पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा ठेवणारा समाज,

पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा थंड का असतो 

त्रकारांनी पत्रकारिता कशी करावी  ? याचे डोस राजकारणी वारंवार पत्रकारांना पाजत असतात.समाजाच्याही पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा असतात..पत्रकारांनी तटस्थ,निःपक्ष असलं पाहिजे इथपासून पत्रकारांनी पित पत्रकारितेपासून दूर राहिलं पाहिजे,व्रत समजून पत्रकारिता केली पाहिजे,सत्य आणि वस्तुनिष्ठच बातम्या दिल्या पाहिजेत,सामांन्यांना न्याय मिळवून देताना परिणामाची पर्वा न करता लेखणी चालविली पाहिजे..वगैरे वगैरे..समाजाच्या या अपेक्षा चुकीच्या अजिबात नाहीत.पत्रकारिता करताना पत्रकारांनी ही सारी पथ्ये पाळलीच पाहिजेत याबद्दल दुमत असू शकत नाही.परंतू पत्रकारितेचं हे व्रत निभावताना काही हितसंबंधीयांकडून अनेकदा आडकाठ्या आणल्या जातात,पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो,पत्रकारांच्या नोकर्‍यांवर गदा आणून पत्रकारांना रस्त्यावर आणण्याचे उद्योग होतात ,आणि हे सारं होऊनही पत्रकार भीक घालत नाही म्हटल्यावर  त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात किंवा  हल्ले  केले जातात . महाराष्ट्रात दर पाच दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होतो.(याची आकडेवारी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे आहे…ती वेळोवेळी सरकारलाही सादर केलेली आहे.) पत्रकारांवर जेव्हा हल्ले होतात,त्यांचा विविध पध्दतीनं आवाज बंद करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा पत्रकारांकडून ढिगभर अपेक्षा ठेवणार्‍या समाजाची प्रतिक्रिया किंवा भूमिका काय असते..? ‘अनेकदा मला काय त्याचे’? हीच भूमिका बघायला मिळते.ज्या पत्रकारांवर हल्ले होतात ते सारेच पत्रकार बदमाश,हाप्तेखोर असतात असा समज समाजानं करून घेतला असेल आणि त्यामुळं  समाज मौन बाळगत असेल तर ते चूक आहे.कारण जे पत्रकार तोडपाणी न करता खंबीरपणे,कोणाची भिडमूर्वत न ठेवता पत्रकारिता करतात त्यांच्यावरच हल्ले होतात हा माझा यासंबंधीच्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून  अनुभव आहे.टिळक,आगरकरांसारख्या पत्रकारितेची अपेक्षा ठेवणारा समाज प्रामाणिक पत्रकारांच्या पाठिशी उभं राहण्याची हिंमत दाखविणार नसेल तर पत्रकारांनी  कोणाच्या जिवावर हे प्रामाणिकपणाचे आणि सामाजिक बांधिलकीचे  ‘जोखड’ खांदयावर घेऊन पत्रकारिता करावी ?  एखादया पत्रकारावर हल्ला झालाय आणि समाजानं त्याचा समोर येऊन निषेध केलाय, किंवा ‘घाबरू नकोस आम्ही तुझ्या पाठिशी आहोत’ असा आश्वासक शब्द दिलाय असं अलिकडं कधी घडलेलं नाही.यात गंमत अशीय की,केवळ समाजच नाही तर पत्रकार ज्या वर्तमानपत्रासाठी काम करीत असतो ती वर्तमानपत्रंही अंगावरची पाल झटकल्यासारखे अशा प्रसंगी पत्रकाराला बाजुला करतात,सरकार किंवा पोलीस यंत्रणाही पत्रकारांना मदत करताना दिसत नाही.महाराष्ट्र सरकारनं पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला.दोन वर्षे तो पडून आहे.त्याची अंमलबजावणी न करण्यामागे ‘पत्रकारांवर हल्ले झालेच पाहिजेत’ अशी सरकारची मानसिकता असावी असा आरोप केला तर तो चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही.कायदा झाला असता तर अलिबागच्या हर्षद कश्याळकर यांच्यावर हल्ला करण्याची आमदार जयंत पाटील आणि आमदार पंडित पाटील यांची हिंमत झाली नसती.हे स्पष्ठ आहे 

