विष्णू , एका मग्रुर नेत्याच्या विरोधात उभा राहिलास तुझं अभिनंदन !

0
1835

त्रकार मित्रांनो,एक गोष्ट आपल्या लक्षात आली का ? विष्णू बुरगे या तरूण पत्रकाराला पाशा पटेल यांनी गलिच्छ शब्दात शिविगाळ केली.त्याचं रेकॉर्डिग व्हायरल झालं.त्याचा पत्रका

रांनी एकत्र येत निषेध केला.मात्र पत्रकारांकडून हजार अपेक्षा व्यक्त

 करणारा समाज मात्र यावर बोलायला तयार नाही.कोणत्याही राजकीय पक्षांनी निषेधाचं पत्रक काढलेलं नाही किंवा पाशा पटेल यांच्यावर कारवाई व्हावी अशीही मागणी केली नाही.फेसबुकवर व्यक्तिगत स्वरूपात काही नेत्यांनी हातचं राखून जरूर पोस्ट टाकल्या पण त्याही मिळमिळत.म्हणजे पत्रकारांचा विषय जेव्हा येतो तेव्हा सारे राजकीय पक्ष आणि राजकारणी एक असतात.सत्ताधारी पक्षाचा एक मोठा नेता  अत्यंंत खालच्या पातळीवरून

 

एखादया पत्रकाराला शिविगाळ करतो ही गोष्ट विरोधकांसाठी खरं तर चालून आलेली पर्वणी होती.सरकारला धारेवर धरण्याची संधी होती.मात्र कोणीच बोलत नाही.हे आजच घडतंय असं नाही.नेहमीचंच हे चित्र आहे.त्यामुळं पत्रकारांची ही लडाई पत्रकारांनाच लढावी लागणार आहे.मात्र त्यातही खोट अशी की,आपल्यापैकी ़अनेकजण त्या विष्णूवरच संशय घेत आहेत.यात त्यांची चूक नाही पाशा पटेल यांचे जे पंटर आहेत त्यांनीच फोना फोनी करून अनेकांना विष्णू पत्रकार होता हेच माहिती नव्हते असं सांगितलं.त्यावर त्या पत्रकार मित्रांनीही विश्‍वास ठेवला.आपला माणूस काय सांगतोय त्यावर विश्‍वास नाही आणि पाशा पटेल काय सांगतात त्यावर जर आपण विश्‍वास ठेवणार असून तर तो विष्णूवर अन्याय आहे.माझा विश्‍वास विष्णूवर आहे.मी काल रात्रीच बारा वाजता त्याच्याशी बोललो.पाशा पटेल त्याला चांगले ओळखतात.दोन वेळा त्याने पाशा पटेलचा इंटरव्हयू केला आणि तो महाराष्ट वनवर दाखविला.त्यामुळं तो पत्रकार होता हे माहिती नव्हते ही थाप पचणारी नाही.बरं क्षणभर असं गृहित धरा की,पाशाभाई यांना ते माहितीही नसेल.पण त्यांनी ज्या भाषेत शिविगाळ केलीय ती कोणत्या संस्कृतीत बसते हे कळत नाही.पाशा पटेल एवढे संतप्त का झाले ? ते त्यानी शिविगाळ करतानाच सांगितलंय.’माझ्या समोर बसून तू प्रश्‍न विचारतोस काय’? असा दम देताना ते क्लीपमध्ये दिसताहेत.म्हणजे विष्णू उभे राहून याचकाच्या भूमिकेत प्रश्‍न विचारत असता तर त्यांना चालले असते.कळत नाही,पत्रकारांनी उभे राहून यांना प्रश्‍न विचारायला हे पाशा पटेल कोण लागून गेलेत ?.स्वतःला काय समजतात ते ?.पत्रकार म्हणजे कोणी भिकारी आहेत काय ? तुम्ही जनतेसाठी कामं करता असं सांगता तर मग ही सरंजामशाही अपेक्षा कशी काय करू शकता ?.पाशा पटेल तुमची ही अपेक्षा विष्णूच काय कोणताही पत्रकार पूर्ण करणार नाही . कधीच आणखी एक मुद्दा आहे.पाशा पटेल यांचा राग एकटया विष्णूवर नाही.ते  म्हणतात, ‘हे साले डुकरासारखे माजलेत,कोणालाही काही विचारतात’ .हे त्यांचं वाक्य तमाम पत्रकारांना उद्देशून आहे.ते निषेधार्ह आणि संतापजनाक आहे.विष्णूच्या निमित्तानं त्यांनी माध्यमांबद्दलच गरळ ओकली आहे.त्यामुळं पाशा पटेल यांच्या बातम्या देताना प्रत्येक पत्रकाराने वैयक्तिक पातळीवर ते पत्रकारांचा कसा व्देष करतात हे लक्षात ठेवून बात्यमा द्याव्यात अशी माझी विनंती आहे.

प्रकरण आता अंगलट आलंय म्हटल्यावर पाशा पटेल आपल्या पंटरच्या मार्फत विष्णूची कशी चूक होती असं पसरवित आहेत.किमान आमचा तरी त्यांच्या थापेबाजीवर विश्‍वास नाही.आम्ही खंबीरपणे विष्णूच्या पाठिशी आहोत.केवळ पाठिशीच आहोत असं नाही तर विष्णूच्या हिंंमतीचा,त्याने दाखविलेल्या धाडसाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एका शक्तिमान  नेत्याच्या विरोधात उभं राहून त्यांच्या दादागिरीला आव्हान देण्याचे जे धाडस विष्णूनं दाखविलं आहे ते केवळ अभिनंदनीयच नाही तर इतरांनाही बळ देणारं आहे.त्यामुळंच राज्यातील पत्रकारांनी विष्णूला एकाकी पडू न देता खंबीरपणे त्याच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे.पाशा पटेल यांच्याविरोधात सायंकाळी तक्रार दिल्यानंतर पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.आता पोलिसांना विनंती आहे की,कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी कायदेशीर कारवाई पार पाडली पाहिजे.अन्यथा राज्यातील पत्रकारांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.

मुंबईतील वाहिन्या आणि मोठया पत्रांच्या संपादकांना विनंती की,मुंबईत पत्रकारावर झालेला हल्ला हाच मिडियावरचा हल्ला नसतो तर तो लातूर,अमरावती किंवा अन्य ठिकाणी झालेला हल्लाही मिडियावरचाच हल्ला असतो.त्यामुळं विष्णूला न्याय मिळेल यासाठी त्यांनीही प्रयत्न करावेत ही विनंती आहे.–

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here