शिवसेना आणि मनसे या पक्षांमधलं वितुष्ट आज पुन्हा समोर आलं. दोन्ही पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तिथे सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात पाच ते सहा कार्यकर्ते जखमी झाले.
पोलिसांना कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही करावा लागला. शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर मनसेचे उमेदवार आदित्य शिरोडकर आणि आमदार नितीन सरदेसाई यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
दक्षिण मुंबईच्या कुलाबाजवळ येलो गेट परिसरात हा प्रकार घडला. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर हे मनसेचे उमेदवार आहेत तर अनेक वर्ष कामगारांचं नेतृत्व करणारे अरविंद सावंत हे शिवसेनेचे उमेदवार आहेत.
मनसेचा हा पूर्वनियोजित हल्ला -आदित्य ठाकरे
मनसेनंच अर्ज भरताना दगडफेक केली, सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या. मनसेच्या गुंडांनी आमच्या उमेदवारावर पूर्वनियोजित हल्ला केला. पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरच कारवाई केली. मनसेचा दक्षिण मुंबईचा उमेदवार कधीही जिंकणार नाही. निवडणूक आयोगाने पोलिसांवर आणि मनसेच्या गुंडांवरही कारवाई करावी.