आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक देखील काढली जाऊ शकते, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जाऊ शकतो, त्यांना उचलणार नाही एवढा भलामोठा हार ही घातला जाऊ शकतो याचा अनुभव माहूर, श्रीवर्धन आणि सातारयात नुकताच आणि तत्पुर्वी अनेक ठिकाणी घेतला.. सातारयात पत्रकार भवन उभारण्यात आलंय.. त्याचं उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी एसेम देशमुख यांच्या हस्ते झालं.. त्यानंतर त्यांची उघड्या जीपमधून सवाद्य मिरवणूक काढली गेली.. समोर 200 पत्रकार बाईकवर होते.. रस्त्यावरून जाणारे – येणारे उत्सुकतेनं पाहत होते.. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत आणि ही कोणाची मिरवणूक? असे भाव त्यांच्या चेहरयावर होते.. पत्रकारांचीही मिरवणूक निघू शकते यावर लोकांचा विश्वास बसत नसावा ..त्यामुळं ते एस.एम त्यांच्याकडं उत्सुकतेनं पहात होते.. कार्यक्रम ठिकाणी देखील फुलांच्या वर्षावात एस.एम यांचं स्वागत केलं गेलं .. काही दिवसांपुर्वी माहूर झालेला मेळावा असेल, अथवा परवाच श्रीवर्धनला झालेला रायगड प्रेस क्लबचा पुरस्कार वितरण सोहळा असेल, नांदेडकरांचं प्रेम असेल किंवा महाराष्ट्रातलं कोणतंही गाव असेल.. एस.एम जिथं जातात तिथं त्यांना पत्रकारांचं असंच प्रेम, आपलेपणा मिळतो
हे आम्ही आमचं भाग्य समजतो.. व्यावहारिक दृष्ट्या एस.एम पूर्ण “निरक्षर” आहेत.. त्यामुळं त्यांना “माया” जमवता आली नसली तरी राज्यातील पत्रकारांचं, जनतेचं जे प्रेम एस.एम यांना मिळालं किंवा मिळतं आहे तसं प्रेम राज्यातील अन्य कोणत्याही पत्रकाराच्या वाट्याला आलं नाही.. त्यादृष्टीनं आमच्या एवढा श्रीमंत किमान महाराष्ट्रात तरी कोणीच पत्रकार नाही..
एस.एम गेली 30 वर्षे राज्यातील पत्रकारांचे प्रश्न घेऊन लढताहेत.. ही लढाई सोपी किंवा साधी नव्हती.. त्यांना आणि आम्हा सारया कुटुंबाला अनेकदा अग्निदिव्यातून जावं लागलं..पत्रकार चळवळीसाठी त्यांना एक लाख रूपये पगाराच्या दोन नोकरया सोडाव्या लागल्या..त्याची खंत आजही आम्हाला कोणालाच वाटत नसली तरी नोकरया सोडल्यानंतर जी आमच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण झाली, जे हाल झाले त्याला पारावार नव्हता..मुलं शिकत होती आणि उत्पन्नाचं अन्य कोणतंच साधन नव्हतं..त्यामुळं मोठीच आर्थिक कोंडी झाली होती.. एस.एम यांच्या स्वाभिमानी स्वभावामुळे त्यांनी कोणासमोर हात पसरले नाहीत किंवा आपलं सत्वही लिलावात काढलं नाही…त्यांचा देशमुखी ताठा कायम होता.. दिवस कठीण होते पण त्यांनी कधी पत्रकार चळवळीकडंही पाठ फिरवली नाही किंवा परिषदेच्या उपक्रमात खंडही पडू दिला नाही.. एक मिशन म्हणून ते हे काम करीत राहिले.. .. आम्हीही त्यांना कधी आडवलं नाही.. कारण आम्हाला माहिती आहे की, परिषद हा एस.एम यांचा श्वास आहे..डोक्यात कायम चळवळींचा विचार असल्याने त्यांना आम्ही रोखले नाही.. हे सारे दिवस निघून गेले पण त्याकाळातल्या जखमा खोलवर मनात रूतल्या आहेत.. त्या विसरता येणार नाहीत..
