हाराष्ठ्रात  भाजपविरोधात कॉग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,मनसे अशी महाआघाडी होईल काय ? या प्रश्‍नाचं उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ अशा दोन शब्दात देता येणं कठीण आहे.याचं कारण या चारही  पक्षांचे  परस्पर विरोधी स्वभाव,संस्कृती.विचारसरणी,धोरणं हे आहे.या चार पक्षांचं राजकारण पाहिलं तरी कुठेही समानता दिसत नाही.कॉग्रेस आणि राष्ट्रवादी भलेही आपण समविचारी आहोत असं म्हणत असले तरी हा समविचार फक्त सत्ता  मिळविण्यापुरताच आहे.शिवसेना आणि मनसेचा परस्पर विरोध किती कडवा आहे हे महाराष्ट्रानं वेळोवेळी अनुभवलं आहे.शिवसेनेची राष्ट्रवादीबद्दलची भूमिकाही लपून राहिलेली नाही.त्यामुळं अनेकांना असं वाटतं की,अशी तत्वशून्य महाआघाडी शक्य नाही.’राजकारणात काहीच अशक्य नाही’ असं समजणारा दुसरा एक घटक असतो,त्याला वाटतं भिन्न स्वभाव असलेले आणि भिन्न विचारसरणी असलेले हे चारही पक्ष एकत्र ही  येऊ शकतात.या दाव्याला त्यांच्याकडं आधार आहे तो,गेल्या चार दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींचा.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सहज हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी शरद पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली नाही.या भेटीत निश्‍चित अशी काही रणनीती ठरली असावी असा दावा कऱणारे अऩेकजण आहेत.राज ठाकरे याचं पाडवा मेळाव्यातील भाषण या दाव्याला पुष्टी देणारं आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस हे ठाकरे कुटुंबासाठी ‘ठोकायला हक्काचं गिर्‍हाईक’ आहे.शरद पवारांवर टीका केली नाही अशी एकही सभा ना बाळासाहेबांची झाली,ना उध्दव ठाकरेंची झाली ना राज ठाकरेंची.मग आजच असं काय घडलं की,राज ठाकरे यांनी आपल्या जवळपास दोन तासाच्या भाषणात एकदाही ना शरद पवारांवर टीका केली ना शिवसेनेला झोडलं ना कॉग्रेसचा समाचार घेतला.या तीनही पक्षांवर टीका करायला राज ठाकरे विसरले असं तर होऊ शकत नाही.याचा अर्थ असा की,राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रीप्ट शरद पवार यांच्या घरी तयार झालेली दिसते.युपी आणि बिहारच्या पोटनिवडणुकांनंतर देशात सध्या मोदी आणि भाजप विरोधी वातावरण आहे.याचा फायदा घेणे आणि आपलं संपलेलं अस्तित्व पुन्हा निर्माण करणं हाच या स्क्रीप्टचा अर्थ आहे.राष्ट्रवादी सत्ताच्यूत झालेली आहे.मनसेचं अस्तित्व केवळ राज ठाकरे याच्या भाषणाला गर्दी जमण्यापुरतंच राहिलेलं आहे.एकही खासदार,आमदार किंवा मुंबईत नगरसेवक नसलेला पक्ष म्हणजे मनसे.राष्ट्रवादीची एवढी दिवाळखोरी जाहीर झालेली नसली तरी भाजपच्या विरोधात आपण एकत्र लढलो नाहीत तर आपला पक्षही दिवाळखोरीत निघणार हे शरद पवार यांना उमगलेलं आहे.ते होऊ नये म्हणून शरद पवार यांची धडपड सुरू झालेली दिसते.शरद पवारांचं राजकीय चरित्र बघता त्यांना वर्ज्य असं काहीच आणि कोणी नाही.’राजकीय अस्पृश्यता’ त्यांना अजिबात मान्य नाही.त्यामुळंच ते न मागता भाजपला पाठिंबा देऊ शकतात किंवा राज ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसू शकतात. ते सोयीनुसार आणि गरजेनुसार कोणाच्याही जवळ आणि कोणापासूनही दूर जावू शकतात.या त्यांच्या राजकीय स्वभावानुसारच त्यांनी स्क्रीप्ट तयार केलेली असू शकते.मनसेचं काय ते आज एकाकी आहेत. कोणाचा तरी हात पकडला नाही तर मनसे 2019 मध्ये फार मोठा दिवा लावेल असं कोणालाच वाटत नाही.कॉग्रेसची स्थितीही या दोघांपेक्षा वेगळी नाही.त्यामुळं हे तीनही पक्ष आज अगतीक आहेत आणि या अगतिकतेतूनच  एकत्र येण्याचे नारे हे पक्ष देत आहेत.