सिंहगडाची वाट बिकट..
 
भजी,भाकरी,वाटलेली चटणी,झुणका आणि मडक्यातलं दही खावं वाटलं की,आम्ही सिंहगडावर जातो ..म्हणजे जायचो .. प्रसन्न करणारी थंड हवा आणि गरमा गरम जेवण याचा आस्वाद घेणं हा खरंच माझ्या सारख्या मध्यमवर्गीसाठी मोठाच आनंद असतो.मात्र अलिकडं कित्येक दिवस ( नव्हे काही वर्षे) हा छोटासा आनंद घणंही जमलं नव्हतं. परवा लहर आली . सिंहगडावर गेलो.अगदी टू व्हिलरवर.जाकीट,डोक्यावर टोपी,डोळ्याला गॉगल असा सारा पिकनिकचा वेष परिधान करून सिंहगडाकडं कूच केली.सायंकाळी साडेचार-पाचच्या सुमारास सिंहगड ‘सर’ केला.जेवायची वेळ नव्हती तरीही गरमा गरम भज्यांचा मोह आवरत नव्हता.. म्हणून ऑर्डर दिली.पुण्यातलं हवामान सध्या थोडं विचित्र आहे.दिवसभर मे मधल्यासारखं कडक उन्ह.पाच नंतर गुलाबी नव्हे तर चक्क बोचरी थंडी . .त्यातही सिंहगडावर गारवा अधिकच झोंबतो .तरीही अगदी सुर्यास्ताचा आनंद तर घेतलाच पण चांगला काळोख होईस्तोवर भटकंती केली.यापुर्वीही अनेकदा सिंहगड ‘सर’ केलेला होता.त्यामुळं गडावरच्या सार्‍या वाटा आणि पाऊलवाटा परिचयाच्या झालेल्या आहेत. मस्त भटकलोत..मात्र परत जायची जेव्हा वेळ आली तेव्हा पोटात गोळा आला.काळोखात टु व्हिलर व्यवस्थित जाईल काय,? टायर पक्चर झालं तर काय ? अशा अनेक शंका-कुशंका मनात दाटून आल्या होत्या.त्याचं कारणही तसंच होतं.
 
