‘प्रेस आणि पब्लिक’ एकत्र

0
876

रायगडमध्ये दरवर्षी साडेतीन हजार मिली मिटर पाऊस पडतो.पावसाळ्यात सारा परिसर जलमय होऊन जातो.मोठं नुकसान होतं.पण पडलेलं बहुतेक पाणी समुद्रला जाऊन मिळतं अन डिसेंबरपासूनच अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते.कोकणातलं हे चित्र किमान घाटावरच्या लोकांना तरी न पचणारं किंवा मान्य न होणारं आहे. वस्तुस्थिती हीच आहे.नियोजनचा अभाव आणि गचाळ राजकारण हे दोन घटक या परिस्थितीला कारणीभूत आहेत.त्यामुळे निसर्गाची पूर्ण साथ असतानाही इथं पाणी टंचाई जाणवते.बरं हे चित्र आजचं आहे का ? तर नाही. .मी रायगडला गेलो त्यावर्षी म्हणजे 1994 पासून मी हे बघतो आहे.परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राजकारणी पाण्याचं राजकारण करीत राहतात  .घाटावर जे मतदार आपल्याला मतदान करीत नाहीत त्या मतदारांचा ऊस न्यायचा नाही असं राजकारण काही कारखानदार राजकारणी करीत असतात.इकडं जे आम्हाला मत देणार नाहीत त्यांना पाणी देणार नाही अशी पध्दत आहे.बरं ज्यांना मत द्यायच ते ही निवडून आले की,पाण्याकडं दुर्लक्ष करतात.कारण पुढच्या निवडणुकीत हाच विषय त्यांना मतांसाठी वापरता येतो. अशा प्रकारानं जनता त्रस्त आहे.विशेषतः खारेपाटातील जनता तर रडकुंडीला आली आहे.

समुद्राच्या काठावर किंवा खाड्यांच्या जवळ असलेल्या गावांना रायगडमध्ये खारेपाट म्हटले जाते.या भागातील जनता दोन तीन बाजुने मारली जातेय.एकीकडं खारलॅन्ड विभागाच्या दुर्लक्षामुळे या भागातील शेतकर्‍यांच्या शेतीत समुद्राचं खार पाणी घुसून त्यांच्या जमिनी खारभुमी झालेल्या आहेत.म्हणजे नापीक झाल्या आहेत.शिवाय समुद्राच्या आक्रमनाचा धोका या गावांना सतत भेडसावत असतो.अलिबाग तालुक्यात जो खारेपाट भाग आहे त्यातील गणेश पट्टी सारखी  काही गावं समुद्राचं पाणी गावात घुसायच  म्हणून उठवावी लागली.एकीकडं पाण्याची घुसखोरी गावात होते आणि दुसरीकडं प्यायला पाणी नाही.हा कमालीचा विरोधाभास हे या भागाचं चित्र आहे. एकीकडं निसर्ग असा अंत पाहतोय आणि दुसरीकडं राजकारणी वार्‍यावर सोडताहेत अशा परिस्थितीमुळं खारेपाटातील जनता त्रस्त आहे.यावर उपाय शोधण्यासाठी जे करता येईल ते सारं केलं गेलं.सर्वपक्षांचे उबंऱठे झिजवून झाले.अधिकार्‍यांच्या नाकदुर्‍या काठून झाल्या मात्र विषय काही संपलेला नाही.परिणामतः समुद्राच्या काठावर असलेल्या 45 गावात आज 50 रूपयाला पाण्याचा हंडा विकला जात आहे.गंमत अशी की, उश्याला हेटवणे आणि शहापाडा  अशी दोन मोठी धऱणं आहेत आणि त्यातील 80 टक्के पाणीसाठी पडून आहे.यातला आणखी एक विरोधाभास असा की,या भागातील शेतकर्‍यांच्या सात बारावर धरणग्रस्तांचे शिक्के मारले गेलेले आहेत.म्हणजे या भागाला सिंचनाचं पाणी देण्याची,पिण्याचं पाणी देण्याचं उत्तरदायीत्वही सरकारचं आहे.मात्र या वास्ववाचा सोयीस्कर विसरही सरकारला पडलेला आहे.पाईप लाईनसाठी पाईप येऊन पडले आणि ते सडले  त्यालाही आता वीस वर्षे होऊन गेली.पाणी काही मिळाले नाहीत.कायम स्वरूपी उपाय कमी खर्चात होऊ शकतात त्याकडं सरकार  दुर्लक्ष करतय  आणि टँकर लॉबीचं उखळ पांढरं करण्यासाठी या गावांना टॅन्करनं पाणी पुरवठा करायची नाटकं करायची हे दृश्य आता नेहमीच झालं आहे.सरकार टॅन्करनं पाणी पुरवठा कऱण्यासाठी दरवर्षी  दीड ते दोन कोटी रूपये खर्च केले जातात .त्यानं पुरेसं पाणी मिळत नाही पण टॅन्कर लॉबी मात्र गब्बर होत गेली.धोरण तसंच असल्यानं कायम स्वरूपी उपायांकडं दुर्लक्ष केलं जात आहे.राजकारण्यांच्या या खेळांनी त्रस्त झालेल्या जनतेचा आता कोणत्याच पक्षावर विश्‍वास उरला नाही.त्यामुळं त्यांनी पक्षविरहित एक चळवळ उभी केली आहे.गंमत म्हणजे परिसरातील राजकारण्याच्या पायाखालची वाळू सरकावी एवढा उदंड प्रतिसाद या चळवळीला लाभत आहे.रायगड जिल्हयातील पत्रकारानी जिल्हयातील अनेक सामाजिक प्रश्‍न हाताळले आणि ते यशस्वी करूनही दाखविले.मुंबई-गोवा महामार्गाचं विषय अलकिडचा आहे.खारेपाटातील जनतेला हे माहिती अस्लयानं त्यांनी रायगड प्रेस क्लबला याबाबत साकडं घातलं.प्रेस क्लबनं विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रश्‍नी ग्रामस्थांना सहकार्य करण्याचं ठरविलं.प्रेस आणि पब्लिकनं एकत्र येत  जिल्हयात मोठं जनआंदोलन उभं केलं आहे.त्याचा आविष्कार शुक्रवारी बघायला मिळाला.शुक्रवारी हंडा बाईक रॅली हे अभिनव आंदोलन केलं गेलं.यातही गंमत अशी की,अलिबाग पोलिसांनी ज्या आंदोलनाला परवानगी दिली त्या आंदोलनास वडखळ पोलिसांनी नकार दिला.”तुम्हाला जिल्हाधिकार्‍यांकडं जाता येणार नाही तुम्ही प्रांत कार्यालयावर जा” असा अनाहुत सल्ला वडखळ पोलिसांनी आंदोलनकर्त्याना दिला. पोलिसांच्या या आडमुठ्या धोरणामागं काही राजकीय लोकांचा हात होता असं मला सांगितलं गेलं.मात्र “पाणी मिळविणं हा हक्क आणि तो सर्वाच्या जीवन मरणाचाही प्रश्‍न आहे.त्यामुळं पोलिस काहीही म्हणत असले तरी शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकाऱी कार्यालयावरच जायचं” हे आम्ही सार्‍यांनी ठरविलं आणि साडेतीनशे मोटर साईकलवर बसून शेकडो तरूण रायगडच्या राजधानीकडे कुच करते झाले.