शिवसेनेची अगतिकता थोडी वेगळ्या धाटणीची आहे.सेना जरूर सत्तेत आहे पण केवळ नावापुरतीच.आपण सत्तेत असूनही सत्तेचे लाभ आपणास मिळत नाहीत ही सेनेची दुखरी नस आहे..एकत्र निवडणुका लढल्या तर त्याचा फायदा आपल्यापेक्षा भाजपलाच जास्त होत असल्याचं वास्तवही सेना नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे.त्यातून ही स्वाभिमानाची वगैरे भाषा. .म्हणजे प्रश्‍न पुन्हा अस्तित्वाचाच.जेव्हा प्रश्‍न अस्तित्वाचा निर्माण होतो तेव्हा विचारसरणी,भूमिका आणि असे मुद्दे गौण ठरतात.भाजप विरोधकांची ही स्थिती आहे.त्यामुळं राष्ट्रवादी आणि मनसे किंवा मनसे आणि सेना किंवा सेना आणि कॉग्रेस हे पक्ष एकत्र येणारच नाहीत असा दावा कोणी करू शकत नाही.राज ठाकरे यांनी कॉग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आपल्या भाषणात ज्या पध्दतीनं ‘सांभाळून घेतलंय’ ते बघता ‘काही तरी शिजतंय’ असं ठामपणे म्हणता येऊ शकतं.
ज्याचं आपण तोंड बघत नव्हतो त्यांचा हात हात घेण्याचा प्रयत्न केवळ महाराष्ट्रातच सुरूय असं नाही.अन्य राज्यातही विळे-भोपळे एकत्र येत आहेत गेलाबाजार त्या अंगानं चर्चा सुरू झाल्या आहेत.महाराष्ट्रात शिवसेना आणि मनसे ज्या पध्दतीनं परस्पर विरोध करतात त्याच पध्दतीचा किंबहुना कांकणभर जास्त विरोध युपीमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष परस्परांचा दुःश्‍वास करीत होते. अखिलेश आणि मायावती यांचे हे पक्ष कायम परस्परांचे स्पर्धक आणि विरोधक राहिलेले आहेत. मात्र युपीत दोन्ही पक्षांची दाणादाण उडाली.भाजपनं राज्यातील सत्ता बहुमतानं ताब्यात घेतली.दिल्लीत भाजपची जी दादागिरी चालते त्याला बळही युपीतून आलेले खासदारच देत असतात.ही वस्तुस्थिती बदलायची आणि पुढील निवडणुकीत जर आपलं अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण एकत्र येणं आवश्यक आहे हे या दोन्ही पक्षांच्या ध्यानात आलं आणि ‘बुवा-भतिजा’ एकत्र आले.त्याचा परिणामही युपीतील गोरखपूर आणि फुलपूर येथील पोटनिवडणुकीत दिसला.या दोन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला झटका दिला.परस्परांचे हाडवैरी असलेले हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतील याचा अंदाज भाजपला शेवटपर्यंत आला नाही.त्यांची फसगत झाली.2019 मध्ये या दोन्ही पक्षांबरोबर जर कॉग्रेस गेली तर तेथील पन्नास-साठ जागा भाजपला गमवाव्या लागतील हे आकडेवारीवरून दिसते.
बिहारमध्ये नितीशकुमार आज जरी भाजपबरोबर असले तरी ‘हवा का रूख’ पाहून त्यांना देखील आपण सेक्यूलर असल्याचा साक्षात्कार होऊ शकतो.तिकडंही लालूंचा राष्ट्रीय जनता दल,रामविलास पासवान यांचा पक्ष उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.या सर्व पक्षांमध्ये परस्पर विळा भोपळ्याचंच नातं राहिलेलं आहे.बिहारमधील अरारिया आणि जेहनाबादच्या निवडणुकांनंतर  ही प्रक्रिया अधिक गतीमान होताना दिसते आहे.लालूप्रसाद तुरूंगात असले तरी त्यांच्याबाजुनं सहानुभूतीची लाट निर्माण होताना दिसते आहे.म्हणजे परस्पर गरज मागचं सारं विसरायला लावून दोन हाडवैर्‍यांना एका व्यासपीठावर यायला भाग पाडत आहे.
झारखंडमध्ये देखील अशीच स्थिती आहे.तिथं झारखंड मुक्ती मोर्चा,झारखंड विकास मंच आणि कॉग्रेस यांची भाजपच्या विरोधात आघाडी होऊ शकते.कारण झारखंडमध्येही या तीनही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असल्यानं ते आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी एकदिलानं भाजपच्या विरोधात उभं राहतील.त्यासाठी आपसातील वाद काही काळांसाठी तरी विसरतील.
