दिल्ली, दि. १५ – बिहारमध्ये पत्रकार राजदेव रंजन आणि झारखंडमध्ये अखिलेश प्रताप सिंह या दोन पत्रकारांच्या २४ तासात झालेल्या हत्यांमुळे पत्रकारांच्या सुरशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०१५ च्या एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार पत्रकारांसाठी धोकादायक असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश होतो.
इराक आणि सिरीयानंतर भारत पत्रकारांसाठी तिसरा धोकादायक देश आहे. १९९२ पासून आतापर्यंत भारतात एकूण ६४ पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. भ्रष्टाचार उघड केला म्हणून यातील बहुतांश हत्या झाल्या आहेत असे प्रोटेक्ट जर्नलिस्ट समितीने म्हटले आहे.
बहुतांश हत्या या छोटया शहरातील पत्रकारांच्या झाल्या आहेत. छोटया शहरात तोंड बंद ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर लाच दिली जाते. हा व्यवहार उघड करणे म्हणजे मोठा उद्योजक किंवा राजकारण्याशी शत्रूत्व ओढवून घेणे असते. भारतात पत्रकारांच्या मोठया प्रमाणावर हत्या होतात. फक्त इराक आणि सिरीयापेक्षा हा आकडा कमी आहे.
आशिया खंडात भारत पत्रकारीतेसाठी धोकादायक देश आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षाही इथे धोका आहे असे अहवालात म्हटले आहे. पीसीआयच्या अहवालानुसार मागच्या दोन दशकातील पत्रकाराच्या हत्यांची ९६ टक्के प्रकरणे कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाहीत. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी भारतातील पत्रकारांच्या विविध संघटनांनी नेहमीच कठोरात कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे.(lokmat)