पत्रकार बापू आफळेचे कुटुंब वाऱ्यावर

0
1211

पत्रकारांनी पेन्शनसाठी सरकारकडं लाचारी करू नये,आपला स्वाभिमानी बाणा दाखवावा असे सल्ले देणाऱ्या मुंबईस्थित काही सुखवस्तू पत्रकार मित्रांनी पत्रकारांना पेन्शनची किती गरज आहे हे जाणून घेण्यासाठी सातारा येथील नुकतेच निधन झालेल्या पत्रकार बापू आफळे यांच्या कुटुबियांची मुद्दाम भेट घ्यावी,मग त्यांना कळेल ग्रामीण भागातील पत्रकार कोणत्या अवस्थेत कशा परिस्थितीत जीवन जगताहेत ते..

मी,किरण नाईक काल साताऱ्यात होतो.जिल्हा पत्रकार संघाची बैठक झाल्यानंतर शरद काटकर यांना घेऊन आम्ही मुद्दाम बापू आफळे यांच्या कुटुबियांना भेटायला गेलो.शहराच्या एका टोकाला घर होते.घर कसले ते दहा बाय दहाची पत्र्याची शेडच ती.प्रथमदर्शनीच दारिद्‌÷यानं गांजलेलं हे घर आहे याचा साक्षात्कार होतो.याच घरात बापू,त्याची पत्नी आणि मुलगा तेजस राहायचे.बापू गेला.आता तेजस आणि त्याची आई असे दोघेच येथे राहतात. आयुष्यभर अंगावर येऊन कोसळणाऱ्या संकटांनी कृश झालेलं शरीर,डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा आणि काळजीनं काळवंडलेला चेहरा अशा अवस्थेत असलेल्या त्या माऊलीच्या मनात किती प्रश्नांचं कोलाहल माजलं असेल याची कल्पना येऊ शकते.त्या अवस्थेतही बापूनं एखादं छप्पर घेऊन ठेवलं असतं तर आम्ही कसं तरी जगू शकलो असतो असं त्यांनी सांगितल्यावर आपल्या काळजाचं पाणी पाणी व्हायला लागतं.
अठराविश्वे दारिद्रय असल्यानं मुलाच्या शिक्षणाची आबाळ झाली.तेजसला पुण्यात वैदिक पाठशाळेत ठेवलं होतं पण त्याचं शिक्षण पूर्ण झालं नाही.इकडं शाळेतही जेम-तेम सातवी-आठवीपर्यतच शिक्षण झालेलं.त्याची व्यवस्था कोठे लावावी कळत नव्हतं.चिपळूणचे आमचे एक ज्यष्ट संपादक मित्र नानासाहेब जोशींना फोन लावला.ते चिपळूणच्या एका मोठ्या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.तेजसला मंदिरात पुजारी किंवा तत्सम काम द्यावी अशी विनंती ( नव्हे आग्रह्च) मी त्यांना केला.त्यांनीही तो मान्य केला.विधी वगैरे संपल्यानंतर त्याला माझ्याकडं पाठवा मी त्याची सोय लावतो असं त्यांनी सांगितलं.बघू यात आता पुडं काय होतं ते..
घरातून बाहेर पडताना मन सुन्न झालं होतं.एका हाडाच्या पत्रकाराच्या आय़ुष्याची झालेली वाताहत आणि आता त्याच्या कुटुबाची चाललेली परवड पाहवत नव्हती.पत्रकारांना विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांच्या नशिबी सर्वत्र हेच भोग येतात.परवा मंचरला एका कार्यक्रमात मी जेव्हा पत्रकार पेन्शनचा विषय काढला तेव्हा मुंबईतील काही ज्येष्ठ पत्रकारांनी त्याला विरोध केला.पत्रकारांनी सरकारकडं लाचार होऊ नये असं ज्ेयष्ठ पत्रकारांचं म्हणणं होतं.भरल्यापोटी स्वाभिमान माणसाला सुचू शकतो, पण बापू आफळेच्या पत्नीला आणि मुलाला आपण स्वाभिमानानं जगा असं मी कसं सागू ? दिशाहिन झालेले हे आई आणि मुलगा यांना स्वाभिमानाचे डोस कोणी मुर्दाडमनाचा माणूसच पाजू शकतो.माझ्या सारख्या संवेननशील माणसाचं हे काम नाही.
पत्रकार बापू आफळेचं कुटुंब आज ज्या अवस्थेत आहे ती अवस्था काही एकट्या बापू आफळे यांच्याच कुटुंबाची नाही.काही दिवसांपूर्वी वाशिमच्या एका पत्रकाराचं निधन झालं होत.त्यां पत्रकाराच्या वडिलांचा फोन आला होता.आमच्या घरात एकटा मुलगाच कमवता होता.तो गेला.आता मी,सून माझी पत्नी आणि नातूच आहोत.कमवता मुलगाच गेल्यानं उत्पन्नाचं अन्य साधन नाही.काही मदत करता आली तर बघा असं त्यानंी सांगितलं.काय करणार? शंकरराव कल्याण निधीसाठी अधिस्वीकृतीधारक पत्रकार हवा असतो.त्यांच्याकडं ती नव्हती.त्यामुळं काही सरकारी मदत मिळण्याची शक्यताच नाही.दोन्ही प्रकरणं गेली काही दिवस मला अस्वस्थ करून टाकताहेत.
कोरडी सहानुभूती ,कोरडे उसासे काही कामाचे नाहीत.अशा कोरड्या आणि शुष्क शब्दांनी पत्रकारांच्या कुटुंबियासमोर जे अनंत प्रश्न उभे आहेत त्याचा गुंता सुटत नाही.कोरड्या सहानुभूतीनं बळ मिळतं वगैरे खरं नाही.त्यामुळं अशा आपत्तीत सापडलेल्या पत्रकारांना काही मदत करता यावी यासाठी एक ट्रस्ट स्थापन कऱण्याचा प्रयत्न सुरू आङे.मोठी रक्काम जमा करून त्यातून गरजू पत्रकारांना काही मदत करता आली तर बघावी असा प्रयत्न आहे.अर्थात ते सारं होईल तेव्हा होईल.आज बापू आफळेच्या कुटुंबांना मदतीची गरज आहे.ज्या पत्रकारांनी किंवा ज्यांच्या संवेदना शाबूत आहेत अशा कोणीही आफळेंच्या कु टिु बांना मदत केली तर फार बरे होईल.त्यांना मदतीच अत्यंत गरज आहे.ज्यांना मदत करावी वाटते त्यांनी माझ्या 9423377700 वर माझ्याशी संपर्क साधावा मी तेजस आफळेचा नंबर संबंधितांना देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here