 निवासी जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांना तेथे निवेदन दिले.या आंदोलनातलं एक वैशिष्टय असं की,आंदोलनकर्ते सारे वीस ते चाळीस वयोगटातील होते.आणि त्यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता.आंदोलनातही कमालीची शिस्त होती.एक हजार लोकांचा हा प्रातिनिधीक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला पण कुठे गडबड नाही,गोंधळ नाही.घोषणाबाजीही नाही.शांततेत आणि संयमानं हे आंदोलन पार पडलं.मला अप्रुप त्याचं वाटलं.किरण पाणबुडे यांच्याकडे शातंतेत विषय मांडला गेला पण “सरकारनं टोलवाटोलवी केली आणि हा प्रश्‍न सोडविला नाही तर आम्हाला खारेपाटी हिसका दाखवावा लागेल” असा दम भरायला तरूण मुलं विसरली नाहीत .गणेश पाटील या तरूणानं या आंदोलनाचं नेतृत्व केलं.मलाही या अनोख्या आंदोलनात सहभागी होऊन रायगडच्या जनतेशी संवाद साधता आला याचा आनंद नक्कीच आहे.संतोष पवार,मिलिंद अष्टीवकर,दीपक शिंदे,संतोष पेरणे,विजय मोकल,देवा पेरवी हे आणि अन्य अनेक   पत्रकार मित्र नेहमीप्रमाणे माझ्या बरोबर होतेच.एका वेगळ्या लढ्यात सहभागी होण्याची संधी काल मिळाली.

 जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नुकतीच आम्ही भेट घेतली.आता त्यांनी 29 डिसेंबर रोजी सर्वसंबंधांची बैठक लावली आहे.राज्यपालांना भेटून त्यांच्यापर्यंत हा विषय न्यावा असा आग्रहही काही तरूणांनी धरला आहे.त्याष्टीनेही आता प्रयत्न होणार आहेत.डॉ.राजेंद्रसिह यांना बोलावून एक पाणी परिषद जानेवारीत घेण्याचा तरूण मुलांचा प्रयत्न आहे.अर्थात या सार्‍या लढ्यात आम्ही त्यांच्या बरोबर असणारच आहोत.दुःख याचंच वाटतं की,तिकडं मराठवाड्यात पाण्याचे साठे कमी आहेत,पाऊस ही कमी पडतो.इकडं पाऊस नको म्हणे पर्यत पडतो.उश्याला दोन तुडुंब भरलेली धरणं आहेत तरीही पाण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावं लागतं याचाच अर्थ ‘पाणी कुठं तरी मुरतंय’ हे नक्की.रायगडच्या जनतेला साध्या साध्या गोष्टी साठी संघर्ष करावा लागतो हे बरं नाही.एस एम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here