तिरूवनंतपुरमः आज एक आश्‍चर्यकारक घटना समोर आलीय.संघाच्या मुखपत्रात चक्क डाव्या पक्षाच्या केरळचे मुख्यमंत्री विजयन यांची तारीफ केली गेलीय.अन ती देखील संपादकीयात.’केरळचे मुख्यमंत्री पूर परिस्थितीशी एकाकी झुंज देत आहेत’ असं म्हणत या संपादकीयात केंद्राच्या भूमिकेवर सपाटून टीका केली गेली होती.’केरळमधील पूरग्रस्तांना मदत देताना केंद्र सरकार राजकीय सूडबुध्दी दाखवत आहे’ अशी टीका संपादकीयात केली गेली होती.’मुख्यमंत्री पीनरयी विजयन केंद्रासोबत खूपच समजूतदारपणे,सभ्यतेनं वागत आहेत पण केंद्र त्याला प्रतिसाद देत नसल्याचा’ आरोपही संपादकीयात केला गेला होता.मुख्यमंत्री ‘विजयन यांनी आपत्तीशी लढताना उत्तम प्रशासकीय कौशल्य दाखविलं पण मदत करताना आणि राज्य सरकारच्या मागण्या स्वीकारताना केंद्र  सरकारने ढिसाळपणा दाखविला’ असा आरोपही संपादकीयात केला गेला होता.
वेबसाईटवर हा संपादकीय झळकल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली.वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या.त्यानंतर हे संपादकीय संकेतस्थळावरून हटविले गेले.त्याऐवजी ‘धर्म नव्हे देश महत्वपूर्ण आहे’ हा लेख लावला गेला आहे.केसरीचे मुख्य संपादक एन.आर.मधू यांनी आमची वेबसाईट हॅक करून तसा मजकूर संपादकीयात घुसविल्याचा आरोप केला आहे.मात्र हा विषय केरळमधील माध्यमात चर्चेचा झाला होता. केसरी हे केरळमधून प्रसिध्द होणारे संघाच्या विचारांचा प्रचार करणारे जुने साप्ताहिक आहे.खरं तर वृत्तपत्रांनी सत्य तेच मांडलं पाहिजे असा लोकांचा आग्रह असतो.ते खरंही आहे.मात्र सत्य सर्वांना चालतेच असं नाही.केसरीला आपलं संपादकीय मागं घ्यावं लागलं यातून हे वास्तव पुन्हा समोर आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here