आर्थिक अडचणी होत्याच,,त्याचबरोबर इतर संकटंही पिच्छा पुरवत होती.. .. पत्रकारांसाठी काम करताना काही खोटे गुन्हे एस.एम यांच्यावर दाखल झाले, बदनामी करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्नही झाला..मी आणि एस.एम यांनी सरकारची कोट्यवधींची फसवणूक केली असं सांगत एस.एम यांचं यश न पाहणारे काही जण पोस्ट फिरवत होते.. मात्र यानं एस एम ना डगमगले ना त्यांनी हाती घेतलेलं काम सोडलं..आरोप करणारांना अनुल्लेखाने मारत त्यांनी नेटानं मराठी पत्रकार परिषदेची ही चळवळ पुढे नेली.. आज महाराष्ट्रात असा एकही तालुका किंवा जिल्हा नाही की, जिथं मराठी पत्रकार परिषद आणि एस.एम यांचं नाव पोहोचलेले नाही..हे सहज शक्य होत नाही.. कठोर परिश्रम, त्याग आणि कामावरील निष्ठेतूनच हे शक्य होतं..मी आणि सुधांशू कोरोना पॉझिटीव्ह आलो होतो अन त्याच दिवशी हा पठ्ठ्या गावात कोरोना बाधित पत्रकारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपोषण करीत बसला होता.. विषयीप्रतीचा हा समर्पण भाव नेतृतवाकडे अभावानेच दिसतो.. अर्थात त्यांचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं असं नाही.. घरच्या जबाबदारया सांभाळत पायाला भिंगरी लावल्यासारखे या वयातही स्वतः गाडी चालवत एस.एम महाराष्ट्रभर फिरत असतात..गेल्या महिनाभरात त्यांनी जवळपास पाच हजार किलो मिटरचा प्रवास केला.. माहूर ते पणजी, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, मग रायगड, श्रीवर्धन.. पुन्हा मुंबईच्या दोन फेरया.. ही सारी धडपड पत्रकारांचे प्रश्न सुटावेत यासाठी असते.. पत्रकार संरक्षण कायद्याच्या बाबतीत सरकारनं केलेली फसवणूक, गरजू पत्रकारांना पेन्शन देताना केली जात असलेली टाळाटाळ, आरोग्य योजनेची उदासिनता,अधिस्वीकृती देताना होणारा पक्षपात, पत्रकारांवरील वाढते हल्ले हे सारे विषय एस.एम यांना अस्वस्थ करीत असतात..ते सुटले पाहिजेत आणि पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांची सारखी धावपळ सुरू असते.. हे करताना होणारी , दगदग, तणाव, अवेळी जेवण, झोपेचा अभाव या सर्वाचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो आहे..त्यामुळं मुलं हल्ली ओरडत असतात, मलाही काळजी वाटते.. पण थांबतील ते एस.एम कसले? .. कारण “मराठी पत्रकार परिषद हा माझा श्वास आहे आणि पत्रकारांचं कल्याण हा माझा ध्यास आहे” असं ते सांगतात.. ते खरंही आहे.. कारण जेव्हा दौरयावर नसतात तेव्हाही दररोज किमान चार-पाच तास ते परिषदेचं काम करीत असतात.. हे डिव्होशन , ही तळमळ आम्हालाही अचंबित करते.. परिषदेच्या माध्यमातून राज्यात उभी राहिलेली पत्रकारांच्या हक्काची चळवळ सर्वव्यापी व्हावी ही त्यांची अपेक्षा आणि तसा त्यांचा प्रयत्न असतो.. त्यासाठी आता मराठी पत्रकार परिषदेचं युट्यूब चॅनल आणि पोर्टल सुरू करण्याचं नियोजन त्यांच्या डोक्यात आहे.. परवा कोणी तरी बोललं “एस.एम म्हणजे सक्सेस फूल मॅन” हे खरंय.. ते जो विषय हाती घेतात तो यशस्वी करून दाखवितात.. हाती घेतलेल्या कामाच्या मागं हात धुवूनच लागतात.. चॅनल हा छोटा विषय आहे ते यशस्वी करून दाखवतील यात शंका नाही..