हमारे पास चौपाटी हें ..या मुंबईकरांच्या वाक्याला पुणेकराचं उत्तर असतं ‘हमारे पास सिंहगड है’अभिमानानं सांगावं असंच हे स्थळ आहे.म्हणूनच .दररोज शेकडो आणि विकएंडला हजारो पुणेकर सिंहगडला भेट देतात.यात सर्व वयोगटातील मंडळींचा समावेश असतो.पुणेकरांशी जिव्हाळ्याचं नातं जपणार्‍या सिंहगडाचे हाल आणि हालत ही एक दर्दभरी दास्तॉ आहे.पावसाळ्यात जेव्हा पुणेकरांनी सिंहगड तुडुंब भरलेला असतो तेव्हा दरडी कासळतात..किंवा तसे कारण देऊन सिंहगडाला कुलूप ठोकले जाते.हे कुलुपू उघडलं तरी रस्ता असा की,जाणार्‍यांना आनंद घेत प्रवास करण्यापेक्षा कुठून दुर्बुधी सूचली आणि सिंहगडावर जायला निघालो असं वाटायला लागतं.पुणेकरांनी सिंहगडावर यावं,तिथलं निसर्ग अनुभवावा,तिथली स्वच्छ हवा अंगावर घ्यावी असं बहुदा सरकारला वाटत नसावं.त्यामुळं सिंहगडच्या रस्त्यात एवढें खड्डे करून ठेवले आहेत की,वर जाण्यापेक्षा गाडी फिरवावी आणि परत जावं असंच अनेकांना वाटतं.काही जण तोच मार्ग पत्करून नंतर खकडवासला येथे येऊन बसतात.गडावर जाणारा रस्ता असा झालाय की,हा रस्ताचा राहिलेला नाही.रस्तयावर फक्त खड्डे आहेत.आपल्याला खड्डेयुक्त प्रवास झेपावणार नाही आपणही माघारी फिरावं असं अनेकदा मनात आलं..पण सिंहगडाचं आकर्षण आणि बायकोची भिती यामुळं तसं न करता ‘खड्डा दर खड्डा’ चुकवत पुढं गाडी चालवत राहिलो.
पायथ्यापासून गडाचं अंतर बारा किलो मिटर आहे.तसा बोर्ड पायथ्याला लावलाय.तीन-चार किलो मिटरचा रस्ता दुरूस्त तर केला गेलाय मात्र पुढं रस्ताच शिल्लक नाही.सारा रस्ता दुरूस्त का केला गेला नाही ? ,माशी कुठं शिंकली.?.कोणीच त्यासाठी आग्रङ का धरत नाहीत? अशा अनेक प्रश्‍नाचं काहूर मनात निर्माण झालं होतं.हे सारं बायकोलो बोलण्याची सोय नव्हती..म्हणाली असती’ फिरायला आल्यावर तरी तू पत्रकार आहेस हे विसर की’ ..म्हणूून बापडा मनातल्या मनातच चिडचिडत राहिलो.आणखी एका गोष्टीनं चिडचिड होत होती..वाढत चाललेल्या वयााचा विचार न करता टु व्हिलरवर सिंहगडावर येण्याची मस्ती केली होती.ती मस्ती माझ्या चांगलीच अंगलट आली.हाडं अक्षरशः खिळखिळी झाली.मागं बसलेल्या शोभनाची अवस्थाही तशीच.गाडी चालविणंच अशक्य झालं होतं.गाडीही खिळखिळी झाली. अखेर असंख्य ‘खड्यांवर मात’ करीत पार्किंगच्या ठिकाणी पोहोचलो.हिमालय सर केल्याचा आनंद आमच्या चेहर्‍यावर विलसत होता जाताना याच रस्तयाचा सामना करीत आपल्याला परतयाचंय ही जाणीव पोटात भितीचा गोळा निर्माण करीत होती, झालंही तसंच.गडावर जाताना जेवढा त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास उतरताना झाला.गर्द काळोख झाला होता आणि टु व्हिलरचा अंधुक उजेड. त्याने आमची बरीच दाणादाण उडाली.या ‘खड्ड्यातून त्या खड्यात’ उड्या घेतच गाडी चालली होती.तपासणी नाक्याजवळ आलो तेव्हा ‘मनातल्या मनात’ व्यवस्थेला चार-दोन शिव्या हासडल्याच…या शिवाय करणार तरी काय ? सारे मुके -बहिरे झालेत एकणार तरी कोण ? ..त्यामुळंच आपलं मनातल्या मनात..एकही पुणेकर नसेल की,गडावरून उतरल्यानंतर मनातल्या मनात का होईना व्यवस्थेला शिव्या घालत नसेल..तशी अवस्थाच करून ठेवली गेलीय..
 
दोन वर्षापूर्वी रायगडावर आम्ही रायगडच्या पत्रकारांसह एक दिवस मुक्कामाला होतो.अंधारात गडावरच्या अडचणी पत्रकारांनी अनुभवल्या.त्यानंतर लेखणीच्या माध्यमातून मांडल्या.सरकारला जाग आली आणि रायगडाच्या विकासासाठी सहाशे कोटींचा भरीव निधी दिला गेला.आता ते काम सुरू झालंय.पुणेकरांसाठी जिव्हाळ्याचं ठिकाण असलेल्या सिंहगडाच्या विकासासाठी असाच भरीव निधी जर दिला आणि सिंहगडाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न झाला तर पर्यटनातून मोठा महसूल सरकारला मिळू शकेल.पावसाळ्यात आणि शनिवारी-रविवारी गडावर प्रचंड गर्दी होते.गाडया पार्किंगलाही जागा नसते.एक तर आहे हाच रस्ता दुहेरी करून वाहतूक कोंडी टाळली जावी..गडाची साफसफाई करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं जावं.हे मोठं अवघड काम नाही.ज्या वास्तू आजही चांगल्या स्थितीत आहेत त्यांची अवस्था यापेक्षा वाईट होणार नाही एवढी जरी काळजी घेतली तरी पुरे.शिवाय दरडी काढून पावसाळ्यात धोका होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल.हे सारं करायला फार पैसा लागणार नाही.गडावर जाण्यासाटी वन विभाग टोल लावते.प्रश्‍न आहे अशा रस्त्यावरून जायचे असेल तर टोल तरी का द्यावा.? प्रवेश फीस द्यायची तर किमान तो प्रवास तरी सुखकर व्हायला नको का ? पण ते काही होत नाही.त्यामुळं सिंहगडची सफर एकदा करून आल्यावर पुन्हा कित्येक दिवस सिंहगडावर जायचं नावही काढावं वाटत नाही.किमान आमची तरी अवस्था तशीच झालीय.
 
https://goo.gl/RQ5DMw

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here