सांसद आदर्श ग्राम योजनेला लोकसहभागाची मात्रा हवी

  0
  925

  रायगड जिल्हय़ातील चिंचोटी, दिवेआगर आणि बांधापाडा या तीन गावांची निवड सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी करण्यात आली आहे.
  मात्र या गावांमध्ये विविध योजना अंमलबजावणी करताना स्थानिक लोकांचा सहभाग अपुरा पडत असल्याचे दिसून येत आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावाची सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड केली आहे.

  याअंतर्गत गावात आजवर पशुवैद्यकीय तपासणी करणे, आरोग्य तपासणी मेळावे आयोजन करणे, घराघरांत विद्युत एलईडी दिवे बसवणे, पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना करणे यांसारखे उपक्रम राबविण्यात आले आहेत.

  अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावाची सांसद आदर्शग्राम योजनेसाठी निवड केली आहे. या योजनेंतर्गत गावात विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली आहे. गावातील सर्व रस्त्यांना एकसारखे दिशादर्शक फलक बसवणे, गावातील प्रत्येक घरात स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे, शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचे वाटप करणे, डाळींचे वाटप करणे, महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप करणे यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत.

  खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुक्यातील बांधापाडा गावाची निवड सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी केली आहे. याअंतर्गत गावाच्या वेशीवर स्वागत कमान उभारणे, तीन अंगणवाडय़ांचे नव्याने बांधकाम करणे, शाळांना संगणक वाटप करणे, स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत.
  मात्र तीनही गावांत स्थानिक लोकांकडून या योजनेसाठी आवश्यक असणारा लोकसहभाग मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विकासकामांना गती देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. गावाचा विकास व्हावा, पण त्यात आमचा सहभाग नसावा, अशी आडमुठी भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. लोकांचा कल वैयक्तिक लाभाच्या योजनांकडेच असल्याचे दिसून येत आहे. गावाच्या विकासासाठी सामुदायिक जबाबदारी पार पाडताना मात्र लोक समोर येताना दिसत नाही.

  या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजना गावात सक्षमपणे राबविणे अपेक्षित आहे; पण प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना, जनधन योजना यांसारख्या योजनांना स्थानिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार प्रयत्न करूनही या तीनही गावांत १०० टक्के लोकांना विमा संरक्षण मिळू शकलेले नाही, तर आधार कार्डसाठी विशेष कॅम्प घेऊनही १०० टक्के लोकांनी आधार नोंदणी केलेली नाही. शासकीय योजनांची गावात योग्य प्रकारे अंमलबजावणी होते आहे की नाही हे पाहण्यासाठीही स्थानिक लोक पुढे नाहीत. त्यामुळे गावातील लोकांनी आडमुठी भूमिका सोडून गावाच्या विकासासाठी समोर येणे अपेक्षित आहे (लोकसत्तावरून साभार) .

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here