एवढंच नव्हे तर दिल्लीत सोनिया गांधी यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी परवा जी बैठक घेतली आणि त्याबैठकीस जे उपस्थित होते त्यांची नावं पाहिली तर लक्षात येईल की,परस्पर अंतर्विरोध असलेले आणि प्रसंगी एकमेकांची तोंडही न बघणारे हे पक्ष एकत्र येताना दिसत आहेत..त्रिपुरातील पराभवाचा धसका पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे.कम्युनिस्टांनाही तिकडं अस्तित्व टिकवायचं आहे.ही अस्तित्वाची लढाई जिंकायची तर तात्कालिक मतभेद विसरून भक्कम विरोधी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न हे दोन्ही पक्ष करताना दिसतात.चंद्रबाबू यांना चार वर्षांनी जो दिव्य साक्षात्कार झाला आणि त्यांनी एनडीएतून अंग काढून घेतलं त्यामागची प्रेरणा देखील त्यांना वाटणारी अस्तित्वाची भितीच आहे.आंध्र प्रदेशात तेलगू देसमला इंगा दाखविण्यासाठी भाजप वायएसआर कॉग्रेसला जवळ करीत आहे.आंध्रत भाजप आणि वायएसआर कॉग्रेस यांच्यात दिलजमाई झाली तर निवडणुकांचे निकाल आपणास अनुकूल असणार नाहीत हे चंद्राबाबू यांनी ताडलं आणि तेलगू अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून ते अलग झाले.वरील पक्षांची राजकीय अगतिकता बघता आणि ‘राजकारणात काहीच अशक्य नाही’ हा लाडका सिध्दांत खरा मानायचाच तर महाराष्ट्रात चार प्रमुख विरोधी पक्ष देखील एकत्र येऊ शकतात आणि त्यासाठी स्वतः शरद पवार महत्वाची भूमिका पार पाडू शकतात असं अनुमान करायला अजिबात हरकत नाही. राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणानं या प्रक्रियेला आरंभ केला असं म्हणता येऊ शकतं.राज याचं भाषण संपल्यानंतर लगेच कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी वाहिन्यांवरून राज यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.हे स्वागत पुरेसं बोलकं आहे.म्हणजे पुढील काळात राज ठाकरे हे जातीयवादी नाहीत,प्रातवादी नाहीत हे कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्याला पटवून देऊ लागतील.

राज ठाकरे यांनी मोदी मुक्तीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे.अनेकांना वाटतं की,सर्वांनी एकत्र यावे असं म्हणताना मी त्यांच्याबरोबर असेल असं राज ठाकरे म्हणाले नाहीत.खरंय तसं राज ठाकरे म्हणाले नसले तरी ते गृहित आहे.’तुम लढो हम देखते रहते’ अशी तर मनसे भूमिका घेऊ शकत नाही.त्यामुळं या प्रक्रियेत मनसे असणार आहे.उद्या जेव्हा सोनिया गांधी अशीच एखादी बैठक बोलावतील तेव्हा कदाचित राज ठाकरे यांनाही बैठकीचे निमंत्रण आलेलं असेल.तेव्हा युपी-बिहारची मंडळी देखील राज ठाकरे यांच्या कथित प्रांतवादाबद्दल आमची कशी दिशाभूल केली गेली होती यावर भाषणं देऊ लागतील.थोडक्यात  अशक्य काहीच नाही.राजकारणात गरज महतची असते.पंचवीस वर्षे भाजपला सेनेची गरज होती.याकाळात भाजप सेनेच्या तालावर नाचत राहिली. गरज संपली तेव्हा सेनेची प्रतारणा सुरू झाली.चंद्राबाबूचे 16 खासदार असताना दोन मंत्रीपदं आणि सेनेचे 18 खासदार असताना एकच मंत्रीपद दिलं गेलं.जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार होता.आज परिस्थिती बदलत आहे.त्यामुळं सेनाही आपलं उड्डं काढण्याचा प्रयत्न करील हे उघडंय.

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर भविष्यातील राजकारणाचे संकेत लोकांनाही मिळाले आहेत.त्याला फारसा विरोध होतानाही दिसत नाही.स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते अशी आघाडी वगैरे मान्य करणार नाहीत कारण त्यातून त्याचं अस्तित्व धोक्यात येईल अशा ठिकाणी जागा वाटपाचा फॉर्म्युला उपयोगात आणला जावू शकतो.जागा वाटप म्हणा,किंवा आघाडी म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न नक्की होतील यात शंका नाही.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here