15 वर्षांत 20 हजार जणांनी जीवनयात्रा संपविली

  0
  1715

  शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची संख्या वाढतेय

  मुंबई – अतिवृष्टी, गारपीट आणि लागोपाठच्या दुष्काळी स्थितीमुळे कंबरडे मोडलेल्या राज्यातील सुमारे तीन हजार 228 शेतकऱ्यांनी सरत्या वर्षात मृत्यूला कवटाळले आहे. विदर्भातील अमरावती विभागात वर्षभरात सर्वाधिक एक हजार 179 आणि मराठवाड्यात एक हजार 130 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे, 2001 पासून राज्यातील शेतकरी आत्महत्यांची समस्या अधिक गंभीर बनली आहे. 15 वर्षांत राज्यात तब्बल 20 हजारहून अधिक शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. मागील 15 वर्षांची तुलना करता 2015 मधील सर्वाधिक ठरलेली आत्महत्यांची संख्या सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. सततची नापिकी आणि डोक्‍यावरील कर्जाच्या डोंगरामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे निर्माण झाले आहे.

  मागील काही वर्षांत सातत्याने हवामानात बदल होत आहेत. दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळाचे तांडवनृत्य सुरू होते. मध्येच एखाद्या वर्षी अतिवृष्टी कहर करते. चुकून कधी समाधानकारक पाऊसपाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट हातातोंडाशी आलेली उभी पिके हिरावून नेते. पाऊस हंगामातच पडेल याची खात्री उरलेली नाही. चार महिन्यांच्या पावसाळ्यात अवघ्या एक किंवा दोनच महिन्यांत पाऊस हंगामाची सरासरी गाठतो. त्यामुळे पूर्णतः मॉन्सूनवर अवलंबून असलेला खरीप हंगाम अपेक्षित उत्पन्न मिळवून देत नाही. यंदाही कापूस, सोयाबीनचा निच्चांकी उतारा त्याचेच द्योतक आहे. अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामातही पिके मिळेनाशी झाली आहेत. विशेषतः विदर्भातील अमरावती विभागात आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांतील हे चित्र कायम राहिले आहे. स्वाभाविकपणे खरीप अथवा रब्बी हंगामात लागवडीसाठी सहकारी आणि इतर बॅंकांकडून घेतलेल्या पीक कर्जांची परतफेड शेतकरी करू शकलेले नाहीत. चार ते पाच वर्षांत हे संकट अधिकच गडद झाल्याचे दिसून येते. परिणामी मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोडून पडले असल्याचे चित्र पाहायला मिळते. या भागातील दुष्काळ नेहमीचाच असला तरी शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. राज्य सरकारपुढेही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, हे एक मोठे आव्हान आणि चिंतेचा विषय बनली आहे. 2006, 2007 आणि त्यानंतर 2015 या तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे दिसून येते.

  आत्महत्यांमागची प्रमुख कारणे
  दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, रोगराई आदींमुळे उद्‌भवणारी सततची नापिकी, वाढता उत्पादन खर्च, शेतमालाच्या दरातील अभाव आणि घटत्या उत्पन्नातील विरोधाभास परिणामी बॅंका तसेच सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करू शकल्यामुळे होणारा कर्जबाजारीपणा आणि संबंधितांकडून मागे लागलेला कर्ज परतफेडीचा तगादा. विदर्भ, मराठवाड्यातील मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागची हीच प्रमुख कारणे असल्याचे दिसून आले आहे.

  903 प्रस्ताव अपात्र
  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून एक लाखाची मदत दिली जाते. यात नापिकी, राष्ट्रीयीकृत अथवा सहकारी बॅंका अथवा मान्यताप्राप्त सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न होणे आणि कर्ज वसुलीचा तगादा या तीन कारणांमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्यासच मदत देण्यात येते. अन्यथा मदतीचा प्रस्ताव अपात्र ठरविला जातो. चालू वर्षात राज्यातील सुमारे तीन हजार 228 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद राज्य सरकारकडे आहे. त्यापैकी मदतीचे 903 प्रस्ताव अपात्र ठरले आहेत; तर 484 प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत. अपात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही.

  पॅकेज नको, धोरणात्मक निर्णय आवश्‍यक
  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून कोणतेही धोरणात्मक निर्णय होत नाहीत, ही मूळ शोकांतिका आहे. याअनुषंगाने सरकारकडे आजवर अनेक समित्यांचे अहवाल सादर झाले; मात्र या समित्यांच्या सूचना, उपाययोजनांची अंमलबजावणी होत नाहीत. सरकार बदलले तरी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलत नाही. सरकारने पॅकेज जाहीर करूनही आत्महत्या थांबत नाहीत. कारण, या केवळ तात्पुरत्या मलमपट्टी ठरत आहेत. शेतकऱ्यांना लहरी निसर्गापासून संरक्षण मिळायला हवे, शेतमालाला हमीभाव आवश्‍यक आहे. सरकारने दीर्घकालीन धोरणात्मक निर्णय घेतल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. अन्यथा मरणाचा हा तांडव यापुढेही सुरूच राहील, अशी भीती आहे.
  – चंद्रकांत वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते.

  15 वर्षांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या
  वर्ष———संख्या
  2001——62
  2002——122
  2003——180
  2004——640
  2005——609
  2006——2376
  2007——2076
  2008——1966
  2009——1605
  2010——1741
  2011——1518
  2012——1473
  2013——1297
  2014——1811
  2015——3,228

  सन 2015 जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची आकडेवारी –
  जानेवारी——213
  फेब्रुवारी——206
  मार्च———227
  एप्रिल——–205
  मे———–248
  जून———-192
  जुलै———285
  ऑगस्ट——-354
  सप्टेंबर——-332
  ऑक्‍टोबर—–356
  नोव्हेंबर——-297
  डिसेंबर——–313
  एकूण – 3 हजार 228.

  विभागनिहाय आत्महत्यांचे तपशील
  कोकण- 2, नाशिक- 459, पुणे- 96, औरंगाबाद- 1130, अमरावती- 1179 आणि नागपूर- 362 असे आहेत.

  (सकाळवरून साभार) 1 23

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here