बाळशास्त्री जांभेकरांची 20 फेब्रुवारीला जयंती
प्रथमच शासकीय स्तरावर साजरी होणार 

मुंबई ः आद्य पत्रकार,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्य सरकारने थोर पुरूषांच्या यादीत समावेश केल्याने येत्या 20 फेब्रुवारी 2021 रोजी बाळशास्त्री जांभेकरांची 209 वी जयंती प्रथमच राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जात आहे..उशिरा का होईना सरकारने बाळशास्त्री जांभेकरांचा थोर व्यक्तीच्या यादीत समावेश करून त्यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी सरकारला धन्यवाद दिले आहेत.मराठी पत्रकार परिषद देखील 20 फेब्रुवारी रोजी राज्यभर बाळशास्त्रींची जयंती साजरी करीत आहे.
बाळशास्त्री जांभेकर यांची जन्म तारीख कोणती याबद्दल विविध मतप्रवाह आहेत.फेब्रुवारी 1812 च्या शेवटच्या आठवडयात बाळशास्त्रींचा जन्म झाला असावा असे बहुतेकांचे मत आहे..शासकीय स्तरावर देखील या संदर्भात संभ्रम आहे.त्यामुळेच 14 जानेवारी 2021 रोजी राज्य सरकारने काढलेल्या जीआरमध्ये 16 फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती असल्याचे म्हटले होते.मात्र 11 फेब्रुवारी रोजी सरकारने शुध्दीपत्रक काढून 20 फेब्रुवारी रोजी शासकीय,निमशासकीय कार्यालयात बाळशास्त्रींची जयंती साजरी करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्यामुळे यंदा प्रथमच राज्यात शासकीयस्तरावर बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी होत आहे..गुगलवर बाळशास्त्रींचा जन्म 6 जानेवारी रोजी झाल्याचे म्हटले आहे..मात्र ते तद्दन चूक असून ही चूक दुरूस्त करण्यासाठी परिषद गुगलकडे पाठपुरावा करीत आहे.6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी नियतकालिक सुरू केले होते.त्या दिवशी बाळशास्त्रींचा जन्म झालेला नाही..
बाळशास्त्रींच्या जन्मतारखेप्रमाणेच त्यांच्या छायाचित्रांबद्दल देखील मतप्रवाह आहेत..गुगलवर बाळशास्त्री जांभेकरांची चार भिन्न छायाचित्रं आहेत.मात्र मराठी पत्रकार परिषदेने प्रसिध्द केलेले जांभेकरांचे छायाचित्र हेच योग्य असल्याचे मत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते.2000 मध्ये पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या छायाचित्राचे प्रकाशन करण्यात आले होते.बाळासाहेब ठाकरे यांनी मान्यतेची मोहर उमटविलेले छायाचित्रच सरकारने वापरावे यासाठी मराठी पत्रकार परिषदेने पाठपुरावा केला होता.गेली दोन वर्षे सरकारचे माहिती आणि जनसंपर्क खाते हे छायाचित्र वापरत आहे.बाळशास्त्री जांभेकर यांचं वयाच्या केवळ 32 व्या वर्षी निधन झालं होत..त्याचं शरीर व्यायामानं पिळदार झालेलं होतं आणि बुध्दीमत्तेचं तेज त्यांच्या चेहरयावर विलसत होतं.यासर्व गोष्टीचा विचार करून मुकुंद बहुलेकर या प्रसिध्द चित्रकाराने हे छायाचित्र काढले होते.सर्व सरकारी कार्यालयाने देखील खालील छायाचित्रंच वापरावे असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे.

बाळशास्त्रींची जन्म तारीख 20 फेब्रुवारी 1812
बाळशास्त्रींचा मृत्यू 18 मे 1846

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here