेनं शंकर  अस्वस्थ असायचा.भावांनी लग्नाचं पाहिलं.पण बेकार तरूणाला पोरगी तरी कोण देणार ? लग्नही जमत नव्हतं.या सार्‍या परिस्थितीचा त्याच्या मनावर खोलवर  परिणाम होत गेला.

अगोदर असंबध्द बोलणं सुरु झाले.नंतर दिसेल त्याच्यावर रागावणं,मला पेपर सुरू करायचांय म्हणणं,केलक्टर व्हायचं असं सांगत सुटणं असे प्रकार सुरू झाले.बडबड वाढली.हळुहळु लोकही त्याला टाळायला लागले.त्याच्या ही बाब लक्षात आल्यावर तो देखील लोकांपासून फटकून राहू लागला.मग त्यानं दूर शेतात एका नदीच्या काठावरच आपलं बिर्‍हाड हलविलं..हे चार सहा महिने चाललं.हे सारं सुरू असताना त्याच्यावर उपचार होणं आवश्यक होतं.भावांची तळवळ होती पण त्यांच्याही खिश्यात दमडी नव्हती.परिस्थितीनं गांजलेलं हे सारं कुटुंबं शंकरची क्रमशः सुरू असलेली वाताहत उघडया डोळ्यांनी बघत होतं. परिस्थिती हळूहळू अधिकच गंभीर होत गेली.मग लोकांना शिव्या,घरच्यांना मारहाण सुरू झाली.त्याच्या या प्रकारांना घरचेही कंटाळले.गावात चर्चा सुरू झाली,येरवडयाला का पाठवत नाहीत ? पोलिसांकडून पाठविणं जमतंय का ते पाहिलं गेलं.ते जमलं नाही.मग आता चार जणांकडं हात पसरून ,व्याजानं पैसे काढून त्याचे थोरले भाऊ पाराजी साळुंके त्याला घेऊन उध्या येरवडयात दाखल करण्यासाठी येत आहेत.

.शंकर अविवाहित आहे.भाऊ गावात टेलरिंगचं काम करून कुटुंब चालवितो.घरची परिस्थित म्हणजे अन्नान्नदशा अशी आहे.वृध्द आई,भावाच्या शंकरकडून खूपच अपेक्षा होत्या.त्याला मोठं झालेलं त्यांना पहायचं होतं.मात्र नियतीला ते मान्य नसावं.एका फटक्यात स्वतः शंकरच्या आणि घरच्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला.परिणामतः एक तरूण पत्रकार आज अत्यंत हालाखीच्या स्थितीत येरवडयाच्या मनोरग्णालयात भरती होत आहे.त्याला आपण आता कशी मदत करायची हेच मला  समजत नाही.मला खात्रीय,त्याच्यावर योग्य उपचार झाले तर शंकर बरा होईल.त्यासाठी आता मुख्यमंत्री सहायता कक्षाकडं मदत मागणार आहे.इतर कोणी दानशूर मदत करू इच्छित असतील  तर त्याचंही स्वागत आहे.मराठी पत्रकार परिषद शंकरला पाच हजार रूपयांची मदत करीत आहे. शंकरचं किंवा त्याच्या कुटुंबात कुणाचंच बॅकेत खातं नाही.ज्यांना शक्य असेल आणि ज्यांचा आमच्यावर विश्‍वास असेल अशांनी मराठी पत्रकार परिषदेकडे आपली मदत जमा करावी अशी नम्र विनंती आहे.( एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here