त्यांची जिद्द, त्यांची कामावरची निष्ठा, त्याची तळमळ आणि प्रामाणिकपणा याबळावर ते त्यांचं इप्सित नक्की साध्य करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.. 2039 मध्ये परिषद शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.. हा सोहळा दणक्यात साजरा व्हावा यासाठी राज्यातील 25 तरूण आणि समर्पित भावनेनं काम करणारे 25 पत्रकार निवडून परिषदेची सूत्रं त्यांच्याकडं सुपूर्द करण्याचाही त्यांचा मानस आहे..
पत्रकारांचं नेतृत्व करणं, त्यांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करणं ही गोष्ट सोपी नाही.. एस.एम भाग्यवान यासाठी आहेत की, राज्यातील पत्रकारांनी त्यांच्यावर अलोट प्रेम केलं..एस.एम जिथं जातात तिथं एका सेलिब्रिटी प्रमाणे पत्रकार त्यांच्याबरोबर फोटो, सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात.. एक पत्रकार दुसरया पत्रकारांबद्दल फारसं चांगलं बोलत नसताना एस.एम यांना मिळणारं हे प्रेम त्यांच्या व्यक्तीमत्वाची जादू आहे असं मला वाटतं.. पत्रकार त्यांच्यावर फक्त प्रेमच करतात असं नाही तर पत्रकारांचा त्यांच्यावर मोठा विश्वासही आहे.. ..काही नतद्रष्टांनी त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला मात्र पत्रकारांचा त्यांच्यावरील विश्वास जराही ढळला नाही..मी रोज बघते, अनेक पत्रकार मित्र कुटुंब प्रमुखाप्माणे त्यांना फोन करतात, हक्कानं, विश्वासाने त्यांच्याकडे आपली व्यक्तीगत गार्हाणी, अडचणी शेअर करतात.. कोकणात रेस्ट हाऊस बूक करून द्या इथपासून मुलांच्या अॅडमिशन पर्यत अनेक कामं पत्रकार त्यांना सांगतात.. असे फोन आले की, आमची चिडचिड होते.. रेस्ट हाऊस बुक करणे तुझं काम आहे का? असा सवाल आम्ही त्यांना करतो.. त्यावर ते म्हणतात, *हा पत्रकारांचा माझ्याप्रती असलेला आपलेपणा आहे.. मला वाईट वाटत नाही”.. असं म्हणून फोन उचलतात आणि पत्रकाराची कोकणातली सोय करून देतात.. पत्रकारांचा हा विश्वास एस एम यांचं सर्वात मोठं बलस्थान आहे.. असं मला वाटतं..
लहानपणापासूनचं एस.एम यांच्याकडे नेतृत्वगुण आहेत. स्वभावात बंडखोरी असल्यामुळे ते अन्यायाच्या विरोधात पेटून उठतात.. आवडत्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे त्यांनी आठवीत असताना सर्व मुलांना एकत्र करून मोर्चा काढला होता.. नंतरच्या काळात मोर्चे, आंदोलनं, उपोषणं, चळवळी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले.. पत्रकारितेत आल्यानंतर सातव्या वर्षी आणि वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना संपादक म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली.. ते ज्या ज्या दैनिकात संपादक म्हणून गेले ते ते दैनिक त्यांनी यशाच्या शिखरावर नेले.. ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले..
एस.एम चांगले संघटक आहेत.. स्पष्टवक्ते आहेत.. थोडे रागीटही आहेत.. असं असतानाही राज्यातील पत्रकारांनी त्यांना गेली 30 वर्षे सांभाळून घेतलं, त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्यावर प्रेम केलं त्याबद्दल पत्रकार मित्रांचे, जिल्हा, तालुका पत्रकार संघाचे कोणत्या शब्दात आभार मानावेत कळत नाही..
आम्ही सारे कुटुंबीय कायम आपल्या श्रुणातच राहू इच्छितो.. ..
शोभना देशमुख
आकाशवाणी प्रतिनिधी