लोकमतवर ठिकठिकाणी झालेल्या हल्ल्यांबाबत राजकीय पक्ष तोंडाला कुलुपे लावून बसलेली असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यानी मात्र लोकमतवरील हल्लयाचा निषेध केला आहे.एवढेच नव्हे तर माध्यम स्वातंत्र्य जेवढे हिंदुंनी मान्य क रायला पाहिजे तेवढेचे ते मुसलमानांनीही मान्य केले पाहिजे असे स्पष्ट शब्दात ठणकावले आहे..माध्यमांवर हल्ले होत असताना आणि वृत्तपत्रांचा आवाज वेगवेगल्या पध्दतीनं बंद कऱण्याचा प्रयतन् होत असताना समाजातील बुध्दीवादीं,वृत्तपत्र स्वातंत्र्याचा तसेच विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्यांनी त्याविरोधात पुढं आलं पाहिजे.विश्वंभर चौधरी यांनी निडरपणे हे काम केले आहे.आम्ही त्यांचे आभारी आहोत.
विश्वंभर चौधरी यानी आपल्या फेसबुक वॉलवर टाकलेली प्रतिक्रिया येथे देत आहोत.
आणि हे कट्टर वगैरे इस्लामवादी. लोकमतच्या कार्यालयात धूडगूस घालून धर्म मोठा होतो असा त्यांचा समज आहे. करावा तेवढा निषेध कमी आहे. आता इथे लोकमतच्या जागी सामना, ऑर्गनायझर वगैरे कोणीही असतं तरी मी निषेधच केला असता. माध्यमस्वातंत्र्य जेवढं हिंदूंनी मान्य करायला पाहिजे तेवढंच ते मुसलमानांनीही केलंच पाहिजे. कायदा हातात घ्याल तर अल्पसंख्यांक असाल नाहीतर अत्यल्पसंख्यांक; उन्मादी कृत्यासाठी गजाआड जावंच लागेल हे कोणीतरी ठणकावून सांगायची वेळ आली आहे. सेक्युलॅरिझम केवळ हिंदूंसाठी नसतो, मुसलमानांसह देशातील सर्व नागरिकांसाठी तो असतोच असतो.
धर्मावरूनंच केवळ भावना भडकतात का? मुस्लीम तरूणांच्या बेरोजगारीवरून, मुस्लीम स्त्रियांना न मिळणार्या पोटगीवरून, मुस्लीम स्त्रियांच्या शिक्षणाची आबाळ चालल्यावरून कधी भावना नाही भडकत तुमच्या?
धार्मिक भावना वगैरे बाष्कळपणा आहे. त्या भडकल्या म्हणून दगड उचलणारे हात “नमाजी” हात असू शकत नाहीत. त्याचप्रमाणं तसे हात हिंदू असतील तर कोणत्याच देवाला त्या गुंड हातांकडून पूजा करून घ्यायला आवडणार नाही.
कुर्ल्यात थिएटरमध्ये जन गण मन चालू असतांना उभं न राहणं देशविरोधी आहे. हे पहिल्यांदा सांगून झाल्यावर हेही सांगितलं पाहिजे की राष्ट्रगीताचा आदर न राखल्यास कारवाई करण्याचं काम संविधान नियुक्त पोलिसांचं आहे, स्वयंघोषित देशभक्तांचं नाही! या देशाचे नागरिक म्हणून मान्यता मिळायची असेल तर हिंदू असा, मुसलमान असा नाहीतर अन्य कोणीही असा, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजचिन्ह यांचा सन्मान करावाच लागेल. हा ऐच्छिक विषय नाही.
या देशात काही प्रश्न असे आहेत की ते विचारल्यावर मुस्लीमांची अडचण होईलंच होईल पण हिंदूंमधल्याही अनेकांची ती होईल.
देशभावना आधी की धर्मभावना?
कुराण की संविधान किंवा
भगवद्गीता की संविधान?
जन गण मन की वंदे मातरम? (म्हणजे केवळ वंदे मातरमच)
तिरंगा की भगवा?
तिरंगा की हिरवा?
हे ते काही असे प्रश्न आहेत जे कदाचित या देशातील बर्याच जणांना विचारलेले सुद्धा आवडणार नाहीत!
पण हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने ते विचारवेच लागतील.