अर्णब गोस्वामी पत्रकार आहे का ? – बरखा दत्त
नवी दिल्ली, दि. २८ – एनडीटीव्ही वृत्तवाहिनीच्या प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. टाइम्स नाऊ वाहिनीने पत्रकारांवर खटले भरण्याची त्यांना शिक्षा करण्याच्या मुद्यावर चर्चा घडवून आणली. त्यावर बरखा दत्त चांगल्याच संतापल्या आहेत.
हा अर्णब गोस्वामी पत्रकार आहे ? या चर्चेमुळे मला मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात असल्याची लाज वाटते अशा शब्दात बरखा यांनी अर्णबवर आगपाखड केली आहे. अर्णब डरपोक ढोंगी आहे अशी टीका बरखा यांनी केली आहे.
अर्णब पाकिस्तान समर्थनाची विधाने करतो पण जम्मू-काश्मीरमधल्या भाजप-पीडीपी आघाडी सरकारबद्दल एक शब्दही का बोलत नाही ?, मोदींच्या पाकिस्तानबद्दलच्या भूमिकेबद्दलही अर्णब का गप्प आहे ? अर्णब गोस्वामी देशभक्तीच्या गोष्टी करतो मग तो केंद्र सरकारबद्दल गप्प का आहे ? चमचेगिरी ? असे प्रश्न बरखा दत्त यांनी विचारले आहेत. एक पत्रकार सरकारला काही प्रसारमाध्यमांची तोंड बंद करायला सुचवत आहे. ते आयएसआय एजंट, दहशतवादाचे सहानुभूतीदार असल्याचा समज निर्माण करुन दिशाभूल करत आहे. त्यांच्यावर खटला चालवण्याची मागणी करतो आणि आम्ही गप्प बसतो. पण मी घाबरणार नाही. गोस्वामी तुमच्या शो मध्ये तुम्ही माझे नाव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कितीही वेळा घ्या मी घाबरणार नाही असे बरखा दत्त यांनी म्हटले आहे.
-(ऑनलाईन लोकमतवरून साभार)