शेतकर्‍यांना वरदान ठरणारे एसआरटी तंत्र काय आहे ?

0
1764

नेरळ नजिकचे  सगुणाबाग आज निसर्गप्रेमींसाठी महत्वाचे पर्यटन स्थळ ठरलेलं आहे. तेथील पन्नास एकर परिसरात निसर्गाच्या विविध छटा आपणास अनुभवयास मिळतात.शहरी पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविताना अगदी ‘बफोले राइडस’ पासून अनेक गोष्टी सगुणाबागेत आपणास बघायला आणि अनुभवायाला मिळतात.कृषी पर्यटन काय असते हे तिथं गेल्यावर दिसतं.कृषी पर्यटनाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय अर्थातच शेखर भडसावळे यांना आहे.परदेशातली गलेलठ्ट पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून भडसावळे नेरळमध्ये आले आणि वेगळी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली.आज त्याचा मुलगा सून आणि पत्नी हे सारं कुटुंब या व्यवसायाशी जोडले गेलेले आहे.ही सारी मंडळी उच्चविद्याविभूषित आहेत. निसर्गाबद्दल असलेलं ममत्व,शेतीबद्दलची तळमळ यातून त्यांनी सगुणाबागेत नंदनवन फुलविले आहे.दररोज हजारो पर्यटक सगुणाबागेत निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद घेत असतात.शनिवार,रविवार तर परिसरात जत्राच भरलेली असते.

मी अनेकदा सगुणाबागेत गेलेलो आहे.कालही रायगड प्रेस क्लबच्या प्रगतीशील शेतकर्‍यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं दिवसभर सगुणाबागेत होतो. सोबत कोकण विभागाचे कृषी सहसंचालक श्री.अशोक लोखंडे, आमचे मित्र सुनील वाळुंजही होते.कार्यक्रम वगैरे संपल्यानंतर शेखर भडसावळे यांच्याकडं आम्ही भोजणाचा आस्वादही घेतला.यावेळी त्यांनी शेतीत  जे प्रयोग केले त्याची माहिती दिली.शेतकरी आत्महत्या आणि अन्य विषयावर ते तळमळीने बोलत तर होतेच त्याचबरोबर यावरचे उपायही ते सांगत होते.शेतीवरचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविले तर शेतीमधील अनेक त्रासातून शेतकरी मुक्त होऊ शकेल असा विश्‍वास त्यांनी बोलून दाखविला.केवळ ते बोलूनच थांबले नाही तर त्यांनी विकसित केलेल्या एस.आर.टी तंत्राची इत्यंभूत माहितीही त्यांनी दिली.एसआरटी म्हणजे सगुणा राईस तंत्र.या तंत्राचा अवलंब करताना शेतीत नांगरणी,चिखलणी,आणि लावणी न करता कायम स्वरूपी गादी वाफ्यावर टोकणणी करून भरघोस पिक पिकविता येते हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला आहे.शेतीमध्ये नांगरणी,चिखलणी,लावणी या गोष्टी कमालीच्या खर्चीक आणि वेळखाऊ आहेत.या सार्‍या परंपरागत तंत्राला फाटा देता आला तर शेतीतील खर्च थेट पन्नास ते साठ टक्के कमी होतो.शिवाय वेळेचीही बचत होते . हा  सारा खर्च वाचून उत्पादन वाढणार असेल तर किती मजा आहे ?.ते सांगतात,मी स्वतः सात वर्षे माझं शेत नांगरलं नाही तरीही माझ्या जमिनीचा कस पुर्वी पेक्षा जास्त चांगला झाला असून जमिन भुसभुसीतही झालेली आहे.एस.आर.टी पध्दतीचे फायदेही त्यानी सांगितले.ते म्हणाले,या पध्दतीत वापरलेल्या गादी वाफ्यामुळे भात रोपांच्या मुळाशी प्राणवायुचे सुयोग्य प्रमाण तसेच पुरेसा ओलावा ( वाफसा) राहतो.साच्यामुळे दोन रोपातील नेमके आणि सुयोग्य अंतरही राहते आणि त्यातून प्रती एकर रोपांची संख्या नियंत्रित करता येऊ शकते.अगोदरच्या रोपांची पिके जमिनीत जागेलाच ठेवल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब चटकन वाढतो.परिणामी रोग आणि किडीचा त्रास कमी होतो.तसेच विपूल प्रमाणात गांडुळांचा संचार सुरू होतो.यामध्ये लावणीची पायरी नसल्याने पावसाच्या लहरीपणाचा परिणाम होऊ शकत नाही.म्हणजेच पावसाकडे डोळे लाऊन बसण्याची गरज नसते.पावासाचा ताण पडला तरी लगेच पिकांवर परिणाम होत नाही आणि अवकाळी पावसाचा फटकाही पिकाला बसत नाही.कर्बाचे स्थिरीकरण काय असते आणि त्यामुळे काय होणार आहे हा विषय देखील भविष्यासाठी भडसावळे यांच्याकडून समजून घेण्याची गरज आहे.

या पध्दतीचे वीस फायदे असतात.त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या पध्दतीचा अवलंब करून आपल्या खर्चात ,श्रमात बचत करावी आणि आपले उत्पादन वाढवावे असे आवाहन शेखर भडसावळे करतात.या पध्दतीचा प्रचार ते  विविध ठिकाणी बैठका,स्लाईड शोच्या माध्यमातून करतात.तसेच सगुणाबागेत येणार्‍या हजारो शेतकर्‍यांना ते नव्या तंत्रासाठी मागदर्शनही करतात.हे त्रंत्र जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यत पोहोचावे यासाठी त्यांची धडपड त्यांच्या बोलण्यातून ,कृतीतून दिसते.मराठवाडयासाऱख्या कायम दुष्काळी भागात या तंत्राचा वापर करून खर्च कमी करता येऊ शकतो हे सांगायला ते विसरले नाहीा.तुमच्या गावातील शेतकर्‍यांना घेऊन या,मी त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे प्रयोग केला आणि त्यात त्यांचे नुकसान झाले तर ते नुकसान भरून द्यायची देखील तयारी ते दाखवितात.कृषी विद्यापांठांनी हे तंत्र अजून मान्य केले नसले तरी हरकत नाही.या तंत्राचा वापर आता शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत याचा आनंद शेखर भडसावळे यांना नक्कीच आहे.ज्यांना आधुनिक तंत्राच्या सहाय्यानं शेती करायची आहे त्यांनी सगुणाबागेला नक्की भेट द्यावी.

त्यासाठी त्यांचा पत्ता आहे,कृषीभूषण शेखर भडसावळे,सगुणाबाग,मालेगाव नेरळ,ता.कर्जत जि.रायगड 410101

फोन 02148-238438,7057476221,7798720272

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here