पत्रकारांना पोलीस ठाण्यात गुन्हेगारीविषयी माहिती देऊ नये, असा नवीन फतवा काढून पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी हुकूमशाहीच्या दाखविलेल्या नमुन्यावर गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यामार्फत संदेश देऊनही अंमलबजावणी झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पत्रकारांना पोलीस ठाण्यातून गुन्हेविषयक माहिती देऊ नका, असा आदेश पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी काढल्याचे ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यातून ठाणे अंमलदार सांगत आहेत.
गृह राज्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शनिवारच्या दौऱ्यात उपस्थित नव्हते, तसेच पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारीदेखील नव्हता. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना पत्रकारांना गुन्हेविषयक योग्य ती माहिती देण्याबाबतचा संदेश देण्यास सांगितला. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क साधून पोलीस अधीक्षकांनी फतवा मागे घेतला नसेल तर आपण उद्या सोमवारी पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलतो असे सांगितले आहे.(लोकसत्तावरून साभार )