पुणेः संपादकांना मिळणारा सन्मान,प्रतिष्ठा आणि संपादक या पदाला असलेलं वलय या गोष्टी व्यवस्थापनासाठी नेहमीच असुयाच्या ठरलेल्या आहेत.त्यामुळं या व्यवस्थेचं महत्व कमी करण्याचे खटाटोप गेली काही वर्षे सुरूच आहेत.पुर्वी एक संपादक असायचा.आता वेगवेगळे अनेक संपादक असतात.यामागं मुख्य संपादकाचं महत्व कमी करण्याचीच खेळी असते.नंतर अग्रलेख वाचतो कोण ? अशा स्वरूपात अग्रलेखाची हेटाळणी मालकांकडूनच होत असते.त्यामुळं अग्रलेखाचं हे पान चौथ्या स्थानावरून आठव्या -दहाव्या -बाराव्या स्थानावर गेलं.एवढंच नव्हे तर दोन कॉलम अग्रलेख अर्ध्या कॉलमपर्यंत सीमित केला गेला.अग्रलेखांच्या पानावरील स्फूटचा आकारही कमी केला गेला.संपादकांची केबिन ही व्यवस्थापकांपेक्षा छोटी केली गेली आणि संपादकांच्या अधिकारांनाही कात्री लावली गेली.पुर्वी महत्वाची बातमी असेल तर अगदी जाहिरात काढून फेकण्याचे अधिकार रात्रपाळीच्या मुख्य उपसंपादकांनाही असत.आज शेवटच्या क्षणापर्यंत जाहिराती घेतल्या जातात.पहिल्या पानावर गळ्यापर्यंत जाहिरातींचा मारा असतो तरीही संपादक मंडळी काही बोलू शकत नाही.संपादकाला कार्यालयात आता किंमत राहिली नाही याच्या या सार्या गोष्टी निदर्शक आहेत.
हे सारं कमी होतं म्हणून की,काय आता संपादक हे पदच रद्द ठऱविण्याचा खटाटोप अनेक दैनिकात सुरू आहे.इंग्रजीतलं हे लोण आता भाषिक वृत्तपत्रांमध्येही झिरपत असून संपादकांची जागा आता कन्टेंट क्युरेटर घेऊ लागले आहेत.महाराष्ट्रात अलिकडंच एका दैनिकानं काही नेमणुका केल्या असून त्यात संपादकांच्या जागेवर कन्टेंट क्युरेटर .त्यामुळं मुख्य संपादक आता चीफ कंन्टेंट क्युरेटर म्हणून ओळखला जाणार आहे.संपादक हा कंन्टेंट क्युरेटर म्हणून ओळखला जाणार आहे.कार्यकारी संपादकाला यापुढे एक्झिक्युटीव्ह कन्टेंट क्युरेटर म्हणून ओळखले जाणार आहे.वरवर क्युरेटर असं नामाभिधान करून संपादकपदाची जबाबदारी वाढविल्याचा आभास जरी निर्माण केला गेला असला तरी ते खऱं नाही.वाचकांना विविध माध्यमांव्दारे आणि सर्वंकष माहिती पुरविणे ही क्युरेटरची जबाबदारी असणार आहे.
संपादक म्हटल्यानंतर जो रूबाब,जो दबदबा जाणवायचा ते आता क्युरेटरमध्ये असणार नाही.असी विविध पदं निर्माण करून संपादक हे पदच कालबाह्य ठरविण्याचा प्रयत्न सुरू असून ते नक्कीच एकूणच पत्रकारितेसाठी घातक ठरणार आहे.एक काळ असा होता की,संपादकाच्या नावावर संबंधित दैनिक ओळखले जायचे.आज संपादकाची ओळख जगाला होणार नाही याची काळजी व्यवस्थापन घेत असते.शक्यतो सर्वात ज्युनिअर व्यक्तीला संपादकपदाची जबाबदारी दिली जाते.यामागे ते कायम उपक्रत राहतील अशी योजना असते.घडतंही तसंच.त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रमुक चार दैनिकांच्या संपादकांची नावं सांगा म्हटलं तर अगदी पत्रकारितेतील विद्यार्थ्यांनाही आणि बहुतेक पत्रकारांनाही ती सांगता येत नाहीत.आपला संपादक हा लोकप्रिय नसावा,बाह्य जगाशी त्याचा संबंध आणि संपर्क नसावा याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.या सर्व नव्या रचनेमुळं संपादक हे पद पुढील काही दिवसात कालबाह्य झाले तर जराही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.