रायगड वार्तापत्र

0
1141

रायगड जिल्हयातील 10 हजार 940 शेतकर्‍यांना कर्जमाफीनं दिलासा..

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे रायगड जिल्हयातील तब्बल 10 हजार 940 शेतकर्‍यांच्या आयुष्यात नव्यानं उभं राहण्याची हिंमत निर्माण झाली आहे.जिल्हयातील या शेतकर्‍यांना 19 कोटी 61 लाख 9 हजार 846 रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बॅकांकडून कर्ज घेतलेले थकबाकीदार शेतकरी जसे आहेत तव्दतच नियमित कर्जफेड करणारे पण प्रोत्सान लाभ प्राप्त शेतकरी देखील आहेत.या योजनेअंतर्गत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 9 हजार 777 कर्जदार शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे तर उर्वरित शेतकरी जिल्हयातील राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेले आहेत. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका यांनी दिली.या योजनेचे लाभार्थी ठरलेल्या शेतकर्‍यांनी सरकारला धन्यवाद दिले आहेत.

.’छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे आपली मोठ्या आर्थिक संकटातून सुटका झाल्याची’ भावना अलिबाग तालुक्यातील सारळ येथील शेतकरी मधुकर पाटील यांनी व्यक्त केली आहे.त्यांनी बांधबदिस्तीसाठी 2 लाख 70 हजारांचे कर्ज घेतले होते आणि नंतर आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे ते थकबाकीदार झाले होते.मात्र आता त्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा मिळाल्यानं त्यांना हरवलेली हिंमत पुन्हा मिळाली आहे.त्याबद्दल त्यांनी सरकारला धन्यवाद दिले आहेत.अशीच भावना जिल्हयातील अन्य शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

पासपोर्ट लवकर मिळावा यासाठी रायगड पोलिसांची एम-पासपोर्ट योजना 

रायगड जिल्हयातील सर्वसामांन्य जनेतेला लवकरात लवकर पासपोर्ट मिळावा यासाठी पोलिसांच्यावतीनं एम- पासपोर्ट पोलीस अ‍ॅप तयार करण्यात आलंय.रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते नुकताच या अ‍ॅपचा शुभारंभ केला गेलाय.त्यासाठी ज्या पोलीस ठाण्यात पासपोर्टचं काम चालतं अशा सर्व पोलीस ठाण्यांना नवीन टॅबचं वाटपही करण्यात आलं.अर्ज पडताळणी आणि प्रत्यक्ष चौकशी यासाठी बराच वेळ जात होता मात्र एम-पासपोर्टमुळं आता पारपत्र पडताळणी लवकरात लवकर होऊन जनतेचा वेळ आणि मनःस्ताप वाचणार आहे.शिवाय या अ‍ॅपमुळे अर्जदाराला लवकरात लवकर पासपोर्ट मिळण्यास मदत होणार आहे.रायगडच्या जनतेनं पोलिसांच्या या प्रयत्नाचं स्वागत केलं आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात दारूबंदीचा निर्णय 

रायगड जिल्हयात खारखरच्या हद्दीत यापुर्वीच दारूबंदीचा निर्णय झालेला आहे.त्याच धर्तीवर आता पनवेल महापालिकेनं देखील पालिका हद्दीत दारूबंदी करण्याचा ठराव एकमतानं संमत केला आहे.पनवेल पालिकेत भाजपची सत्ता असून भाजपचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दारूबंदीचा ठराव मांडला.त्यास विरोधी शेकाप आणि राष्ट्रवादीनंही समर्थन दिल्यानं हा ठराव बिनविरोध संमत झाला आहे.पालिकेनं एकमतानं संमत झालेला हा ठराव आयुक्त ांनी सरकारकडं पाठविला आहे.सरकार आता यावर काय निर्णय घेते याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.आपल्या कार्यक्षेत्रात दारूबंदीचा ठराव संमत करणारी पनवेल महापालिका ही राज्यातील एकमेव महापालिका असावी.गेल्याच वर्षी पनवेल महापालिका अस्तित्वात आली आहे.दरम्यान महापालिकेत एकमतानं संमत झालेल्या या ठरावास हॉटेल चालकांनी मात्र विरोध दर्शविला आहे.पनवेल परिसरातील लेडिज बारच्या विरोधात माजी आमदार विवेक पाटील यांनी आवाज उठविल्यानंतर तत्कालिन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी लेडिज बार बंद करण्याचा निर्णय घेतला होता.पनवेल पालिकेच्या या निर्णयानंतर यावर सरकार काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे आहे.

आरोग्य सेवेसाठी रायगडमध्ये मिशन कायापालट 

सरकारी आरोग्य व्यवस्था नेहमीच टिकेचा विषय ठरलेली आहे.रायगडही याला अपवाद नाही.किमान रायगड जिल्हयापुरते का होईना हे चित्र बदलण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने सोडला आहे.त्यासाठी जिल्हा रूग्णालये,नऊ ग्रामीण रूग्णालये,52 आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनानं सोडला आहे.जिल्हयातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देता यावी यासाठी मिशन कायापालट हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेनुसार ग्रामीण रूग्णाले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सर्व ठिकाणी चोख आरोग्य सेवा देण्याचा संकल्प सोडला गेला आहे.त्यानुसार नवी उपकरणे तर बसविली जाणार आहेतच त्याचबरोबर अंतर्गत स्वच्छता,रंगरंगोटी,रूग्णसेवेसाठी मार्गदर्शक कार्यपध्दतीचा अवलंब व त्याचे तंतोतंत पालन ,रूग्णालायपर्यंत दिशादर्शक फलक,सुसज्ज औषधालय,बाहय रूग्णांसाठी प्रतिक्षालय,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,रूग्ण आणि नातेवाईकांशी सौजन्य वर्तन आदि व्यवस्था कऱण्यात येणार आहेत.त्यामुळं येत्या काळात रायगडमधील आरोग्य सेवा लक्षवेधी झालेली असेल असा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.डॉ.सूर्यवंशी कोल्हापूरला असताना त्यांनी असाच प्रकल्प राबविला होता आणि आता रायगडमध्ये ते तोच प्रयोग करीत आहेत त्यांच्या या प्रयत्नांचे स्वागत होत आहे.–

शोभना देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here