रायगडात रस्ता अपघात वाढले

0
876
देशात 26 वे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान साजरे होत असतानाच रायगडमधील विविध रस्त्यावर दररोज सरासरी तीन अपघात झाल्याचे आणि त्यात जवळपास दररोज एका निष्पाप प्रवाश्याचा बळी गेल्याचे वास्तव समोर आले आहे.जिल्हयातून तीन राष्ट्रीय महामार्ग  जातात.हे महामार्ग तर अपघाताचे महामार्ग बनले आहेतच त्याच बरोबर राज्य महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावरील अपघातांची संख्याही वाढलेली असल्याने व्यवस्थेची चिंता वाढली आहे.जिल्हयातील विविध रस्त्यावर 2014 मध्ये तब्बल 1262 अपघात झाले. त्यात 296 जणांचा बळी गेला असून 730 जण कायमचे जायबंदी झाले आहेत.सर्वाधिक अपघात अर्थातच मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते कशेडी दरम्यान झाले.महामार्गावर झालेल्या 457 अपघातात 93 जणांचा बळी गेला . 622 जण गंभीर जखमी झाले आहेत.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर  रायगड ह्द्दीत 2014मध्ये 211 अपघात झाले त्यात 53 जणांचा बळी गेला असून 96 गंभीर जखमी झाले आहेत.मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर देखील अपघात वाढलेले उपलब्ध आकडेवारीवरून दिसते.
अरूंद रस्ते,धोकादायक वळणं,रस्त्यावरील खड्डे,वेगावर नियंत्रण नसणे,मद्यपान करून वाहन चालविणे,साईडपट्टया नसणे  ही काही अपघातांची कारणं सांगितली जात आहेत.मुंबई -गोवा महाार्गाचे चौपदरीकरण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल असे तज्ज्ञ सांगतात.रायगडसह राज्यात वाढलेल्या रस्ता अपघातांबद्दल जागृती आणि बाल वयातचे रस्ता सुरक्षेचे महत्व मुलांना समजावे यासाठी शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषयाचा अंतर्भाव करण्याचा शासन विचार करीत असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अलिबाग येथे 26 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्दघाटन करताना मंगळवारी दिली.रस्तयावरील अपघात टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न कऱण्याचे आवाहनही रावते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here