मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन
27,28 जुलै रोजी नांदेडमध्ये होणार

मुंबईः मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे व्दैवार्षिक अधिवेशन यंदा 27 आणि 28 जुलै रोजी नांदेड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज मुंबई येथे केली. दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनास देशभरातून दोन हजारांवर पत्रकार उपस्थित राहतील असा विश्‍वास एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केला आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन पत्रकारांसाठी वैचारिक मेजवाणी असते.दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनात मान्यवरांची विविध विषयांवरची भाषणं,परिसंवाद,मुलाखती असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले असतात.त्यामुळं अधिवेशन केव्हा आणि कोठे होणार याची उत्सुकता देशभरातील मराठी पत्रकारांना कायम लागलेली असते.यावर्षीचे व्दैवार्षिक अधिवेशन ऐतिहासिक नगरी नांदेड येथे घेण्याचे नक्की झाले आहे.1998 मध्ये यापुर्वी परिषदेचे अधिवेशन नांदेडला झाले होते.त्यानंतर आता तब्बल 21 वर्षांनी पुन्हा नांदेडला अधिवेशन होत आहे.अधिवेशन आम्हाला द्यावे अशी विनंती करणारे शिडीॅ,लातूर आणि नांदेड येथील पत्रकार संघाची निमंत्रणं आली होती.त्यापैकी नांदेडचीं विनंती परिषदेच्या 20 मे रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आली.
यापुर्वी अलिकडच्या काळात परिषदेचे अधिवेशन 2011 मध्ये रायगड जिल्हयात रोहा येथे,2013 मध्ये औरंगाबाद येथे,2015 मध्ये पिंपरी चिंचवड येथे तर 2017 मध्ये शेगावला झाले होते.यावर्षीचे अधिवेशन नांदेडला होत आहे.रस्त,रेल्वे आणि विमानमार्गे नांदेड देशातील प्रमुख शहरांशी जोडले गेलेले असल्याने नांदेडला मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.अधिवेशनाच्या तयारीच्या अनुषंगानं लवकरच नांदेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापुरकर यांनी दिली.
देशभरातील जास्तीत जास्त पत्रकारांनी अधिवेशनास उपस्थित राहून नांदेडचे अधिवेशन अविस्मरणीय करावे अशी विनंती परिषदेचे मुख्य विश्‍वस्थ एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी, कोषाध्यक्ष शरद पाबळे,विभागीय सचिव विजयकुमार जोशी, प्रमोद माने, उपाध्यक्ष विजय दगडू, शिवराज काटकर तसेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर,माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे,परिषद कार्यकारिणी सदस्य रामभाऊ शेवडीकर तसेच अन्य पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here