स्व.अरूण देशमुखसाठी शेकडो पत्रकार पुढं आले…

0
1087

7 जानेवारी रोजी सातारा येथे एका स्तुत्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.काही दिवसांपुर्वी खटाव तालुक्यातील पुढारीचे धडाडीचे तरूण पत्रकार अरूण देशमुख यांचं अचानक निधन झालं,घरातील कर्ता पुरूष गेल्यानं कुटुंबाची अवस्था बिकट झाली.अशा स्थितीत पत्रकार संघटनांनी देशमुख कुटुंबाच्या पाठिशी उभं राहणं अपेक्षित होतं.सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघानं त्यासाठी पुढाकार घेतला आणि जिल्हयातील तमाम पत्रकार तसेच पत्रकार संघटनांनी एकत्र येत एक बर्‍यापैकी निधी जमा करून तो सुजाता अरूण देशमुख यांना देण्याचा निर्णय घेतला.तो कार्यक्रम 7 तारखेला होत आहे.मी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि जिल्हयातील तमाम पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी राज्यातील पत्रकारांसाठी एक चांगला आदर्श घालून दिला आहे.

वारंवार असं दिसून आलंय की,पत्रकार जेव्हा अडचणीत येतो तेव्हा ना समाज त्याच्या बरोबर असतो,ना तो ज्या वर्तमानपत्रात काम करतो ते पत्र त्याच्याबरोबर असते ना सरकार.अशा स्थितीत येणार्‍या संकंटांना त्या पत्रकाराला आणि त्याच्या कुटुंबाला एकाकी झुंज द्यावी लागते.असे प्रसंग अनेक पत्रकारांवर आलेले आहेत.प्रत्येक वेळी सरकारच्या नावानं बोंबा मारत बसण्यापेक्षा संघटना म्हणून आपणच पुढं यावं आणि ज्या पत्रकारांना गरज आहे त्याला मदतीचा हात पुढे करावा ही जाणीव उशिरा का होईना होत आहे हे सातार्‍यात आणि अन्यत्र दिसायला लागलं आहे.सरकारची शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी वगैरे योजना आहेत पण तो नुसताच भंपकपणा आहे.ज्यांना गरज असते त्यांना ही मदत मिळतच नाही.असे अनेक उदाहरणं मी देईल.पत हरवून बसलेल्या अधिस्वीकृतीचा त्यासाठी आग्रह धरला जातो.राज्यात केवळ आठ टक्के पत्रकारांकडेच अधिस्वीकृती आहे.त्यामुळं मुठभरांसाठीच सरकारी योजना आहे.अरूण देशमुख यांच्यासारख्या ग्रामीण भागातील बहुसंख्य पत्रकारांकडे अधिस्वीकृती नाही.त्यामुळं खरे पत्रकार असूनही ते सरकारी योजनेपासून वंचित राहतात.मात्र यापुढे आपण सरकारवर अवलंबून न राहता पत्रकारांसाठी पत्रकारांनीच एकत्र यावं आणि त्याला मदत करावी असे आवाहन आम्ही वारंवार करीत आहोत.यामागे आम्ही एकटे नाही आहोत ही जाणीव निर्माण होईल आणि पत्रकार अधिक निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडू शकेल.यापुर्वी रायगड,रत्नागिरी,नगर आणि अन्य काही जिल्हयात अशा गरजू पत्रकारांना संघटनांनी मदत केलेली आहे.सातार्‍यातही काही रक्कम अरूण देशमुखच्या कुटुंबियांनी दिली जात आहे हे नक्कीच आशादायक घटना आहे.या कार्यक्रमास मला उपस्थित राहता येत आहे याचा नक्कीच आनंद आहे.अरूण देशमुख माझे मित्र होते.सातार्‍याकडं जेव्हा जाणं व्हायचं तेव्हा अरूणची हमखास भेट व्हायची.कधी तरी फोनवरही बोलणं व्हायचं.त्यामुळं तो गेल्याची बातमी माझ्यासाठी देखील मोठाच धक्का होता.अरूणसाठी आपण काही तरी केलं पाहिजे असं वाटत असतानाच हरिषचा फोन आला आणि अरूणच्या कुटुंबासाठी निधी जमा करीत आहोत असं त्यांनी सांगितलं तेव्हा मनस्वी आनंद झाला.हरिष केवळ घोषणा करूनच थांबले नाहीत तर त्यांनी केलेला निर्धाऱ पूर्णत्वासही नेला.त्याचा खरोख़ऱच आनंद आहे.

अरूण देशमुखचे अचानक निधन झालं.बहुसंख्य पत्रकाराचं प्रकृत्तीकडं दुर्लक्ष होतं.त्यामुळं मराठी पत्रकार परिषदेने पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.3 डिसेंबर रोजी 26 जिल्हयात पत्रकारांची आरोग्य तपासणी झाली.7 जानेवारीला सातार्‍यात असं शिबिर होत आहे.सर्व संघटना आणि पत्रकार एकत्र येऊन हा उपक्रम पार पाडत आहेत.मी परत एकदा सातारकर पत्रकारांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.अरूणच्या कुटुंबांना मदत करून आपण मोठं उत्तरदायीत्व पार पाडत आहात.मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं मला आपल्या सर्वाचा सार्थ अभिमान वाटतो.धन्यवाद

( एस.एम.देशमुख ) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here