आमच्यापैकी काही जण चुकीच्या पध्दतीनं पत्रकारिता करीतही असतील.नाही असे नाही .. अशा अपप्रवृत्तींपासून कोणतेही क्षेत्र अलिप्त राहिलेलं नाही.सारेच राजकारणी किंवा अधिकारी धुतल्या तांदळासारखे नाहीत.राजकारणातल्या या घाणीबद्दल कोणी बोलत नाही. मात्र चुकीच्या लोकांना मतं टाकणारा समाज पत्रकारांकडून सभ्यतेची अपेक्षा करतो.ही गंमत आहे.अर्थात पत्रकारितेतील अपप्रवृत्तीची पाठराखण आम्ही कधी केली नाही,करणार नाही.अशा पत्रकारांवर कठोर कारवाई व्हावी पण अशा लोकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी देखील नाही.अशा स्थितीत ‘चौथा खांब पोखरला गेलाय’ सारखी मुक्तफळं उधळत पत्रकारांची उपेक्षा किंवा टिंगल- टवाळी करायची हा निष्ठेनं पत्रकारिता करणार्‍या बहुसंख्य पत्रकारांवर केला जाणारा अन्याय आहे.पत्रकारांचं मानसिक खच्चीकरण करण्याचाही त्यामागं सूप्त उध्देश असतोच.. पत्रकारितेत अपप्रवृत्ती प्रबळ झाल्यात असा समाजाचा दावा असेल तर पत्रकारितेतील अशा अपप्रवृत्तींना रोखण्याची आणि  पत्रकारितेतील सद्दप्रवृतत्तींना बळ देण्याची जबाबदारी माध्यमातील लोकांची,संघटनांची आहेच पण सरकार,समाजाची काहीच जबाबदारी नाही काय  ? ती जबाबदारी हे घटक पार पाडत नाहीत ही चळवळीची  तक्रार आहे.हर्षदवर हल्ला झाला,सोशल मिडियावर त्याच्या बातम्या आल्या,पत्रकारांव्यतिरिक्त किती लोकांनी त्याचा निषेध केला.. ? अगदी चार-दोन लोकांनी देखील नाही.असे का होते हे स्पष्ठ झाले पाहिजे काय गुन्हा होता हर्षदचा.. ? एखादा लोकप्रतिनिधी अंगावर येतो ‘तुम्ही काय वाट्टेल त्या बातम्या छापता’ म्हणत थोबाडीत लगावतो, हे काय चाललंय ?  हर्षदनं अशी कोणती बातमी छापली होती की,त्याच्यावर हल्ला करण्यापर्यंत जयंत पाटील भडकले ?..ते त्यांनी सांगावं.पण ते सांगणार नाहीत आणि समाजही त्यांना हा प्रश्न विचारण्याचे धाडस करणार नाही .. उलट पत्रकारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करणार हे दिसतंय..

या साऱ्या प्रतिकूल स्थितीत कोण कोणत्या वर्तमानपत्राचा,चॅनलचा आहे,कोण कोणत्या पत्रकार संघटनेचा आहे याचा विचार न करता सर्वांनी हर्षद आणि अश्याच ज्या पत्रकारांवर हल्ले होतात त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे.आपण एकटे आहोत,त्यामुळं संघटीतपणेच समाजातील हितसंबंधी घटकांशी मुकाबला करू शकतो . .अन्यथा आज हर्षद,उद्या आणखी कोणी अशी स्थिती निर्माण होईल.पत्रकारांनी भक्कमपणे एकजूट दाखविली नाही तर या पुरोगामी महाराष्ट्रात भविष्यात पत्रकारांना काम करणं कठिण होईल हे सर्वच पत्रकार मित्रांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आपणच आपल्या तंगडया ओढत बसण्यापेक्षा कोणीच आपल्यासोबत नाही हे वास्तव लक्षात घेऊन एकीची ताकद दाखवून द्यावी.जे पत्रकार आजारी आहेत,कोणा पत्रकाराचं अकाली निधन झालं असेल तर आता पत्रकार सरकारी दयेवर अवलंबून न राहता एकत्र येऊन गरजू पत्रकारांना मदत करताना दिसतात.हीच मानसिकता आता सर्वच बाबतीत जपावी लागेल..तरच किमान ग्रामीण पत्रकारांचा निभाव लागेल.

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here