18 तासानंतरही सांगलीच्या पोलिसांना आरोपीचा फोन नंबर शोधता येईना

पत्रकारांना संरक्षण कायदा कश्याला हवाय,विद्यमान कायदे पुरेसे आहेत वातानुकुलीत खोलीत बसून असे तारे तोडणार्‍या आमच्या काही ज्येष्ठ मित्रांनी जर मिरज-सांगलीतील घटना समजून घ्यावी.मिरज येथील पुढारीचे प्रतिनिधी जालंदर हुलवान यांनी सातत्यानं गुटख्याच्या विरोधात बातम्या दिल्या आहेत.त्यामुळं हितसंबंध दुखावलेल्या गुटख्यावाल्यांनी काल हुलवान यांना बघून घेऊची धमकी दिली.लॅन्डलाईन फोनवरून धमकी आली आणि तो कॉलही हुलवान यांच्याकडं रेकॉर्ड झालेला आहे.त्यानुसार काल त्यांनी मिरज येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.या तक्रारीत त्यानी 0233-2211429 या क्रमांकावरून आपणास धमकीचा फोन आल्याचा स्पष्ट उल्लेख केला.मात्र गंमत अशी की,तक्रार देऊन 18 तास उलटून गेले तरी पोलिसांना अजून हा नंबर कुणाचा आहे हे शोधता आलेलं नाही.पोलीस सांगतात,आम्ही बीएसएनएलला माहिती देण्याचं कळविलं आहे.बीएसएनएलकडून माहिती मिळत नाही.त्यामुळं हा नंबरच कुणाचा आहे हे कळत नाही.नंबरच कळत नसल्यानं कारवाई कुणावर करायची हा म्हणे पोलिसांना पडलेला गहन प्रश्‍न आहे.याचा अर्थ असा की,प्रचलित कायदा फोन नंबरही शोधू शकत नाही तिथं पत्रकारांना काय डोंबल्याचं संरक्षण देणार काय.मुद्दा स्पष्ट आहे की,मिरजमध्ये खुलेआम गुटखा विकला जातो.हे पोलिसांचे आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही.त्यामुळं पोलिस एका पत्रकाराच्या प्रकऱणात जी दिरंगाई करीत आहेत त्यामागे गुटखावाले आणि पोलिसांची काही मिलीभगत नसेलच असा दावा कोणी करू शकत नाहीत.पोलीस काही कारवाई करीत नाहीत हे दिसल्यावर आज सांगलीच्या पत्रकारांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर वस्तुस्थिती घातला असून आरोपींना तातडीनं अटक करावी आणि जालंदर हुलवान यांना संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर घातला गेला आहे.पत्रकार संरक्षण कायदा झाला तर किमान पोलिसांना प्रकरण दाबता येणार नाही.

LEAVE A REPLY