मतदानोत्तर चाचण्यांवर निर्बंध

0
717

चार कालावधी समाप्तीनंतर प्रचारविषयक जाहिरातींवर बंदी

14 फेब्रुवारीनंतर जनमत व मतदानोत्तर चाचण्यांवर निर्बंध

मुंबई, दि. 13 : महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष व उमेदवारांना मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत; त्याचबरोबर 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान समाप्तीपर्यंत जनमत (ओपिनियन पोल) व मतदानोत्तर (एक्झिट पोल) चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहील, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे सांगितले.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच वेगवेगळ्या कायद्यांतील तरतुदीनुसार घेतल्या जातात. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रचार मतदान सुरु होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर बंद होतो. त्यामुळे पहिल्या टप्पात 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत असलेल्या 15 जिल्हा परिषदा व 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री 12 वाजता संपेल. दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होत असलेल्या 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार 19 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री 12 वाजता संपेल; परंतु ध्वनिक्षेपाबाबतच्या विहित आदेशांचेही पालन करणे आवश्यक राहील.

महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर बंद होतो. त्यामुळे 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणाऱ्या 10 महानगरपालिकांचा जाहीर प्रचार 19 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपेल. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आयोगाच्या 14 ऑक्टोबर 2016 च्या आदेशानुसार राजकीय पक्ष किंवा उमेदवारांना मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. यात सोशल मीडियाचाही समावेश असेल.

मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींबाबत समान नियमन असावे, अशी मागणी काही राजकीय पक्षांकडूनदेखील करण्यात आली होती, असे नमूद करून श्री. सहारिया म्हणाले की, 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री बारापासून ते 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान समाप्तीपर्यंत कुठल्याही माध्यमांद्वारे जनमत (ओपिनियन पोल) व मतदानोत्तर (एक्झिट पोल) चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी राहील. या निवडणुकांचे दोन्ही टप्पे पाठोपाठ असल्याने मतदारांवर पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन, हे स्पष्टीकरण करण्यात आले असल्याचे श्री. सहारिया यांनी सांगितले.

• 16 फेब्रुवारी 2017 च्या जि. प. व पं. स. मतदानासाठी प्रचार समाप्ती- 14 फेब्रुवारी रोजी रात्री 12 पासून

• 21 फेब्रुवारी 2017 च्या जि. प. व पं. स. मतदानासाठी प्रचार समाप्ती- 19 फेब्रुवारी रोजी रात्री 12 पासून

• 21 फेब्रुवारी 2017 च्या महानगरपालिका मतदानासाठी प्रचार समाप्ती- 19 फेब्रुवारी रोजी सायं. 5.30 पासून

• जनमत व मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर निर्बंध- 14 फेब्रुवारी 2017 रोजी रात्री 12.00 पासून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here