एस.एम.देशमुख, अनिकुमार साळवे याना माजलगाव पत्रकार संघाचे पुरस्कार जाहिर- उपमुख्यमंत्री ना.अजित पवारांच्या हस्ते होणार वितरण

एस.एम.देशमुख यांचं महाविद्यालयीन शिक्षण तसेच पत्रकारितेला सुरूवात माजलगावमधून झाली.त्या माजलगाव तालुका पत्रकार संघाचा दर्पण पुरस्कार एस.एम.देशमुख यांना देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे..– माजलगाव तालुका पत्रकार संघ

माजलगाव,दि.10 ः माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दर्पण व माजलगावभूषण पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी देण्यात येणारा दर्पण पुरस्कार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यविश्‍वस्त एस.एम.देशमुख यांना तर माजलगावभूषण पुरस्कार प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक, नाट्यकर्मी प्रा.अनिलकुमार साळवे यांना जाहिर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दि.25 जानेवारी 2020 होणार असल्याची माहिती, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश होके यांनी दिली आहे.मराठी पत्रकार परिषद, मुंबई सलग्न माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने दवर्षी पत्रकारीता क्षेत्रासह सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या माजलगावच्या मातीतील व्यक्तीस दर्पण व माजलगावभूषण पुरस्कार देवून मागील पाच वर्षापासून सन्मानीत करण्यात येते. त्याच प्रमाणे यावर्षीचे पत्रकारीतेतील योगदानाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यविश्‍वस्त एस.एम.देशमुख यांना दर्पण तर सामाजिक, सांस्कृतिक व कला विश्‍वात योगदानाबद्दल लेखक, दिग्दर्शक, नाट्यकर्मी प्रा.अनिलकुमार साळवे यांना माजलगावभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचा वितरण सोहळा शनिवार दि.25 जानेवारी 2020 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार याच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे याची विशेष उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थान आमदार प्रकाश सोळंके हे भुषवणार असून नगराध्यक्ष सहाल चाऊस याची उपस्थिती राहणार आहे.माजलगाव पत्रकार संघाची पुरस्कार निवड समितीमध्ये अध्यक्ष महेश होके, सचिव रत्नाकर कुलथे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नाकलगावकर, पुरूषोत्तम करवा, पांडुरंग उगले, दिलीप झगडे, हरिष यादव, राज गायकवाड, शैलेश कुलथे याचा समावेश होता.

LEAVE A REPLY